मूळ उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील ३३ वर्षीय शहजादी खानला अबूधाबीमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिच्या देखरेखीखाली असलेल्या मुलाच्या कथित हत्येप्रकरणी यूएई न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली असून आता तिला अल वाथबा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. पूर्वीच्या वृत्तांमध्ये असे सुचवण्यात आले होते की, शहजादी खान हिला तिच्या घरी शेवटचा फोन कॉल केल्यानंतर २४ तासांच्या आत फाशीची शिक्षा सुनावली जाईल.

परंतु, भारतीय दूतावासाने नंतर स्पष्ट केले होते की, पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे आणि प्रकरण अद्याप विचाराधीन आहे. गेल्या वर्षी महिलेचे वृद्ध वडील शब्बीर खान यांनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आखाती राज्यातील सत्ताधारी कुटुंब तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दयेची भावनिक विनंती केली होती. पण, शहजादी खान यूएईमध्ये गेली कशी? तिच्यावर काय आरोप आहेत? नेमके प्रकरण काय? जाणून घेऊ.

शहजादी खान कोण आहे?

शहजादी खानचा अबूधाबीचा प्रवास २०२१ मध्ये सुरू झाला. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील गोयरा मुगली गावातील रहिवासी असणारी शहजादी कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान ‘रोटी बँक ऑफ बांदा’ नावाच्या संस्थेमध्ये काम करत होती. याच काळात ती आग्रा येथील सामाजिक कार्यकर्ता आणि व्यापारी उझैरशी फेसबुकच्या माध्यमातून जोडली गेली. तिचे वडील शब्बीर खान शेतकरी आहेत. ते म्हणाले की, उझैरने तिला चांगल्या भविष्याचे आश्वासन दिले. तिला लहानपणी झालेल्या गंभीर दुखापतीसाठी वैद्यकीय उपचारांचे आश्वासनही दिले होते.

शहजादी खानला अबूधाबीमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

लहान असताना उकळते पाणी चुकून तिच्यावर सांडले होते. शब्बीरने ‘द इंडिपेंडंट’ला सांगितले की, उझैरने तिला सांगितले की, तो तिला यूएईमध्ये अधिक चांगले वैद्यकीय उपचार मिळवून देऊ शकेल आणि परिस्थितीनुसार तिला तिथे नोकरीही मिळेल. “त्याने तिला सांगितले की, त्याचे काका आणि काकू अबूधाबीमध्ये राहतात आणि ते पर्यटक व्हिसासाठी मदत करू शकतात आणि ती तिथे असताना त्यांच्यासाठी काम करू शकते,” असे त्यांनी सांगितले.

“शहजादी द्विधा मनस्थितित होती, तेव्हा उझैरने तिला धीर दिला. व्हिसा फक्त ९० दिवसांसाठी आहे आणि त्यानंतर तू परत येऊ शकतेस,” असे उझैरने शहजादीला सांगितल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. पण, जेव्हा ती नोव्हेंबर २०२१ मध्ये अबूधाबीला गेली तेव्हा शब्बीर यांनी दावा केला की, त्यांच्या मुलीला समजले की तिचा व्हिसा प्रत्यक्षात सहा महिन्यांचा आहे आणि तिला एका विवाहित जोडप्याला बंधपत्रित मजूर म्हणून विकले गेले आहे, ज्यांचे नाव फैज आणि नादिया आहे. आता दुबईत राहणाऱ्या या जोडप्याविरुद्ध अधिकाऱ्यांनी मानवी तस्करीचा गुन्हाही दाखल केला आहे.

त्यांच्या चार महिन्यांच्या बाळाची काळजी घेणे ही शहजादीची प्राथमिक जबाबदारी होती. सुरुवातीला शब्बीर यांनी सांगितले की, तिने परिस्थिती स्वीकारली, कारण किमान तिला अन्न आणि निवारा मिळत होता. “पण जेव्हा मला दहा दिवस तिचा फोन आला नाही तेव्हा मी काळजीत पडलो. मी तिला रोज फोन करायचो, पण मला प्रतिसाद मिळाला नाही,” असेही त्यांनी सांगितले.

तिच्यावर आरोप काय?

