Sharad Pawar NCP New Election Symbol राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ अजित पवार गटाला मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘तुतारी’ चिन्ह बहाल केले. आज किल्ले रायगडावर पक्षाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. या भव्य सोहळ्याला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. शरद पवार गटाला मिळालेल्या ‘तुतारी’चे महत्त्व काय आहे? ‘तुतारी’ हेच निवडणूक चिन्ह का देण्यात आले? याबद्दल जाणून घेऊ.
तुतारी वाजविणारा माणूस
शरद पवार गटाला मिळालेल्या चिन्हात एक माणूस ‘सी’ आकाराची लांब तुतारी वाजविताना दिसत आहे. तुतारीला तुर्ही, तुरा किंवा तुर्तुरी म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात तुतारीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. सर्वसाधारणपणे हे वाद्य पितळ किंवा अन्य धातूंपासून तयार केले जाते. मात्र, यापूर्वी हे वाद्य बैलाच्या शिंगांपासून तयार केले जायचे. ज्यांनी पिढ्यान् पिढ्या ही कला शिकली आहे, तेच हे वाद्य वाजवू शकतात.
तुतारी वाजविण्याला ऐतिहासिक महत्त्व
राजे-महाराजांच्या काळात तुतारी फुंकून राजे, प्रतिष्ठित अतिथिगण यांच्या आगमनाची घोषणा केली जायची. विशेषतः महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात तुतारी हे वाद्य लोकप्रिय होते. भारतीय शास्त्रीय संगीतासाठी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या ‘स्वार क्लासिकल’च्या म्हणण्यानुसार, विजापूरच्या आदिलशाही राजांच्या काळात (१४९०-१६८६) सलाम म्हणून तुतारी वाजवली जायची. तुतारी वाजविल्याने एखाद्या विशिष्ट कार्याची किंवा युद्धाच्या तयारीची सुरुवात व्हायची.
‘स्वार क्लासिकल’ यांनी आपल्या वेबसाइटवर संगितले की, ब्रिटिश राजवटीत इंग्रजांपासून वाचण्यासाठी तुतारीवादक मंदिरांमध्ये लपायचे. त्यामुळे तुतारी वाद्य धार्मिक परंपरेचाही एक भाग झाले. शुभ कार्यासाठी आजही तुतारी वाजवली जाते. शास्त्रीय संगीतातही तुतारीचा वापर केला जातो. हे वाद्य बहुधा लग्न समारंभ किंवा इतर आनंदाच्या प्रसंगी वाजविले जाते. महाराष्ट्रात राजकीय सभांमध्येही तुतारी वाजवली जाते. २०२०-२१ मध्ये तुतारी फुंकून शेतकरी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती.
ढोल-ताशा पथकात या वाद्याचा वापर विशेषत्वाने होतो. पुण्यात तर ढोल-ताशाच्या तालासोबत तुतारीचा आवाज नसेल, तर गणेशोत्सव सोहळा पूर्ण होत नाही. तुतारी हे वाद्य भारतासह भारताबाहेरदेखील वापरले जाते. मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये गोंड आदिवासी समुदायात तुतारी वाजविण्याची प्रथा आहे. छत्तीसगड व उत्तराखंडमध्येही हे एक पारंपरिक वाद्य आहे. या राज्यात भगवान शिव आणि इतर देवतांच्या पूजेदरम्यान तुतारी वाजवली जाते. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये छत्तीसगडच्या चित्ररथावरही हे वाद्य दाखविण्यात आले आहे. त्यासह नेपाळ आणि श्रीलंकेतही हे वाद्य वाजविले जाते.
हेही वाचा : भारताने थायलंडला पाठवले बौद्धधातू; मलेशियात बौद्धधातू प्रदर्शित होणं भारतासाठी किती महत्त्वाचं?
शरद पवार गटाने तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. त्यात तुतारी या चिन्हावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले. अजित पवार गटाला मिळालेले पक्षाचे जुने नाव आणि चिन्ह देशभरात सर्वत्र प्रसिद्ध आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशात शरद पवार गटासाठी नवीन नाव आणि चिन्हांसह निवडणुकीच्या रिंगणात उतरणे आव्हान ठरणार आहे.