Legal Notice issued against Netflix : गेल्याच आठवड्यात राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी सर्वात मोठा ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर कायदेशीर नोटीस बजावून ‘बिग बँग थिअरी’च्या दुसऱ्या सीझनमधील पहिला एपिसोड मागे घ्यावा, अशी मागणी केली. या एपिसोडमध्ये बॉलिवूडची नायिका माधुरी दीक्षितबद्दल विकृती टिप्पणी करण्यात आलेली आहे. या नोटीशीनुसार मिथुन कुमार यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला बिग बँगच्या दुसऱ्या सीझनमधील पहिला भाग काढून टाकण्याची मागणी केली आहे. ज्यामध्ये राज कुथाप्पली नावाचे पात्र कुणाल नायर याने साकारले आहे. त्याच्यासोबत शेल्डन कूपर नावाचे पात्र संवाद साधताना दाखविण्यात आले आहे. हे पात्र जिम पार्सन्स या कलाकाराने साकारले आहे. दोन्ही पात्र एपिसोडमध्ये संवाद साधत असताना त्यांनी बॉलिवूडच्या नायिका ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांचा आक्षेपार्ह उल्लेख केला. विशेष म्हणजे हा सीझन २००८ रोजी प्रदर्शित झाला आहे. १५ वर्षांनंतर ही बाब ध्यानात आली, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
कुमार यांनी आपल्या कायदेशीर नोटीशीत कुणाल नायरने रंगविलेल्या पात्राच्या तोंडी जे संवाद घालण्यात आले, त्यावर आक्षेप घेतला. त्याने साधलेल्या संवादामधून महिला वर्गाचा अपमान होत असून महिलांप्रती भेदभावाची भाषा वापरण्यात आली आहे. या एपिसोडला तात्काळ हटविण्यात यावे, असे कुमार यांनी नोटिशीत म्हटले.
कायदेशीर नोटीस का बजावली?
राज आणि शेल्डन पहिल्या एपिसोडमध्ये संवाद साधत असताना ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांची तुलना करतात. दोघेही हिंदी चित्रपट पाहताना दाखविण्यात आले आहेत. ते दोघे कोणता चित्रपट पाहत होते, हे त्या सीनमध्ये दिसत नसले तरी बॅकग्राऊंडला ‘कहो ना प्यार है’ हे गाणे वाजते आहे. हे गाणे दोन्हीही अभिनेत्रींशी संबंधित नाही. यावेळी शेल्डन आणि राज यांच्यात ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्यात सर्वात सुंदर कोण? या विषयावरून चर्चा सुरू होते. शेल्डन म्हणतो की, ऐश्वर्या राय ही गरिबांची माधुरी दीक्षित आहे. शेल्डनच्या या विधानावर राज चिडतो. शेल्डनला उत्तर देताना तो म्हणतो, ऐश्वर्या ही ‘देवी’प्रमाणे आहे. तर तिच्या तुलनेत माधुरी ‘रोगट वेश्या’ (Leprous Prostitute). राज या पात्राच्या तोंडी हे विकृत संवाद असल्याचे लक्षात आल्यानंतर मिथुन विजय कुमार यांना राहावले नाही. त्यांनी यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
Leprous Prostitute या इंग्रजी शब्दाचा अर्थ काय?
लेपरस प्रॉस्टिट्यूट (Leprous Prostitute) या शब्दाचा अर्थ होतो, कुष्ठरोगाचा सामना करणारी वेश्या. हा अर्थ कळल्यानंतर सदर संवाद किती घाणेरडा आणि विकृत आहे, याची प्रचिती येते. अमेरिकेत या शब्दाला विनोदबुद्धीने (Humor) वापरले जाते. अमेरिकेत स्लँग (Slang) शब्दाचा बोलीभाषेत वापर केला जातो. स्लँग म्हणजे बोली भाषेत जास्त रूढ असणारे खूप अनौपचारिक असे शब्द व वचने. असे आचरट किंवा चावट शब्दप्रयोग विशिष्ट लोकांचा गट वापरतो. त्यात या इंग्रजी शब्दाचा भारतीय भाषेत अर्थ काढताना आणखी विकृत असा अर्थ निघतो. तसेच मूळ इंग्रजी शब्दही विनोदबुद्धीने वापरला जात असला तरी तो अपमानास्पदच आहे. तसेच पुरुषप्रधान मानसिकतेचे लक्षण दाखविणारा आहे.
