– सिद्धार्थ खांडेकर
ऑस्ट्रेलियाचा विख्यात फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने अवघ्या ५२व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे जगभरचे तमाम क्रिकेटप्रेमी हळहळले आहेत. नव्वदच्या दशकात आणि २०००मधील पहिल्या दशकात वॉर्नच्या जादुई फिरकीने क्रिकेटमधील या नजाकती कौशल्याला संजीवनी मिळाली असे म्हणावे लागेल. सातशेहून अधिक कसोटी बळी आणि त्यांतील अनेक बळींच्या मागे दडलेली नाट्यमयता, तसेच अनेक वादांच्या केंद्रस्थानी राहूनही सर्व प्रकारच्या क्रिकेटवर – कसोटी ते आयपीएल – अतोनात प्रेम, क्रिकेटमधील बारकाव्यांची सखोल जाण हे गुण शेन वॉर्नला महानतम फिरकी गोलंदाज आणि महानतम क्रिकेटपटूंपैकी एक बनवतात.
अडखळती सुरुवात…
लेगस्पिन गोलंदाजीची जराही पत्रास न बाळगणाऱ्या सचिन आणि शास्त्री कंपनीसमोर १९९२मध्ये सिडनी कसोटीत वॉर्नचे पदार्पण झाले. त्या सामन्यात त्याला अवघा १ बळी मिळाला आणि त्यासाठी १५० धावा मोजाव्या लागल्या. ऑस्ट्रेलियन संघ तेव्हा बऱ्यापैकी बलाढ्य होता, वॉर्नसारख्या तुंदिलतनू लेगस्पिनरची गरज त्यांना फारशी भासत नव्हती. तरीही प्रथम श्रीलंका आणि नंतर घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने केलेली कामगिरी उत्तम होती आणि त्याचे संघातील स्थान टिकून राहिले.
‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ आणि वॉर्नयुगाची सुरुवात!
अॅशेस मालिकेत १९९३मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीपूर्वी वॉर्नने ११ सामन्यांत ३१ बळी घेतले होते. मँचेस्टरच्या थंडीत दुसऱ्या दिवशी वॉर्न इंग्लंडमधील पहिला कसोटी चेंडू टाकण्यासाठी सरसावला. समोर होता इंग्लंडचा मुरब्बी फलंदाज माइक गॅटिंग. वॉर्नचा पहिलाच चेंडू लेगस्टंप लाइनच्या बाहेर पडला, दोन फूट आत वळला आणि गॅटिंगच्या ऑफस्टंच्या शिरावर आदळून स्थिरावला. क्षणभर आपण त्रिफळाचीत झालो हे गॅटिंगला उमगलेच नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा जल्लोष पाहून त्याने मागे वळून पाहिले आणि त्याला वस्तुस्थिती समजली. तो पॅव्हेलियनमध्ये परतेपर्यंत त्याच्या चेहऱ्यावरी धक्कायुक्त प्रश्नचिन्ह कायम होते. तो क्षण शेन वॉर्नची संपूर्ण कारकीर्द व्यक्त करणारा ठरला. अफाट गुणवत्ता आणि जोडीला त्या तोडीची नाट्यमयता ही त्याची वैशिष्ट्ये अखेरपर्यंत राहिली.
मॅच फिक्सिंग, ड्रग्ज आणि विस्डेनचा बहुमान!
सर जॅक हॉब्ज, सर डॉन ब्रॅडमन, सर गॅरी सोबर्स, सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि शेन वॉर्न… सन २०००मध्ये विस्डेनचे शतकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटू म्हणून या पाचांची नावे घोषित झाली. त्यांतील वॉर्न वगळता उर्वरित कधी मॅच फिक्सिंगमध्ये गुंतले नव्हते (१९९५) किंवा त्यांनी कधी ड्रग्ज घेतल्याचेही (२००३) आढळून आले नाही. याव्यतिरिक्त सिगारेट व्यसनमुक्तीच्या जाहिराती करूनही, चोरून ती ओढताना पकडला जाणे किंवा कौंटी क्रिकेट सामन्यांदरम्यान युवतींबरोबर आक्षेपार्ह वर्तन करताना सापडणे हेही होत राहिले. बाईलवेडापायी त्याचे लग्न संपुष्टात आले. पुढे ब्रिटिश तारका-मॉडेल एलिझाबेथ हर्लेबरोबर तो राहू लागला. पण ती जोडीही वॉर्न एका पॉर्नस्टारबरोबर आढळल्यानंतर संपुष्टात आली. इतके सगळे होत असतानाही त्याचे बळी घेणे थांबले नाही.
