दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा जवळचा विश्वासू, अशी ओळख असलेल्या शंतनू नायडूला टाटा समूहात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. शंतनू नायडूची टाटा मोटर्समधील स्ट्रॅटेजिस्ट इनिशिएटिव्ह विंगचे प्रमुख आणि महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याची माहिती शंतनूने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून दिली आहे. “आता एक वर्तुळ पूर्ण झाले” अशा आशयाची पोस्ट त्याने लिंक्डइनवर केली आहे. रतन टाटा यांची शंतनूबरोबरची मैत्री खूप खास होती. रतन टाटा यांनी स्वतः फोन करून शंतनूला आपल्याबरोबर काम करण्याची ऑफर दिली होती. शंतनूने इथपर्यंतचा प्रवास कसा गाठला त्याविषयी जाणून घेऊ.
शंतनूने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?
शंतनूने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “मला हे सांगताना आनंद होत आहे की मी टाटा मोटर्समध्ये स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हजचा महाव्यवस्थापक आणि प्रमुख म्हणून नवीन सुरुवात करत आहे!” त्याने कंपनीशी त्याच्या वैयक्तिक संबंधांविषयीदेखील सांगितले. तो म्हणाला,
“मला आठवते, जेव्हा माझे वडील टाटा मोटर्सच्या प्लांटमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही पँट घालून घरी यायचे आणि मी त्यांची खिडकीत वाट पाहत असायचो, आता हे वर्तुळ पूर्ण होत आहे.”
या पोस्टमध्ये त्याने टाटा नॅनोबरोबर पोज देतानाचा फोटोदेखील पोस्ट केला. ही कार टाटा यांनी सर्वसमान्यांसाठी तयार केली होती. टाटा यांच्या भारतातील परवडणाऱ्या मोबिलिटीच्या दृष्टिकोनाशी टाटा नॅनो संबंधित आहे. नायडू याचा टाटा समूहाबरोबरच मोठा कौटुंबिक इतिहास आहे. त्याचे वडील पुण्यातील टाटा मोटर्स प्लांटमध्ये नोकरीला होते, तर त्याचे आजोबा आणि पणजोबा महाराष्ट्रातील भिरा येथील टाटा पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पात नोकरीला होते.
टाटा ट्रस्टमध्ये टाटा यांच्या कार्यालयात असतानाही नायडू याला टाटा सन्सकडून नुकसानभरपाई मिळाली. त्याचा पगार जानेवारीमध्ये टाटा मोटर्सकडे वळविण्यात आला. अनेकांना याविषयी माहिती नाही, परंतु टाटा समूहाने भूतकाळात अंतर्गत बदल्यादेखील पाहिल्या आहेत. टाटा सन्सचे संदीप त्रिपाठी टाटा कॅपिटलमध्ये गेले आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे स्वामीनाथन टीव्ही टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांसाठी डिजिटल ऑपरेशन्सकडे वळले.
शंतनू आणि रतन टाटा यांचे जवळचे नाते
शंतनू नायडू हे केवळ उद्योगपतींशीच व्यावसायिकरित्या जोडलेले नाहीत. टाटांनी त्यांच्या मृत्युपत्रात त्यांचे कार्यकारी सहाय्यक म्हणून शंतनू नायडू याचेही नाव दिले आहे. रतन टाटा यांनी शंतनूच्या सहयोगी कंपनी ‘गुडफेलोज’मध्ये आपली हिस्सेदारी दिली आणि नायडूंनी परदेशी शिक्षणासाठी घेतलेले वैयक्तिक कर्ज माफ केले. टाटा एल्क्सी कंपनीत काम करू लागलेल्या शंतनू आणि टाटा यांच्यातील जवळीक त्यांच्या श्वानांबद्दलच्या काळजीमुळे निर्माण झाली. ब्रुटला दिलेल्या मुलाखतीत, त्याने २०१४ मध्ये रस्त्याच्या मधोमध एक मेलेला श्वान दिसल्याची आठवण सांगितली. महिनोनमहिने ते दृश्य पाहून व्यथित असलेल्या शांतनूने रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांना कारच्या धडकेपासून वाचवण्यासाठी ‘कॉलर रिफलेक्टर’ तयार केले.