मिथुन कुमार यांच्या तक्रारीनंतर नेटफ्लिक्सकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र ट्विटरवर नोटिशीची प्रत शेअर केल्यानंतर मिथुन कुमार यांना नेटीझन्सनीच उलट प्रश्न विचारले आहेत. २००८ च्या एपिसोडवर २०२३ साली आक्षेप घेऊन काय हशील? असाही प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. तर काही ट्विटर वापरकर्त्यांनी मिथून यांना सल्ला देत ॲमेझॉन प्राइमलाही कायदेशीर नोटीस देण्याची मागणी केली आहे. ही मालिका तिथेही प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
राजीव नावाच्या एका व्यक्तिने म्हटले की, २००८ साली प्रदर्शित झालेल्या या मालिकेचे २० हून अधिक भाषांत डबिंग झालेले आहे. ८० देशांमध्ये ही मालिका पाहिली गेली. कित्येक दशलक्ष व्ह्यूज या मालिकेला मिळाले आहेत. आतापर्यंत कुणालाही ही बाब कशी खटकली नसेल? एकूणच मिथून यांनी जरी ही बाब निदर्शनास आणून दिली असली तरी १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘बिग बँग थिअरी’ मालिका चर्चेत आली असून ती पुन्हा एकदा पाहिली जाण्याची शक्यता आहे.
‘बिग बँग थिअरी’ अमेरिकेतील लोकप्रिय मालिका
सीबीएस सिटकॉम यांची निर्मिती असलेला ‘बिग बँग थिअरी’ ही मालिका अमेरिकेतील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. २००७ रोजी पहिल्यांदा प्रदर्शित झाल्यानंतर २०१९ पर्यंत या मालिकेचे १२ भाग प्रदर्शित झाले आहेत. २०१९ साली या मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला होता. शास्त्रज्ञांना घेऊन तयार करण्यात आलेल्या मालिकेला मालिकेला जगभरात प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत शेल्डन कूपर आणि लेनर्ड हॉफ्सस्टॅडर हे दोन भौतिक शास्त्रज्ञ मध्यस्थानी दाखविले आहेत. दोघेही एकाच घरात राहतात. ‘पेनी’ हे महिला पात्र त्याच घरात शेल्डन आणि लेनर्ड सोबत एकाच घरात राहतात. पेनी अभिनेत्री होण्यासाठी शहरात आलेली असते, चित्रपट मिळेपर्यंत ती वेट्रेसचं काम करत असते. शेल्डन आणि लेनर्डचे दोन मित्र हॉवर्ड और राज देखील त्यांच्या घरात अधुनमधून येत असतात. या पाचही पात्रांच्या आसपास १२ सीझन गुंफलेले आहेत. वैज्ञानिक माहिती, मानवी स्वभाव, प्रेमाचा त्रिकोण आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हे या शोचे बलस्थान आहे.
या शोची प्रसिद्धी इतकी होती की, खऱ्याखुऱ्या शास्त्रज्ञांनी देखील यात पाहुणे कलाकार म्हणून काम केलेले आहे. स्टिफन हॉकिंग, एलॉन मस्क आणि ॲपलचे सहसंस्थापक स्टिव्ह वॉझनिक यांनी या मालिकेत पाहुणे कलाकार म्हणून सहभाग घेतलेला आहे.
विकृत संवादावर बॉलिवूडची प्रतिक्रिया
माधुरी दीक्षितबद्दल आक्षेपार्ह संवाद ऐकल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकारांनीही नाराजीच्या प्रतिक्रिया दिल्या. ज्येष्ठ अभिनेत्री, खासदार जया बच्चन यांनी संताप व्यक्त करतांना म्हटले की, त्या सिरीजमध्ये घाणेरडे संवाद बोलणारा कलाकार (कुणाल नायर) वयाने लहान आहे. एवढ्या लहान वयात असे घाणेरडे वाक्य कसे बोलू शकतो. त्याच्या कुटुंबियांनीच यावर सांगावे की, त्यांना हे ऐकून कसे वाटतय. उर्मिला मातोंडकर यांनीही या प्रसंगावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मी हा शो पाहिलेला नाही. पण बातम्यांमधून विषय कळला. अशा संवादातून लोकांची घाणेरडी मानसिकता दिसून येते. त्यांना हा काय थट्टा मस्करीचा विषय वाटला का? अभिनेत्री दिया मिर्झाने देखील या संवादाचा निषेध केला आहे. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम केलेल्या अभिनेत्री फ्लोरा सैनी यांनीही या विषयावर प्रतिक्रिया नोंदविली आहे. त्या म्हणाल्या, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित या दोघींनीही बॉलिवूडसाठी मोठे योगदान दिलेले आहे. त्यांच्याप्रती अशी अपमानजनक टिप्पणी करणे म्हणजे संपूर्ण सिनेसृष्टीचा अपमान करण्यासारखे आहे.
या सर्वांच्या प्रतिक्रियेतून हा संवाद २००८ चा असल्याचे कुणीही म्हटलेले नाही. खरंतर १५ वर्षांनंतर यावर आक्षेप घेतला पाहिजे का? याबद्दलही कुणी बोललेले नाही.
ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म म्हणजे काय?
Over-The-Top (ओव्हर-द-टॉप) असा ओटीटीचा फुल फॉर्म आहे. OTT वर तुम्हाला प्रदर्शित होणारा नवीन चित्रपट, वेबसीरिज किंवा अन्य मीडिया कंटेंट पाहायला मिळतो. ओटीटी ही व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्व्हिस (Video Streaming Service) आहे. याआधी अमेरिकेत या सर्व्हिसला खूप मागणी होती. पण आता जगभरात याला प्रचंड मागणी वाढली आहे. भारतात ओटीटीच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय होतो.
ओटीटीच्या कलाकृतींवर सेन्सॉर नाही?
नेटप्लिक्स, अमेझॉन प्राइम, हॉटस्टार या परदेशी ओटीटी प्लॅटफॉर्मसह आता देशातील अल्ट बालाजी, एमएस्क प्लेअर, झी५ असा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवात झालेली आहे. ओटीटींवर अश्लील आणि हिंसक चित्रपट आणि वेबसीरीजचा भडीमार असल्याची तक्रार विविध राज्यांमधून केली गेलेली आहे. २०२१ साली प्राइमवर प्रदर्शित झालेल्या तांडव वेबसीरीजमुळे मोठा वाद उद्भवला होता. विविध राज्यातील उच्च न्यायालयात ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंधने आणण्याबाबत याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत.
फेब्रुवारी २०२१ मध्ये, तत्कालीन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ओटीटीवर नियंत्रण आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. प्रकाश जावडेकर म्हणाले होते, वर्तमानपत्रांसाठी प्रेस काऊन्सिल कोडचे पालन केले जाते, टीव्हीसाठी केबल ॲक्ट आहे. परंतु सध्या ओटीटीचे नियमन करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. यासाठी चेन्नई आणि मुंबई स्थित असलेल्या अनेक ओटीटी कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्रिस्तरीय निकषांची रचना तयार केली आहे. त्याचे पालन ओटीटी कंपन्यांनी करावे.
एक म्हणजे, आता ओटीटी कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर आपले डिसक्लोजर द्यावे लागेल. तसेच तक्रार निवारण करण्यासाठी स्वतःची यंत्रणा उभी करावी लागेल. दुसरे, ओटीटीवर स्वयंनियमन असेल. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली तक्रारीवर सुनावणीसाठी समिती तयार करण्यात यावी. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी चुक केल्यानंतर ज्याप्रकारे दिलगिरी व्यक्त करण्याचा नियम आहे. त्याप्रमाणे डिजिटल प्लॅटफॉर्मसाठीही चुकीला माफी मागण्याची पद्धत असावी. तिसरे म्हणजे, ओटीटी आणि अन्य डिजिटल माध्यमांना सेन्सॉर बोर्डाचे एथिक्स कोड लागू असतील. अफवा किंवा संभ्रम पसरविण्याचा अधिकार कुणालाच नाही. माध्यमांचे स्वातंत्र्य हे उत्तरदायी असायला हवे.
२०२१ च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानंतरही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि हिंसक कलाकृती प्रदर्शित झालेल्या आहेत. मार्च २०२३ मध्ये, विद्यमान माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मनमानीविरोधात इशारा दिला होता. ओटीटीवरी कलाकृतींच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. जर या तक्रारी वाढत गेल्या तर सरकारला नाईलाजास्तव कठोर पावले उचलावी लागतील. कल्पकतेच्या नावाखाली अश्लील शिवीगाळ किंवा हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.