झळाळती कारकीर्द
कसोटी क्रिकेटमध्ये ७०८ बळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २९३ बळी, १९९९मध्ये विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य. तरीही कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ९९ धावा, पण शतक नाही. म्हणजे पुन्हा नाट्यमयता.
लेगस्पिन गोलंदाजीमध्ये निष्णात
दंड, मनगट आणि खांद्यातील ताकद वापरून वॉर्न चेंडूवर अधिकाधिक आवर्तने आणायचा प्रयत्न करी. त्याचा रनअप छोटा आणि त्यामुळेच फलंदाजांवर दबाव आणणारा ठरायचा. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा असे अपवाद वगळल्यास, म्हणजे त्या दर्जाचे महान फलंदाज सोडले तर बहुतेक फलंदाजांना त्याने दहशतीखाली ठेवले. लेगब्रेक, गुगली (राँग वन), फ्लिपर (झुटर) ही अस्त्रे त्याने खुबीने वापरली.
उत्तम कर्णधार, क्रिकेटच्या बारकाव्यांचा जाणकार
वादग्रस्त क्रिकेटपटूकडे नेतृत्व सोपवण्यास ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने कधी प्राधान्य दिले नाही, त्यामुळे काही अपवाद वगळता वॉर्न कधी कर्णधार बनला नाही. पण त्याच्याकडे नेतृत्वगुण होते. ऑस्ट्रेलियाचा यशस्वी कर्णधार स्टीव्ह वॉला त्याने अनेकदा जुमानले नाही. फ्रँचायझी क्रिकेटला त्याने कसोटी क्रिकेटसारखेच स्वीकारले. राजस्थान रॉयल्सना आयपीएलच्या पहिल्याच हंगामात अजिंक्यपद मिळाले याचे श्रेय वॉर्नच्या नेतृत्वगुणांना द्यावे लागेल. निवृत्तीनंतर समालोचन करताना वॉर्नच्या क्रिकेटविषयी अफाट ज्ञानाची प्रचीती वारंवार यायची. चेंडू, खेळपट्टी, डावपेच, सामन्याची स्थिती यांवर अधिकारवाणीने बोलायचा. गुलाबी चेंडूच्या क्रिकेटला अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे या मताचा तो होता.
बॉक्स ऑफिस, सोप ऑपेरा…
वॉर्नच्या आधीही असंख्य फिरकी गोलंदाज होऊन गेले. त्यातील काही निष्णातही होते. मुथय्या मुरलीधरनसारख्या एखाद्याने त्याच्यापेक्षा अधिक बळी घेतले. तरीही फिरकी गोलंदाजी आणि क्रिकेटमधील वॉर्नचे अढळपद कायम राहील. तो मैदानावर असताना किंवा नसताना, वॉर्नबाबत सतत काही ना काही घडतच असायचे. त्याचे अस्तित्वच क्रिकेटसाठी एखाद्या बॉक्स ऑफिससारखे होते. त्याची कारकीर्द एखाद्या सोप ऑपेरासारखी होती. पण फिरकी गोलंदाजीचे तो विद्यापीठ होता. त्याचे प्रशिक्षक टेरी जेन्नर यांनी एकदा वॉर्नचे वैशिष्ट्य सांगितले. वॉर्नकडे लेगस्पिन गोलंदाजासाठी आवश्यक विशाल हृदय आहे. त्यामुळे हिंमत, सबुरी, अपयश पचवण्याची ताकद त्याला उत्तम साधते. त्याच विशाल हृदयाने वॉर्नला दगा दिला. त्याची अखेर त्याच्या कारकिर्दीसारखीच नाट्यमय ठरली.