आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी शनिवारी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव-१ पी के मिश्रा यांच्यासोबत ते प्रधान सचिव-२ म्हणून काम पाहतील. इतिहासात शक्तिकांत दास हे एकमेव आहेत, ज्यांना आर्थिक धोरण आणि वित्तीय धोरणाअंतर्गत महत्त्वाच्या पदी काम करण्याचा अनुभव आहे. दास हे आरबीआयचे दुसरे असे गव्हर्नर होते जे सलग सहा वर्षे या पदावर होते. याआधी १९९७ ते २००३ या कालावधीत बिमल जलन हे गव्हर्नर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहेत शक्तिकांत दास?
शक्तिकांत दास हे मूळचे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथले रहिवासी आहेत. ते तामिळनाडू केडरचे १९८० च्या बॅचचे आएएस अधिकारी आहेत. त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून इतिहास या विषयात पदवी घेतली आहे. २०१४ मध्ये त्यांनी खतं सचिव म्हणून काम पाहिले आहे. केंद्रात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. केंद्रात सचिव, अर्थ सचिव म्हणनूही ते कार्यरत होते. तामिळनाडू सरकारमध्येही ते कार्यरत होते.
एनडीए सरकारच्या नेतृत्वाखाली अर्थ मंत्रालयात महसूल सचिव या पदावर ते कार्यरत होते, तर ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांना आर्थिक व्यवहार सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. नंतर २०१७ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले. दास हे १५ व्या वित्त आयोगाचे सदस्यदेखील होते.

२०१८ ते २०२४ या कालावधीत त्यांनी आरबीआय गव्हर्नर म्हणून काम पाहिले. त्यांच्या नियुक्तीने अनेकांना धक्का बसला होता, कारण दास यांनी इतिहासात एमए केलं आहे. उर्जित पटेल गव्हर्नरपदी असतानाच केंद्र सरकारने निश्चलीकरणाचा निर्णय घेतला होता. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर दास यांची या पदी नियुक्ती करण्यात आली होती. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील त्यांच्या कार्यकाळादरम्यान ते तब्बल आठ केंद्रीय अर्थसंकल्पांमध्ये थेट संबंधित होते. दास यांनी वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकांमध्ये भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणनूही काम पाहिले आहे. तसंच आयएमएफ, G20, ब्रिक्स परिषद, SAARC अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, या काळात आरबीआयने बरेच चढ-उतार पाहिले. इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस कोलमडणे, नॉन-बँकिंग कंपन्यांवर होणारे परिणाम यांसह अनेक देशांतर्गत अडचणींचाही सामना केला. याशिवाय कोविड आणि रशिया-युक्रेन युद्धाचे परिणामही झालेच.

२००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यासंदर्भातही त्यांनी काम पाहिले. दास यांनी यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस), RuPay, कार्ड पेमेंट नेटवर्क, डिजिटल पेमेंट्स यावरही लक्ष केंद्रित केले होते. तसंच गेल्या सहा वर्षांत अन्नधान्य महागाई हे त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान राहिले आहे.

प्रधान सचिव पदाच्या जबाबदाऱ्या काय आहेत?
प्रधान सचिव हे पंतप्रधान कार्यालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात आणि ते पंतप्रधानांचे सर्वात महत्त्वाचे सहाय्यक मानले जातात. सध्या १९७२ च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी प्रमोद कुमार मिश्रा हे प्रधान सचिव-१ आहेत. दास हे प्रधान सचिव-२ म्हणून काम पाहतील. केंद्र सरकारच्या नियुक्ती समितीने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, दास यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळासोबत किंवा पुढील आदेश येईपर्यंत कायम असेल.

साधारणपणे पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, पंतप्रधानांचे सल्लागार, अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असतो. प्रधान सचिव पदावरील व्यक्तीस पंतप्रधान आणि फॉरेन डेलिगेट्समधील चर्चा करण्यासंदर्भात मुद्दे तयार करणं, विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये समन्वय निश्चित करणं, पंतप्रधानांसमोर महत्त्वाचे आदेश सादर करणं अशी कामं सोपवली जातात