शहीद भगत सिंग हे यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल सर्वश्रुत आहे. परंतु त्यांनी मांडलेले जाती व्यवस्थेविषयीचे विचार फारसे माहीत नसतात. २३ मार्च या क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव त्यांच्या हौतात्म्य दिनाच्या निमित्ताने शहीद भगत सिंग यांनी मांडलेल्या जाती आणि अस्पृश्यतेवरच्या मतांचा घेतलेला थोडक्यात आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा: पाकिस्तानने चोरला भारताचा बासमती तांदूळ; परिस्थिती खरंच किती चिंताजनक?

‘कीर्ती’साठी लिहिलेल्या लेखात मांडलेले विचार

भगत सिंग हे जातीचा प्रश्न हाताळणाऱ्या सुरुवातीच्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते, त्यांनी काही मुद्द्यांवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संवाद साधला, तर काही मुद्द्यांसंदर्भात त्यांच्याशी त्यांचे मतभेदही होते. त्यांनी १९२८ च्या जून महिन्यात डाव्या विचारसरणीचे प्रकाशन ‘कीर्ती’साठी लिहिलेल्या एका लेखात अस्पृश्यता आणि जात या संदर्भात विस्तृत चर्चा केली आहे. त्यांनी आर्य समाजाच्या विचारापेक्षा पूर्णपणे भिन्न मत व्यक्त केले आहे. आर्य समाज ‘अस्पृश्यांना’ हिंदू समाजात समाविष्ट करण्यासाठी शुद्धी (शुद्धीकरण) प्रथेचा वापर करत होता. ‘उच्च जातींनीं’ हिंदू समाजात दलितांना सामावून घेतले नाही तर, नंतरचे लोक इतर धर्मात धर्मांतरित होतील आणि स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेल्या उच्च जातींशी मोठ्या प्रमाणात संबंध तोडतील, अशी भीती आर्य समाज आणि महात्मा गांधी या दोघांनाही होती. तर भगत सिंग यांना धर्मांच्या स्पर्धेतील एक सकारात्मक पैलू दिसला, सर्व धर्मांना त्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘अस्पृश्यांना’ ‘सामावून घेणे’ आवश्यक होते. निवडीसाठी वेगवेगळे पर्याय आहेत. ख्रिश्चन शांतपणे त्यांचा दर्जा वाढवत आहेत. एका अर्थाने हे चांगले आहे, या घडामोडींमुळे किमान देशावरचा शाप पुसट होत आहे,” असे त्यांनी कीर्तीमध्ये लिहिले होते.

तुमचे बलिदान सोन्याच्या अक्षरात लिहिलेले आहे

बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘स्वायत्त’ दलित राजकारणाशी मेळ घालणारे एक मत सिंग यांनी मांडले आहे, “जोपर्यंत अस्पृश्य म्हणून वर्गीकृत असलेल्या जाती स्वत: संघटित होत नाहीत तोपर्यंत समस्या सुटणार नाही. मला वाटते की, त्यांनी स्वतंत्र गट तयार केल्यामुळे समान अधिकार मागणे… हे एक उत्साहवर्धक लक्षण आहे. माझा प्रस्ताव आहे की त्यांचे स्वतःचे प्रतिनिधी (विधिमंडळात) असावेत जेणेकरून ते त्यांचे हक्क मागू शकतील. मी स्पष्टपणे सांगतो, ‘बंधूंनो, तथाकथित अस्पृश्य, जनतेचे खरे सेवक उठा, तुम्ही गुरु गोविंद सिंग यांच्या सैन्यात खरे पराक्रमी होता. शिवाजी महाराज इतकं काही करू शकले, त्याचं नाव आजही तुमच्या मदतीनं उजळून निघतं आहे’, “तुमचे बलिदान सोन्याच्या अक्षरात लिहिलेले आहे… असं लोक म्हणतात, ही शक्ती समजून घ्या. संघटित व्हा आणि संपूर्ण जगाला आव्हान द्या. म्हणजे तुमचा हक्क कोणीही नाकारणार नाही. इतरांसाठी चारा बनू नका. मदतीसाठी इतरांकडे पाहू नका.”

