भारतात रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या ही एक मोठी आणि कधीही न संपणारी समस्या असल्याचे बोलले जाते. भारतात सर्वांत जास्त अपघात खड्ड्यांमुळे होतात. पावसाळा आला की, रस्त्यावरील खड्ड्यांची संख्याही वाढते. छोटे खड्डे हळूहळू मोठे होत जातात. या खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि त्यामुळे नेमका खड्डा कुठे आहे? हे चालकाला दिसत नाही. चालकाची गाडी चुकून या खड्ड्यांमधून गेल्यास तोल जातो आणि अपघात होतो. भारतातील खड्डेमय रस्त्यांवर अनेक विनोददेखील केले जातात. असे म्हणतात की, जो भारतातील खड्डेमय रस्त्यावर आपले वाहन चालवू शकतो, तो इतर कुठेही वाहन चालवू शकतो. पण, रस्त्यांवर जर खड्डेच नसतील तर आणि खड्डे तयार झाल्यास रस्त्याने ते स्वतः बुजवले तर? ही बाब थोडी गमतीशीर आणि आश्चर्यजनक वाटतेय ना? पण, ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट आता लवकरच सत्यात उतरणार आहे. भारतातील रस्त्यांमध्ये असे तंत्र आणले जाणार आहे; ज्यामुळे रस्ते स्वतःच स्वतःला दुरुस्त करू शकतील. हे तंत्र भारतीयांच्या प्रवासाच्या मार्गात क्रांती घडवून आणू शकेल, असे सांगितले जात आहे. हे सेल्‍फ हीलिंग तंत्र नेमके कसे आहे? याचा काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊ या.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या रस्त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) देशातील खड्ड्यांच्या सततच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सेल्‍फ हीलिंग डांबराचा वापर करण्याचा विचार करीत आहे. “आम्ही टिकाऊपणा आणि खड्ड्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कल्पक पद्धतींचा विचार करीत आहोत,” असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार अधिकार्‍याने असे म्हटले आहे, “सेल्‍फ हीलिंग तंत्रज्ञान वापरात आणण्यासाठी येणारा खर्च आणि त्याचे होणारे फायदे यांचा अभ्यास केल्यानंतरच सेल्‍फ हीलिंग तंत्राचा अवलंब केला जाईल. त्यामुळे रस्ते अनेक काळ ‘जशास तसे’ राहतील आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे दूर होतील.”

young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
भारतातील रस्त्यांमध्ये असे तंत्र आणले जाणार आहे; ज्यामुळे रस्ते स्वतःच स्वतःला दुरुस्त करू शकतील. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : ४ महिन्यांत २७ महिलांची हत्या; महिलांवरील वाढत्या हिंसाचारामुळे ऑस्ट्रेलिया पेटून उठलाय, देशात नक्की काय घडतंय?

सेल्‍फ हीलिंग तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय?

सेल्‍फ हीलिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार केले जाणारे रस्ते म्हणजे यात ‘सेल्फ हिलिंग डांबर’ वापरले जाते. हे डांबर सामान्य डांबरापेक्षा वेगळे असते. त्यात सेल्‍फ हीलिंग करणारे साहित्य असते. त्याला ‘स्मार्ट डांबर’ असेही संबोधले जाते. सध्या मोठ्या प्रमाणात या डांबराची चर्चा केली जात आहे. सेल्फ हीलिंग रस्ते किंवा स्मार्ट डांबरामध्ये स्टील फायबर आणि इपॉक्सी कॅप्सुल असते; जी रस्त्यावरील छोट्या छोट्या भेगाही (क्रॅक्स) दुरुस्त करू शकते आणि पाणी त्यात जाण्यापासून रोखू शकते.

सेल्‍फ हीलिंग तंत्रज्ञान कोणी विकसित केले?

हे तंत्रज्ञान नेदरलँड्समधील डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे सिव्हिल इंजिनियरिंगचे प्राध्यापक एरिक श्लेंजन यांनी विकसित केले आहे. नेदरलँडमधील संशोधकांनी काही सेल्‍फ हीलिंग रस्ते तयार केले आहेत; जे बाह्य मदतीशिवाय भेगाही (क्रॅक्स) दुरुस्त करण्यास सक्षम आहेत. संशोधकांचा असा विश्वास आहे की, असे रस्ते तयार करणे अधिक महाग असले तरी ते दीर्घ कालावधीपर्यंत टिकणारे असल्यामुळे पुन्हा पुन्हा रस्ते तयार करण्याचा खर्च वाचू शकतो. संशोधकांनी हे रस्ते ८० वर्षांपर्यंत टिकू शकतात, असे सांगितले आहे.

