महाराष्ट्राला अनेक शतकांचा इतिहास आणि संस्कृती आहे. या प्रदेशाला साडे तीन शक्तिपीठांचं देणं लाभलेलं आहे. म्हणूनच कुठल्याही कार्याच्या शुभ प्रसंगी ‘उदे ग अंबे उदे .. हा गजर आसमंत गर्जतो. इथल्या कणाकणात जगदंबेच्या उपासकांचा वावर आहे. किंबहुना मातृशक्तीच्या पूजनानेच या भूमीत स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली गेली. जय भवानीच्या गर्जनांनी शत्रूचा थरकाप उडविला. याच मातृपूजनाची परंपरा सांभाळणाऱ्या अनेक लोकसंस्कृतीच्या उपासकांपैकी एक उपासक म्हणजे ‘भुत्या’. ही परंपरा शतकानुशतके जपणारा हा भुत्या आहे तरी कोण, हे शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेण्याचा हा प्रयत्न!
भुत्या आनंदाचा विषय होता…
भुत्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे एखाद्या अक्राळ- विक्राळ भुताची प्रतिमा, परंतु देवीचा हा उपासक मात्र त्या भयंकर कल्पनेच्या अगदीच विरुद्ध आहे. या भुत्याची गोष्टच निराळी आहे. आज जरी हा भुत्या विस्मरणात जात असला तरी कधी काळी या भुत्याची वाट आवर्जून पाहिली जात असे, देवीचा कुठलाही उत्सव असो याचे आगमन अनेकांच्या आनंदाचा विषय होता.
आणखी वाचा: Shardiya Navratri 2023: भारतातील शक्ती पूजेचा (देवी) सर्वात प्राचीन पुरावा कोणत्या शतकातील?
कवड्या हाच परिचय
भुत्याची मुख्य ओळख म्हणजे याच्या अंगावरील कवड्यांचे दागिने, डोक्यावर शंकूच्या आकाराची कवड्यांनी गुंफलेली टोपी, गळ्यात, कंबरेभोवती कवड्यांच्या माळा आणि पट्टा, अंगात तेलकट झालेला डौर आणि विजार, काखेत झोळी, गळ्यात लोंबणारी हळद- कुंकू यांची पिशवी, हातात तुणतुणे आणि मुखात देवीची गाणी. आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हातातील जळते पोत. पहाटेच्या अंधुक प्रकाशात मुखी देवीचे गाणं, आणि हातात ज्वाला असे हे देवीच्या कवडी धारकाचे रूप.
नवरात्री आणि भुत्या
नवरात्रीच्या नऊ दिवसात तर या भुत्याची आवजून वाट पाहिली जात होती. मायभगिनी आवर्जून आपल्या घरी आमंत्रण देत असत. घरातील अंबेच्या घटस्थापनेनंतर देवीची स्तुती करण्यास त्याची आळवणी केली जायची. या काळात देवीचा साक्षात भक्तच दारी चालून आल्याने ही त्यांच्यासाठी श्रद्धेची बाब होती.
भुत्याची लोकपरंपरा
गोंधळी, जोग-जोगतीण, भोप्या-भुत्या हे देवी परंपरेतील उपासक तसेच महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचाही अमूल्य ठेवा. माहूरची रेणुका आणि तुळजापूरची भवानी या भुत्याच्या आराध्यदेवता, असे असले तरी महाराष्ट्रातील प्रत्येक देवीला ते आपले उपास्य मानतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रात भुत्या, गोंधळी यांनी देवी संप्रदायाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे, महाराष्ट्र-कर्नाटक- आंध्र (तेलंगणा) वगळता उर्वरित भारतात पुरुष वर्गाने आदिमायेसाठी कवड्या, कुंकू धारण केल्याचे खचितच पाहायला मिळते.
आणखी वाचा: करवीरनिवासिनी महालक्ष्मीचा निस्सीम भक्त हुतात्मा मुतय्या शिलालेखातून अजरामर!
