Sambhal Shahi Jama masjid name will be as Juma masjid: एखाद्या ऐतिहासिक वास्तूचे नाव बदलले की, तो केवळ फलकावरचा मजकूर बदलण्याचा निर्णय नसतो, तो अनेकदा त्या वास्तूशी जोडलेल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि सामाजिक भावनांचा पुनर्विचार असतो. उत्तर प्रदेशातील संभल येथील ‘शाही जामा मशीद’ ही अशीच एक वादग्रस्त वास्तू आहे, जी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ASI या मशिदीबाहेरचा फलक बदलण्याचा निर्णय घेतला असून, आता या वास्तूला ‘शाही जामा मशीद’ऐवजी ‘जुमा मशीद’ या नावाने संबोधलं जाणार आहे. एखाद्या मशिदीचे नाव शाही असावे की धार्मिक कार्याशी संबंधित असावे. हा वाद केवळ भाषिक फरक नाही, तर तो ऐतिहासिक दस्तऐवज, धार्मिक संवेदनशीलता आणि सामाजिक जाणिवा या तीनही अंगांना स्पर्श करणारा मुद्दा आहे.
मूळ नावाने संबोधणार
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) उत्तर प्रदेशातील संभल शहरातील वादग्रस्त शाही जामा मशिदीबाहेरचा फलक बदलून या वास्तूला ‘तिच्या मूळ नावाने’ संबोधणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने नवा फलक मशिदीशेजारील ‘सत्यव्रत पोलीस चौकी’च्या आत ठेवला असून लवकरच सध्याचा ‘शाही जामा मशीद’ असा हिरव्या रंगातील बोर्ड काढून, त्याऐवजी निळ्या रंगातील ‘जुमा मशीद’ असे नाव असलेला नवा बोर्ड लावण्यात येणार आहे.
न्यायालयात जुमा मशीद हेच नाव
मेरठच्या शास्त्रीनगरमधील भारतीय पुरातत्त्व युनिटमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “अलीकडेच रमजानपूर्वी मशिदीत पांढऱ्या रंगाने रंगकाम करण्यासंदर्भातील एका याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना मशिदीच्या मूळ नावावरून न्यायालयात वाद निर्माण झाला. १९२७ साली भारत सरकार आणि मशिदीच्या कमिटीमध्ये झालेल्या एका करारात या मशिदीचा उल्लेख ‘जुमा मशीद’ असा आहे आणि भारतीय पुरातत्त्व खात्याच्या नोंदींमध्येही तसाच आहे. आम्ही फक्त या वास्तूचे मूळ नाव देत आहोत… कुणालाही यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही.” गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी संभलमध्ये शाही जामा मशीदीवर न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर उसळलेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता. एक पुजारी आणि इतर सहा जणांनी दावा दाखल करून सांगितले होते की, मशिदीच्या जागी पूर्वी एक मंदिर होते. यामुळे हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
जामा आणि ‘जुमा’ यातील फरक
जामा मशीद यातील जामा किंवा जमा म्हणजे एकत्र येणे. म्हणूनच जामा मशीद ही ‘सार्वत्रिक/मोठी शुक्रवारचा नमाज होणारी मशीद असते तर जुमा म्हणजे शुक्रवार. जामा मशीद हा शब्द भारतात प्रामुख्याने मुघलकालीन मशिदींसाठी उत्तर भारतात वापरला गेला आहे. जुमा मशीद हा शब्द दक्षिण भारतात किंवा अरबी प्रभाव असलेल्या भागात अधिक प्रचलित आहे.
‘शाही’ जामा आणि ‘जुमा’ यातील फरक
शाही म्हणजे राजघराण्याशी संबंधित किंवा शाही संरक्षित मशीद. अशा मशिदी विशेषतः मुघल बादशाहांनी बांधलेल्या असतात. दिल्लीची जामा मशीद हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. यामध्ये राजकीय-सांस्कृतिक ओळख असते. हा शब्द केवळ त्या मशिदीच्या कार्यात्मक भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. तेथे फक्त शुक्रवारचा मुख्य नमाज अदा केला जातो. यात कोणत्याही राजसत्तेचा विशेष उल्लेख नसतो.
राजकीय-सांस्कृतिक संदर्भ (Cultural-Political Context):
‘शाही जामा मशीद’ हा शब्द वापरणे काहीजण मुघल इतिहासाशी जोडलेला मानतात. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये या शब्दात धार्मिक किंवा ऐतिहासिक संवेदनशीलता असू शकते. ‘जुमा मशीद’ हे नाव धार्मिकदृष्ट्या तटस्थ आणि कार्याधिष्ठित असल्यामुळे काही मंडळींना ते अधिक स्वीकारार्ह वाटते.
नावावरून वाद
इतिहास, श्रद्धा आणि दस्तऐवज यांचे संबंध जेव्हा एकमेकांत गुंततात, तेव्हा नावातील बदलही विवादाचे कारण ठरू शकतात. ‘शाही जामा मशीद’ हे नाव मुघलकालीन परंपरेची आठवण करून देत असले, तरी ‘जुमा मशीद’ हे नाव या वास्तूच्या दस्तऐवजांत सापडते. भारतीय पुरातत्त्व विभागाने या बदलाकडे केवळ ऐतिहासिक सत्यता जपण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं असलं, तरी सामाजिक विचार आणि संवेदनशीलतेने याकडे पाहणं गरजेचं आहे. कारण इमारतींच्या दगडांखालून केवळ इतिहासच नाही, तर आजचं वास्तवही झिरपत असतं.