फेब्रुवारी २०२२ मध्ये शहजादीच्या देखरेखीखाली असलेल्या चार महिन्यांच्या बाळाचे निधन झाले तेव्हा या प्रकरणाची सुरुवात झाली. ज्या जोडप्यासाठी शहजादीने काम केले होते त्यांनी लगेचच तिला त्यांच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यानंतर तपास सुरू झाला; ज्यामुळे शहजादीला अटक झाली आणि अखेरीस अबूधाबी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या दस्तऐवजानुसार, शहजादीवर बाळाला गुदमरून मारल्याचा आरोप होता. खटल्यादरम्यान कोर्टाला सांगण्यात आले की, ती गैरवर्तणूक आणि पगार न दिल्याने नाराज होती आणि तिने तिचा राग बाळावर काढला. परंतु, शहजादी आणि तिचे वडील दोघांनीही मुलाचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाल्याचे ठामपणे सांगितले. त्यांचा दावा आहे की त्या दिवशी बाळाला लस दिली होती आणि त्याला ताप येत होता.

शब्बीरने ब्रिटीश प्रकाशनाला सांगितले की, त्याच्या मुलीला बाळाच्या आईने फसवले आणि खोट्या कबुलीजबाबावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले, ज्यामुळे तिला चुकीची शिक्षा झाली. “तिने ते केले नाही. माझी मुलगी निर्दोष आहे,” असे ते आर्थिक अडचणींमुळे तिला योग्य कायदेशीर प्रतिनिधित्व मिळू न शकल्याने निराशा व्यक्त करत म्हणाले. १६ फेब्रुवारी रोजी शहजादीच्या कुटुंबाला दुबईतून एक शेवटचा कॉल आला. तिने त्यांना माहिती दिली की, तिला तुरुंगात ठेवण्यात आले आहे आणि तुरुंगाच्या कॅप्टनने तिला फाशी दिली जाईल असे सांगितले होते.

शहजादीला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांचा लढा

बऱ्याच काळापासून शहजादीचे पालक तिच्या परत येण्याची आतुरतेने आशा करत होते. गेल्या वर्षी त्यांनी सरकार आणि राष्ट्रपतींना पत्र लिहून दयेची मागणीही केली होती. आपल्या पत्रात शब्बीर यांनी सखोल चौकशीची मागणी केली, ज्यात त्यांनी नमूद केले होते की त्यांचा असा विश्वास आहे की आपल्या मुलीला जाणीवपूर्वक बाळाच्या मृत्यूप्रकरणी फसवण्यात आले आहे. त्यांनी उझैरच्या अटकेचीदेखील मागणी केली. “माझ्या मुलीची फाशीची शिक्षा सुरुवातीला २ मे २०२३ रोजी नियोजित होती,” असे त्यांनी ‘द इंडिपेंडंट’ला सांगितले.

परंतु, यूएईमध्ये तीव्र पूर आल्याने आणि शाही कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे ही शिक्षा पुढे ढकलण्यात आली. “परंतु एका अधिकाऱ्याने या महिन्याच्या सुरुवातीला माझ्या मुलीला सांगितले होते की, २० सप्टेंबरनंतर तिला कधीही फाशी दिली जाऊ शकते,” असेही त्यांनी सांगितले. तिच्या अखेरच्या फोन कॉलनंतर माहिती समोर आली की तिला २४ तासांच्या आत फाशी दिली जाऊ शकते. परंतु, यूएई अधिकाऱ्यांनी भारतीय दूतावासाला सूचित केले आहे की, शहजादीला त्वरित फाशी देण्याची योजना नाही.

“शहजादीला २४ तासांत फाशी दिली जाईल ही माहिती चुकीची आहे. दूतावासाने यूएई अधिकाऱ्यांकडून याला दुजोरा दिला आहे. तिच्या प्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. जसजसे दिवस जात आहेत तसतसे शहजादीचे कुटुंब न्यायाची वाट पाहत आहेत आणि त्यांची मुलगी परत येण्याची आशा करत आहे. “आम्ही तिला देवावर विश्वास ठेवायला सांगितला आहे, तो तिला वाचवेल,” असे शब्बीर म्हणाले.

Story img Loader