भुत्याचा दीक्षाविधी
भुत्या होण्यासाठी एक दीक्षा विधी करावा लागतो, या विधीत ज्याला भुत्या व्हायचे आहे, त्याला चौक भरून त्यावर बसवतात. आणि देवीचा नामघोष करून त्याच्या डोक्यावर तांदूळ टाकतात आणि त्याच्या हातात जळता पोत आणि तोंडात जळती वात देतात. असा पद्धतीने दीक्षा विधी केला जातो. यात दोन प्रकार असतात एक म्हणजे हा चौक कांबळ्यावर भरला जातो, तेंव्हा तो भुत्या आजन्म ब्रह्मचारी राहून साधना करतो, तर दुसऱ्या प्रकारात बारा वर्षांनी विवाह करण्याची मुभा असते. दुसऱ्या प्रकारातील दीक्षा तुळजापूरचे भोपे कदम पाटील करत असत. काही लोक नवसाने भुत्या होतात, आणि केवळ मंगळवार- शुक्रवार या देवीच्या वारी भुत्यांचा वेष परिधान करून जोगवा मागतात. इतर दिवशी सामान्य गृहस्थाप्रमाणे जीवन जगतात. आमचा वेष शिवाजी महाराजांसारखा आहे, असे ते अभिमानाने सांगतात.
भुत्या स्वतंत्र जात?
भुत्या पंथांमध्ये मराठा आणि देशस्थ ब्राह्मण यांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यामुळे त्यांची स्वतंत्र जातच निर्माण झाली आहे. ब्राह्मण भुत्ये आपल्या जातीतच राहतात, मंगळवार आणि शुक्रवारी भुत्यांच्या वेष परिधान करून गावात पाच घरात भिक्षा मागतात. भुत्यांना तुळजापूरच्या भवानीच्या उपासनेत विशेष स्थान आहे. तुळजाभवानीच्या मंदिरात भुत्ये हातात पोत घेवून जोगवा मागताना दिसतात.
भुत्यांच्या परंपरेेचे पुरावे
संस्कृतीकोशात भुत्या आणि भोप्या हे एकच असल्याचे उल्लेख सापडतात. इतकेच नव्हे तर निजामांच्या दप्तरातही ४०० वर्षे जुनी भुत्यांची नोंद सापडते. निजाम सरकारच्या काळात ‘मीर मजलिस सदर कमिटी तुळजापूर देऊळ’ या समितीने मराठा आणि ब्राम्हण समाजाच्या भुत्या-भोप्या म्हणून मंदिरातील तुळजाभवानी देवीच्या सेवेतील अधिकाराला मान्यता दिली होती. आर. ई. इंथोवेन यांच्या १८८५ सालच्या ‘ट्राईब्स अँड कास्ट्स इन बॉम्बे प्रेसिडेन्सी’ या तीन खंडांच्या ग्रंथात भोपे- भुत्ये यांचा संदर्भ सापडतो. गो. म. कालेलकर लिखित ‘मुंबई इलख्यातील जाती’ या त्यांच्या पुस्तकात तुळजापुर मधील भोपे-भुत्ये यांचे संदर्भ आहेत. कालेलकर यांनी नमूद केल्याप्रमाणे भुत्ये किंवा भोपे मुख्यत्वे करून पुणे, सातारा, कुलाबा, रत्नागिरी (आताच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) जिल्ह्यात आढळतात.
आणखी वाचा: भारतीय संस्कृतीत रजस्वला देवीची उपासना सर्वश्रेष्ठ का मानली जाते? आणि कुठे?
ओबीसी आरक्षण
यावर्षी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुळजापूरचा भोपे-भुत्ये समाज चर्चेत आला. भोपे-भुत्ये हे मराठा- ब्राह्मण समाजातील असून गेली वीस वर्षे ओबीसी आरक्षणाचा उपभोग घेत आहेत. ‘लोकसत्ता’ने दिलेल्या वृत्तानुसार तुळजापूरपरिसरातील मराठा आणि ब्राह्मण समाजातील वेगवेगळ्या आडनावाच्या एकूण २८४ कुटुंबाना ओबीसी आरक्षणाचा अधिकार असल्याचा संदर्भ निजामाच्या नोंदीत सापडतो. त्या नोंदीवरूनच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही मराठा आणि ब्राम्हण समाजाचा ओबीसी अधिकार मान्य केला आहे. याच वृत्तानुसार स्थानिक भोपे नागनाथ भांजी यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापुर परिसरातील मराठा आणि ब्राम्हण ओबीसी आहेत. मात्र या भागातील सर्वच मराठा आणि ब्राम्हण हे ओबीसी नाहीत. यात निजामाने ठरवून दिलेल्या केवळ २८४ कुटुंबाचाच समावेश आहे. आम्ही ओबीसी प्रवर्गात असलो तरी राज्यभरातील मराठा समाजाशी आमचा रोटी-बेटी व्यवहार कायम आहे, असे भोपे नागनाथ भांजी सांगतात.