अभिनेता शाहरुख खान याने बॉलिवूडचा बादशहा म्हणून आपली ओळख तयार केलेली आहे. २ नोव्हेंबर रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाहरुखने त्याच्या ‘डंकी’ या आगामी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला. टीझरनुसार चित्रपटाची कथा पंजाबमधील असल्याचे दिसते. तसेच शाहरुख खानच्या पात्राचे नाव हार्डी असून तो आपल्या मित्रांसह लंडनमध्ये जाण्यास उत्सुक असल्याचे दिसते. पंजाबमधील अनेक तरुण परदेशात जाऊन भविष्य घडविण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नांवरच सदर कथा बेतलेली आहे. परदेशात अवैध पद्धतीने घुसखोरी करण्यासाठी जागतिक पातळीवर एक संज्ञा वापरली जाते, ज्याला डाँकी फ्लाइट्स (Donkey Flights) म्हणतात. जगभरातील अनेक लोक युनायटेड किंग्डम, कॅनडा आणि युनायटेड स्टेट्समध्ये प्रवेश करण्यासाठी या अवैध मार्गाचा वापर करत असतात. त्याच मार्गाची कथा उलगडण्याचा प्रयत्न ‘डंकी’ चित्रपटातून होणार असून डिसेंबर महिन्यात नाताळच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
पण, यानिमित्ताने Donkey Flights प्रकार काय आहे? आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय नागरिक या मार्गाने अमेरिका, यूकेमध्ये कसा प्रवेश मिळवतात? याबद्दल घेतलेला हा आढावा ….
डाँकी फ्लाइट म्हणजे काय?
युरोपच्या मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूटने २०१४ रोजी Donkey Flights यावर एक अहवाल तयार केला. निकोला स्मिथ यांनी या अहवालात पंजाबमधून यूकेमध्ये होणाऱ्या अवैध घुसखोरीबाबत सविस्तर विवेचन केले आहे. यात त्यांनी डाँकी फ्लाइट्स हा शब्द पंजाबमधून आल्याचे नमूद केले. गाढवाच्या पाठीवर ओझे टाकून मजल दरमजल करत केलेल्या प्रवासाला डाँकी फ्लाइट्स हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. यूकेमध्ये ज्या देशात घुसखोरी करायची आहे, त्याच्या आसपासच्या असलेल्या देशांचा पर्यटन व्हिसा प्राप्त करून त्या देशात पाऊल ठेवायचे आणि नंतर गुप्त मार्गाने हव्या असलेल्या देशात प्रवेश मिळवायचा, अशा पद्धतीने अवैध घुसखोरी केली जाते.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, इमिग्रेशन धोरणातील कमतरतेचा फायदा उचलून यूके किंवा यूएसमध्ये घुसखोरी करण्यासाठी डाँकी फ्लाइट्सचा मार्ग अवलंबला जातो, ज्यामध्ये एका देशातून दुसऱ्या देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न होतो. उदाहरणार्थ युरोपियन युनियनमधील शेंजेन देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना पर्यटन व्हिसा मिळतो. युरोपियन युनियनमध्ये एका देशातून दुसऱ्या देशात प्रवेश करण्यासाठी या व्हिसाचा वापर केला जातो.
मागच्या वर्षीपर्यंत ज्या लोकांना पश्चिम युरोपात प्रवेश करायचा होता, ते लोक सर्बिया देशाचा व्हिसा मिळवून तिथे ३० दिवस वास्तव्य करत असत. या ३० दिवसांत ट्रॅव्हल एजंट किंवा मानवी तस्करीचा व्यवसाय करणारी मंडळी भारतीय लोकांसाठी सर्बिया ते इटली अशा डाँकी समुद्रमार्गाचे नियोजन करून देत असत. सर्बियाच्या एका बाजूला ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया आणि क्रोएशिया देश आहेत; तर दुसऱ्या बाजूला मॅसेडोनिया आणि ग्रीस आहेत. अशाप्रकारे सर्बियामधून युरोपियन युनियन (EU) किंवा शेंजेन देशांमध्ये प्रवेश करणे सोपे होते.