‘कॉलर रिफलेक्टर’ची मागणी वाढल्यानंतर, शंतनूला निधीच्या कमतरतेमुळे मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. तेव्हा शंतनूच्या वडिलांनी त्यांना टाटा यांना पत्र लिहिण्याची विनंती केली. सुरुवातीला त्याला पत्र लिहिताना संकोच वाटला, नंतर शेवटी त्याने टाटांना एक पत्र लिहिले. दोन महिन्यांनंतर शंतनूला टाटा यांच्याकडून प्रत्युत्तर आले, ज्यात प्रत्यक्ष भेटण्याविषयी सांगण्यात आले. श्वानांबद्दल असलेल्या प्रेमामुळे रतन टाटा यांच्याशी भेट झाली, असे शंतनूने सांगितले होते. शांतनूच्या उपक्रमाने प्रभावित होऊन टाटा सन्सचे अध्यक्ष एमेरिटस यांनी शंतनूची स्वयंसेवी संथा ‘Motopaws’ या प्रकल्पाला समर्थन देण्याचे ठरवले.
शंतनू नायडूचा जन्म १९९३ मध्ये पुण्यातील एका तेलुगू कुटुंबात झाला. शंतनूने सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी आणि कॉर्नेल जॉन्सन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. टाटा एल्क्सीमध्ये ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून त्याने करिअरची सुरुवात केली. अमेरिकेत असताना शंतनू रतन टाटा यांच्या संपर्कात राहिला. टाटा यांचा सहाय्यक म्हणून शंतनू त्यांच्या मीटिंगसाठी नोट्स काढायचा तसेच नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याविषयी अभिप्राय द्यायचा.
त्याच्या शिक्षणानंतर, टाटा सन्सचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर शंतनूला टाटा यांचे खाजगी कार्यालय असणारे आरएनटी कार्यालय देण्यात आले. शंतनूने टाटा यांच्यासाठी सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे प्लॅटफॉर्म आणि सेवा विकसित करणे सुरू ठेवले आणि त्यांच्या वरिष्ठांनीही यावर समर्थन दिले. यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे गुडफेलोज. ही २०२२ मध्ये लाँच करण्यात आलेली वृद्ध लोकांसाठी सबस्क्रिप्शन-आधारित सहचर सेवा आहे.
गेल्या १० वर्षांत शंतनू हा टाटांचा जवळचा आणि विश्वासू मित्र झाला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली; ज्यामध्ये तो टाटांचा वाढदिवस साजरा करताना दिसला. भारतभरातील टाटा यांच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. त्याच्या व्यवस्थापकीय भूमिकेच्या पलीकडे, शंतनू याने २०२१ मध्ये हार्पर कॉलिन्स या प्रकाशन संस्थेच्या अंतर्गत ‘आय कम अपॉन अ लाइटहाउस’ या नावाने रतन टाटा यांच्याबरोबरच्या त्यांच्या आयुष्यातील एक छोटी आठवणही लिहिली.
‘गुडबाय, माय डियर लाइटहाऊस’
रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. शांतनू नायडू याने त्याच्या लिंक्डइन अकाउंटवर एक हृदयस्पर्शी पोस्ट केली आहे. “या मैत्रीनंतर आता त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यासाठी मी माझे उर्वरित आयुष्य घालवीन. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे, अलविदा, माझ्या प्रिय दीपस्तंभा (लाईटहाऊस),” अशा शब्दात शंतनू नायडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पोस्टमध्ये त्याने टाटांबरोबरचा त्याचा एक फोटोही शेअर केला आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने एका युगाच्या समाप्तीचे संकेत असले तरी त्यांचा प्रभाव शंतनू आणि त्यांनी शिकवलेल्या इतरांवर कायम आहे.