सेल्‍फ हीलिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार केले जाणारे रस्ते म्हणजे यात ‘सेल्फ हिलिंग डांबर’ वापरले जाते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रस्ते सुधारण्याबरोबरच त्याचे इतर फायदेही आहेत, असे श्लेंजन म्हणाले. “डांबरामध्ये स्टीलचे तंतू असल्याने रस्त्यावर इलेक्ट्रिक कार चार्ज करणेही शक्य होऊ शकेल. आम्ही ट्रॅफिक लाइट्ससमोर यासंबंधित काही चाचण्या करणार आहोत, जिथे ट्रॅफिकमध्ये थांबताना तुम्ही तुमची कार थोड्याफार प्रमाणात चार्ज करू शकाल,” अशी कल्पना असल्याचे श्लेंजन यांनी सांगितले आहे.

भारतातील खड्ड्यांची समस्या

असे रस्ते जर भारतात तयार झाले, तर ती बाब भारतीयांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल. देशभरातील खड्डेमय रस्ते अनेक रस्ते अपघातांना कारणीभूत ठरले आहेत. २०२२ मध्ये सरकारी आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, खड्ड्यांमुळे ४,४४६ अपघात होऊन, त्यामध्ये १८५६ लोकांचा मृत्यू आणि ३,७३४ लोक जखमी झाले होते. या दुर्घटनेची तुलना २०२१ शी केल्यास २०२१ मध्ये खड्ड्यांमुळे ३,६२५ अपघात होऊन, त्यामध्ये १४८३ लोकांचा मृत्यू आणि आणि ३,१०३ जण जखमी झाले होते.

देशभरातील खड्डेमय रस्ते अनेक रस्ते अपघातांना कारणीभूत ठरले आहेत. (छायाचित्र-पीटीआय)

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही देशातील खड्ड्यांच्या प्रश्नावर भाष्य केले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते म्हणाले होते, राष्ट्रीय महामार्गांवर खड्डे पडू नयेत यासाठी सरकार विविध धोरणांवर काम करत आहे. त्याशिवाय न्यायालयानेही देशभरातील खड्डेमय रस्त्यांची दखल घेतली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पादचारी आणि सायकलस्वारांच्या मॅनहोल व खड्ड्यांमध्ये पडून मृत्यू झाल्याचे कारण नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे म्हटले होते. देशाच्या आर्थिक राजधानीतील निकृष्ट रस्त्यांवर योग्य ती कारवाई न केल्याबद्दल राज्य सरकारची कानउघाडणीही करण्यात आली होती.

२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंना अस्वीकार्य ठरवले होते. न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले होते की, देशभरातील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कदाचित सीमेवर किंवा दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या लोकांपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा : भारतीय नृत्यकलेचे स्वरूप कसे बदलत गेले? नृत्य केल्याने खरंच आरोग्य सुधारते का?

जगभरात सेल्‍फ हीलिंग रस्ते कुठे आहेत?

नेदरलँड्समधील १२ वेगवेगळ्या रस्त्यांवर सेल्फ हीलिंग डांबराची चाचणी घेण्यात आली आहे आणि त्यापैकी एक रस्ता २०१० पासून ‘जशाचा तसा’ आहे आणि लोकांसाठी खुला आहे. युनायटेड किंग्डममधील बाथ, कार्डिफ व केंब्रिज येथील विद्यापीठ यांच्याकडून सेल्‍फ हीलिंग काँक्रीट विकसित करून, रस्त्यावर हे तंत्रज्ञान वापरण्याचा विचार केला जात आहे. भारतामध्ये सेल्फ हीलिंग रस्ते असणे हा एक दूरदर्शी विचार आहे. तो इतक्या लगेच अमलात आणणे शक्य नाही. परंतु, एक गोष्ट निश्चित आहे की, जर ते प्रत्यक्षात आले, तर खड्यांमुळे होणारे रस्ते अपघात थांबतील आणि लोकांचा प्रवास सुलभ होईल.