राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचा मुंबईत मंगळवारी (२ मे) प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाषणादरम्यान याबाबतची घोषणा केली. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी करीत आहे. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील घेतलेल्या अशाच निर्णयांचे स्मरण केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या दोन पक्षांच्या दोन नेत्यांनी केलेली राजीनाम्याची घोषणा आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकू या..

शरद पवार यांची अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा!

भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असे शरद पवार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. या विधानाचा अर्थ काय, असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडला होता. अनेक राजकीय नेते, जाणकारांनी शरद पवारांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले होते. मात्र या विधानाच्या साधारण आठवड्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदापासून दूर होण्याची घोषणा केली आहे. शरद पवार ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘कोठे तरी थांबण्याची गरज आहे,’ म्हणत हा निर्णय जाहीर केला आहे.

Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Uddhav Thackeray and Jitendra Awhad
Jitendra Awhad : “शेवटी कोणालातरी…”, पालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया!
Humiliating behaviour in Uddhav Thackeray group Jalgaon district womens organizer Mahananda Patil alleges
उद्धव ठाकरे गटात अपमानास्पद वागणूक, राजीनामा देताना जळगाव जिल्हा महिला संघटक महानंदा पाटील यांचा आरोप

हेही वाचा >> विश्लेषण: महाभारत खरंच घडले होते का? काय सांगतात पुरातत्त्वीय पुरावे?

शरद पवार नेमके काय म्हणाले?

शरद पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख केला. राजकारणात आतापर्यंत कोणकोणत्या जबाबदाऱ्या सांभाळल्या यावरही त्यांनी भाष्य केले. तसेच पुढे बोलताना “१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करीत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील तीन वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही,” असे शरद पवार म्हणाले.

अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे -शरद पवार

“सार्वजनिक जीवनातील १ मे, १९६० ते १ मे, २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठे तरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकुवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहील,” असे शरद पवार यांनी जाहीर केले.

हेही वाचा >> मेट गाला म्हणजे काय? चित्रविचित्र कपड्यांची फॅशन करून कोट्यवधींचा निधी का उभारतात?

राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आक्रमक, निर्णय मागे घेण्याची विनंती

शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून दूर होण्याचा अचानकपणे निर्णय घेतल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ, माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड अशा बड्या नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांसारख्या नेत्यांना थेट रडू कोसळले. तुम्ही निर्णय मागे घ्यावा. तुम्ही थांबलात तर आम्हीही थांबतो. ज्यांना हा पक्ष चालवायचाय त्यांना चालवू देत, अशी टोकाची भूमिका जयंत पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती राजीनाम्याची घोषणा

शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून दूर होण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, या मागणीला धरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अगदी असाच प्रसंग बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतीतही घडला होता. त्यांनी एकूण दोन वेळा शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र शिवसैनिकांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी दोन्ही वेळा आपला निर्णय मागे घेतला होता. त्यावेळी काही शिवसैनिकांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला होता.

हेही वाचा >> विश्लेषण: अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर लवकरच मंदीचे सावट; ती कधी सुरू होणार?

बाळासाहेबांची १९७८ साली पहिली राजीनाम्याची घोषणा

१९७८ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाची निराशा झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेने एकूण ३५ जागा लढवल्या होत्या. मात्र यातील एकाही जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला नाही. या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील जनतेला शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन केले होते. मात्र मुंबईकरांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. मुंबईतील सर्वच्या सर्व म्हणजेच ३४ जागा जनता पक्षाने जिंकल्या. तर शिवसेना सोडून जनता पक्षात गेलेल्या डॉ. हेमचंद्र गुप्ते यांनी दादरमध्ये शिवसेनेचे धडाडीचे उमेदवार मनोहर जोशी यांचा पराभव केला. या पराभवानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचे ठरवले.

“मुंबईवर भगवा फडकला नाही, तर मी शिवसेनाप्रमुखपदावरून दूर होईन!”

१९७८ साली नोव्हेंबर महिन्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याचे ठरले. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्यासह सर्वच शिवसैनिकांनी कंबर कसली होती. शिवसेनेसाठी ही निवडणूक म्हणजे राजकीय अस्तित्वाची लढाई झाली होती. शिवसेनेने या निवडणुकीत एकूण ११७ उमेदवार उभे केले होते. शिवसैनिकांत चैतन्य जागवण्यासाठी या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी अजब घोषणा केली होती. “या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईवर भगवा फडकला नाही, तर मी शिवसेनाप्रमुखपदावरून दूर होईन,” असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मात्र या निवडणुकीतही शिवसेनेला मोठा धक्का बसला. येथे एकूण ११७ उमेदवारांपैकी शिवसेनेचे फक्त २१ उमेदवारच निवडून येऊ शकले. शिवसेनेच्या कर्मभूमीतच शिवसेनेचा पराभव झाला होता.