डाँकी फ्लाइट्स हे तंत्र एक खुले रहस्य आहे. यूट्यूबवर जाऊन यूएसए डाँकी (USA Donkey) असे सर्च केल्यानंतर हिंदी किंवा पंजाबी भाषेतील अनेक व्हिडीओ समोर येतात. या व्हिडीओमधून अवैधरित्या सीमा ओलांडण्याचे तंत्र सांगितले जाते. एका गटाने तर पनामा जंगलातून सीमा पार केल्याचा ब्लॉग तयार करून अपलोड केलेला आहे.
डाँकी फ्लाइट्स पद्धत कुणाकडून अधिक वापरली जाते?
डाँकी फ्लाइट्सचा अवैध व्यवसाय पंजाबमध्ये बराच पसरलेला आहे. वाढती लोकसंख्या, बेरोजगारी आणि चांगल्या आयुष्याच्या शोधात पंजाबमधील अनेक तरुण परदेशात जाऊन स्थायिक होण्याचे स्वप्न पाहतात. पंजाबनंतर हा अवैध व्यवसाय शेजारच्या हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतही पसरला आहे. गुजरातमध्येही गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गुजरातमध्येही परदेशात जाऊन स्थायिक होण्याबाबत एक अहमहमिका असल्याचे दिसते.
अवैध घुसखोरीची पद्धत कशी आहे?
परदेशात जाऊन सुंदर आयुष्य व्यतीत करण्याचे स्वप्न पाहणारे तरुण जेव्हा ट्रॅव्हल एजंटकडे जातात, तेव्हाच फसवणुकीची खरी सुरुवात होते. अतिशय कमी दरात व्हिसा मिळवून देऊ असे आमिष हे ट्रॅव्हल एजंट तरुणांना देतात. काही ट्रॅव्हल एजन्सी नियमानुसार नोंदणीकृत आहेत, तर काही अवैधरितीने आपला व्यवसाय चालवितात.
कुरुक्षेत्र शहरातील कॅम्ब्रिज एज्युकेशन अँड इमिग्रेशन पॉईंट या कंपनीचे सहमालक भूपिंदर खानपूर यांनी द प्रिंट या वृत्त संकेतस्थळाशी बोलताना सांगितले, एजंट आधी विद्यार्थी व्हिसा देण्याचे आमिष दाखवितात. जर विद्यार्थी व्हिसा नाकारला गेला तर मग अवैध मार्गाचा अवलंब केला जातो.
परदेशात जाण्यासाठी इच्छुक असलेले लोक एजंटना भरमसाठ शुल्क देतात आणि अतिशय जोखमीच्या मार्गावरून मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतात. कधी कधी या मार्गावरून जाताना विना अन्नपाण्याचा प्रवास करावा लागतो. उदाहरणार्थ एजंट्सना डाँकर्स म्हटले जाते. असे एजंट त्यांच्याकडे भरमसाठ पैसे देणाऱ्या लोकांना कोलंबिया ते पनामा प्रवास करण्यासाठी डॅरियन गॅपचा संपूर्ण परिसर पायी चालून पलीकडे जाण्यास सांगतात. घनदाट जंगलाने वेढलेला आणि १६० किमी लांबीपर्यंत पसरलेला हा परिसर आहे. विषारी साप आणि जीवघेण्या आजारापासून स्वतःचे रक्षण करत अनेक लोक उपाशीपोटी प्रवास करून हे अंतर पार करतात.
ही सर्व जीवघेणी कसरत करण्यामागे कारण एकच असते. कसेही करून युनायटेड स्टेट्समध्ये प्रवेश मिळवायचा आणि त्या ठिकाणी जाऊन आपले स्वप्न पूर्ण करायचे.
मनप्रीत ब्रार यांना यूएसने भारतात हद्दपार केले. ब्रार यांनी इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितले, “मी १२ लोकांच्या एका गटासह तब्बल दहा दिवस पनामा आणि कोलंबियामधील घनदाट जंगलातून पायी प्रवास केला. आमच्याकडे असलेले पुरेसे पाणी काही दिवसांतच संपून गेले. मोठ मोठे डोंगर आणि काटेरी रस्ते त्या दमट हवामानात पार करावे लागतात. अधूनमधून पडणारा पाऊस हा प्रवास आणखी खडतर बनवतो. देवाच्या कृपेमुळेच आम्ही ते अंतर पार करू शकलो.”
जानेवारी २०२२ मध्ये कॅनडातून अमेरिकेत प्रवास करणाऱ्या एका गुजराती कुटुंबातील चार जणांचा थंडीने गोठून मृत्यू झाला होता. यामध्ये ३ आणि ११ वर्षीय दोन मुलांचा समावेश होता. अमेरिकेच्या सीमेपासून केवळ १० मीटर अंतरावर चौघांचे मृतदेह आढळले होते.
यूकेमध्ये प्रवास करण्यासाठी अशीच पद्धत वापरली जाते. एजंटकडून परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना शेंजेन देशात पाठवितात. जर्मनी, बेल्जियम किंवा फ्रान्स या देशांमध्ये बहुतेक करून पाठविले जाते. त्या देशात असलेले ‘सल्लागार’ वाहन परवाना, वास्तव्याचा परवाना असे खोटे कागदपत्र बनवून देतात. या कागदपत्राच्या आधारावर या लोकांना यूकेमध्ये धाडले जाते.
जोखीम असूनही डाँकी मार्गाचा अवलंब का केला जातो?
जादा पैसे कमावण्याची इच्छा, चांगली जीवनशैली यासाठी अनेक भारतीयांमध्ये परदेशात जाण्याची उत्कट इच्छा निर्माण झालेली आहे. यूकेच्या कॉव्हेंट्रीमधील वॉरविक विद्यापीठातील प्राध्यापक विरींदर सिंग कालरा यांनी वायर या वृत्त संकेतस्थळाशी बोलताना सांगितले की, पंजाबी सिंगर आणि रॅपर सिद्धू मुसेवालाचे उदाहरण पाहा. भारतात असताना त्याच्याकडे काहीच नव्हते, पण तो कॅनडामधील ब्रॅम्प्टन शहरात गेला आणि त्यानंतर कोट्याधीश झाला. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की, परदेशात जाऊन ते जलदगतीने आणि सोप्या पद्धतीने खूप सारे पैसे कमावू शकतात. हे फक्त एक स्वप्न आहे, याचीही अनेकांना जाणीव असते; तरीही या स्वप्नपूर्तीची प्रेरणा अनेकांना मिळत राहते.
यूएस-यूकेमध्ये यावर्षीही भारतीयांचा अवैध शिरकाव
वॉल स्ट्रीट जर्नलने ऑक्टोबर महिन्यात दिलेल्या बातमीनुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये जवळपास ४२ हजार भारतीय नागरिकांनी अवैधरित्या अमेरिकेन सीमा ओलांडून प्रवेश केला. मागच्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्याशी याची तुलना करायची झाल्यास ही संख्या दुपटीने वाढली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक भारतीयांनी अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश केला.
यूकेमध्येही अशाच प्रकारे लोकांचा ओढा दिसतो. यूके गृह खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यूकेमध्ये अवैधरित्या प्रवेश मिळवणाऱ्यांपैकी भारतीय नागरिकांचा गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लिश खाडीमधून अतिशय छोट्या बोटीतून धोकादायक पद्धतीने प्रवास करून स्थलांतरित नागरिक यूकेमध्ये प्रवेश करतात. यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात ६७५ भारतीय नागरिकांनी छोट्या बोटींमधून यूकेमध्ये प्रवेश केला. यूकेने वर्क व्हिसावर निर्बंध लादल्यानंतर हे स्थलांतर झाले.