नोकरशाही आणि भांडवलदार तुमच्या गुलामगिरीला कारणीभूत..

परंतु, भगत सिंग यांचे एक मत हे आंबेडकरांच्या स्वायत्ततेच्या रेषेला छेद देणारेही होते, ‘त्यांनी दलितांना ब्रिटीश वसाहतवादी राज्यापासून दूर राहावे असा आग्रह धरला: ते लिहितात, “पण नोकरशाहीपासून सावध रहा. त्यांच्या फसवणुकीला बळी पडू नका. हे तुम्हाला मदत करू इच्छित नाहीत. ते तुम्हाला त्याचे प्यादे बनवू इच्छितात. खरे तर ही नोकरशाही आणि भांडवलदार तुमच्या गुलामगिरीला कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्यात कधीही सामील होऊ नका.”

लाला लजपत राय आणि भगतसिंग यांचे नाते गुंतागुंतीचे होते. राय यांच्या हिंदू महासभेत सामील होण्याबद्दल सिंह यांना तीव्र आक्षेप असला तरी दलित प्रश्नावर ते या काँग्रेस नेत्याशी प्रामाणिक होते. अस्पृश्यांना पवित्र धागा (जानवं) घालण्याचा आणि वेद- शास्त्रे वाचण्याचा अधिकार आहे की नाही या विषयावर पाटणा येथील हिंदू महासभेत झालेल्या चर्चेचा संदर्भ देताना सिंग यांनी राय यांचे योगदान मान्य केले: “लालाजींनी हस्तक्षेप करून या दोन्ही गोष्टींचा अधिकार मान्य करून हिंदू धर्माचा सन्मान वाचवला.”

अधिक वाचा: ‘या’ क्रूरकर्मा मुघल सम्राटाने दिल्लीत केली होती मद्यबंदी! नेमके काय घडले होते?

कर्म सिद्धांतावर कठोर टीका

धार्मिक समुदायांमधील सर्व शुद्धीकरण विधी टाळून, भगत सिंग यांनी दलितांच्या संपूर्ण आणि बिनशर्त समाजात एकात्मतेची बाजू घेतली: ते लिहितात, “आपण त्यांना अमृत घेण्यास, कलमा वाचण्यास किंवा शुध्दीसाठी जाण्यास न सांगता आपल्या समुदायाचा भाग केले पाहिजे. … त्यांना वास्तविक जीवनात अधिकार न देता त्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी भांडणे लावणे योग्य नाही.”
या लेखात, भगत सिंग यांनी कर्म सिद्धांतावर कठोर टीका केली, ते म्हणतात, कर्म सिद्धांताचा उपयोग आपल्या पूर्वजांनी दलितांच्या अधीनतेचे समर्थन करण्यासाठी केला. “आमच्या आर्य पूर्वजांनी त्यांच्यावर अन्याय केला… यामुळे ते बंड करू शकतात अशी त्यांना भीती होती, म्हणून त्यांनी पुनर्जन्माचे तत्वज्ञान मांडले. तुम्ही जे आहात ते तुमच्या मागील जन्माच्या कर्मामुळे आहे, असे त्यांच्या मनावर ठसवले.

पाश्चात्य देशांमध्ये भारतीयांशी झालेल्या वाईट वागणुकीबद्दल तक्रार केली जाते त्याविषयी भगत सिंग म्हणतात भारतीय हे पाश्चिमात्यांना भौतिकवादी म्हणतात तर स्वतःला आध्यात्मिक, त्यांचे संपूर्ण अध्यात्म हे आत्मा आणि ईश्वर यांनी व्यापलेले आहे, आत्मा आणि देव हे मानवाला समान ठरविण्यास असमर्थ ठरलेले आहेत. जातिव्यवस्था ही ‘विकासा’च्या विरोधात आहे, कारण त्यामध्ये कामगाराच्या श्रमाला प्रतिष्ठा नाही, असेही ठाम मत भगतसिंग यांनी व्यक्त केले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaheed bhagat singhs message to the dalit community get organized and challenge the world svs