हेही वाचा >> सर्जिकल चिपमुळे सुटेल का दारूचे व्यसन? चीनमध्ये अजब प्रयोग, जाणून घ्या सविस्तर

पालिका निवडणुकीतील पराभवामुळे राजीनाम्याची घोषणा

या निवडणुकीनंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बाळासाहेबांनी थेट शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. “मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यात मला अपयश आले आहे. लोकांची माझ्यावर निष्ठा राहिलेली नाही. मग मी माझी गाऱ्हाणी मांडण्यात वेळ का घालवावा? मी शब्दांना जागणारा माणूस आहे. आता मी लोकांना नको आहे. त्यामुळे मी शिवसेनेचा राजीनामा देत आहे,” अशी घोषणाच बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. मात्र बाळासाहेबांच्या या घोषणेनंतर शिवसैनिकांना धक्काच बसला. शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा धारण करत बाळासाहेबांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर शिवसैनिकांची भूमिका लक्षात घेऊन बाळासाहेबांनी आपला राजीनामा मागे घेतला होता.

१९९२ साली बाळासाहेबांचा दुसरा राजीनामा

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखपदाचा १९९२ साली दुसऱ्यांदा राजीनामा दिला होता. यावेळीदेखील शिवसैनिकांच्या आग्रहाखातर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता. १९९२ साली बाळासाहेब ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचे आरोप करण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारी माधव देशपांडे यांनी जुलै १९९२ मध्ये पत्रकार परिषद घेत हे आरोप केले होते. “शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची वैयक्तिक जहागिरी बनली आहे. ते मुलाच्या आणि पुतण्याच्या तालावर नाचत असून शिवसैनिकांनी निष्ठेने उभारलेली शिवसेना ते मोडून काढत आहेत. ठाकरे यांनी स्वत:भोवती शिवसेनेला कोंडून ठेवले आहे,” असे गंभीर स्वरुपाचे आरोप तेव्हा माधव देशपांडे यांनी केले होते. या आरोपानंतर शिवसेनप्रमुख चांगलेच व्यथित झाले होते. त्यांनी पुढे १८ जुलै १९९२ रोजी सामना या वृत्तपत्रात शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. “शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचा आपल्या कुटुंबीयांसमवेत अखेरचा जय महाराष्ट्र!” असे निवेदन बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्रात दिले होते.

हेही वाचा >> विश्लेषण : डिजिटलायझेशनमुळे टाकसाळी संकटात?

बाळासाहेबांचा अखेरचा जय महाराष्ट्र!

बाळासाहेबांच्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा शिवसैनिकांत अस्थितरता निर्माण झाली. महाराष्ट्रभरातील शिवसैनिक बाळासाहेबांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जमा होऊ लागले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ जुलै १९९२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी सामना वृत्तपत्रात ‘अखेरचा जय महाराष्ट्र!’ हे संपादकीय लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. “जे झाले ते झाले.आम्ही निरोप घेत आहोत. पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला जे विचार दिले, ते तुमच्या बुद्धीवर घासूनपुसून घ्या. तुम्हाला पटले तरच ते स्वीकारा. यापुढे खुद्द आम्हाला, आमच्या पुत्र-पुतण्याला कोणाही शिवसेनेच्या संदर्भात भेटण्याचा प्रयत्न करू नये. आम्हीच आमचा मार्ग मोकळा केला आहे. सर्वांना आमचा जय महाराष्ट्र!” असे बाळासाहेब ठाकरे आपल्या संपादकीय लेखात म्हणाले होते.

रस्त्यावर भाषण करून निर्णय मागे घेतल्याचे केले जाहीर

या सर्व घडामोडींनंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी मुंबईत दाखल होत बाळासाहेबांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर मातोश्रीच्या बाहेर २० जुलै १९९२ रोजी सायंकाळी ७ वाजता रस्ता आडवून एक व्यासपीठ तयार करण्यात आले. यावेळी रस्त्यावरच बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण करत शिवसेनेचे पक्षप्रमुखपद सोडणार नाही, असे जाहीर केले. बाळासाहेबांच्या या निर्णयानंतर शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा >> मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच मणिपूरमध्ये हिंसाचार, थेट द्यावे लागले जमावबंदीचे आदेश; नेमके काय घडले?

बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच शरद पवार यांची स्थिती

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखपदी असताना दोनदा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र या दोन्ही वेळेला शिवसैनिकांचा आग्रह आणि आक्रमक भूमिकेमुळे त्यांना आपला निर्णय बदलावा लागला होता. अशीच काहीशी परिस्थिती सध्या राष्ट्रवादीतही निर्माण झाली आहे. शरद पवार यांनी अचानकपणे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदापासून दूर होण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. शरद पवार यांनी आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader