क्रिकेटपटू शिखर धवनचा आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश होऊ शकला नाही. मात्र, त्याच्या वैयक्तिक कारणास्तव तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिल्ली न्यायालयाने शिखरला मोठा दिलासा दिला असून मानसिक छळाच्या पार्श्वभूमीवर पत्नी आएशा मुखर्जीपासून त्याचा घटस्फोट मंजूर केला आहे. २०१२ साली शिखर धवन आणि आएशा मुखर्जी विवाहबद्ध झाले होते. त्यांना झोरावर धवन नावाचा १० वर्षांचा मुलगा आहे. आएशा आणि झोरावर हे दोघेही ऑस्ट्रेलियन नागरिक असून ऑस्ट्रेलियातच वास्तव्यास आहेत.

दिल्ली न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले की, आएशाने शिखरच्या एकुलत्या एक मुलाला त्याच्यापासून अनेक वर्ष दूर ठेवून एकप्रकारे शिखरला मानसिक त्रास दिला आहे. “त्याचा (शिखर) कोणताही दोष नसताना, तो अनेक वर्षांपासून आपल्या मुलापासून वेगळा राहत आहे. यामुळे त्याला अनेक यातना आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. यावेळी आएशाने तिच्यावरील आरोप फेटाळले असले तरी तिला इच्छा असूनही भारतात राहणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. तिला मनापासून भारतात राहायचे आहे, पण पहिल्या लग्नाशी संबंधित दोन मुलींची जबाबदारी असल्यामुळे तिला ऑस्ट्रेलियात राहणे भाग पडत आहे. तिला भारतात येणे शक्य नसल्यामुळे ती दुसऱ्या लग्नाची जबाबदारी पार पाडू शकत नाही, याचीही तिला जाणीव आहे. त्यामुळे तिने हा दावा पुढे लढविण्यास अनिच्छा दाखविली आहे”, असे निवेदन न्यायमूर्ती हरीश कुमार यांनी दिले असल्याचे फर्स्टपोस्ट संकेतस्थळावरील लेखात नमूद करण्यात आले आहे.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Protest against obscene remarks of BJP leader Pasha Patel in Karjat Jamkhed by burning effigy
भाजप नेते पाशा पटेल यांच्या अश्लील वक्तव्याविरोधात कर्जत जामखेड मध्ये महिलांचा एल्गार, पुतळा जाळून निषेध
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब

हे वाचा >> पती-पत्नीची सहमती असेल तर आता लगेच घटस्फोट मिळेल; सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निकाल काय सांगतो?

न्यायमूर्ती हरीश कुमार पुढे म्हणाले, “हे सिद्ध होते की, पत्नीने (आएशा) लग्नानंतर भारतात वैवाहिक जीवन व्यतीत करणे गरजेचे असताना, त्या आश्वासनाची पूर्तता केली गेली नाही. त्यामुळे शिखरला वैवाहिक आयुष्य जगणे अवघड झाले आणि त्यातून अनेक मानसिक वेदनांना सामोरे जावे लागले. वर्षांनुवर्ष स्वतःच्या मुलापासून लांब राहण्याचा मनस्ताप त्याला सहन करावा लागला.”

दरम्यान, न्यायालयाने मुलाचा कायमस्वरूपी ताबा कुणा एकाकडे दिला नसला तरी शिखरला आपल्या मुलाला भारत आणि ऑस्ट्रेलियात भेटण्याची मुभा दिली आहे. तसेच, आएशा मुखर्जीनेही वेळोवेळी मुलाला सुट्ट्यांच्या काळात भारतात आणणे, शिखरच्या कुटुंबासह मुलाला मुक्कामी राहायला देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले असल्याचे फर्स्टपोस्टने त्यांच्या लेखात म्हटले आहे.

एकूणच शिखर धवन आणि आएशा मुखर्जी यांच्या प्रकरणामुळे लग्नातील क्रूरता हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. क्रूरता म्हणजे नेमके काय? लग्न संबंधातील क्रूरतेबाबत कायदा काय सांगतो? याबाबत घेतलेला हा आढावा…

लग्नातील क्रूरता

हिंदू विवाह कायदा, १९५५ नुसार हिंदू धर्मातील लग्नासंबंधी कायदे आखून दिले आहेत आणि विशेष विवाह कायदा, १९५४ नुसार धर्मविरहित विवाहासंबंधित कायदे दिले आहेत. या दोन्ही कायद्यांमध्ये क्रूरतेचे कलम अंतर्भूत केलेले आहे. दोन्ही कायद्यामध्ये लग्नातील क्रूरता ही घटस्फोटासाठी आधार मानली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही कायद्यांमध्ये विशिष्ट क्रूरतेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयानुसार, पती किंवा पत्नीने एकमेकांशी केलेल्या निंदनीय वर्तनाची गोळाबेरीज किंवा वैवाहिक आदर्शापासून दूर जात आरोग्यास हानी निर्माण करणे किंवा हानी होऊ शकते, अशी भीती निर्माण करणे म्हणजे क्रूरता असल्याचे दिसून आले आहे.

हे वाचा >> पत्नीने पतीच्या नोकरीच्या शहरात वास्तव्याचा आग्रह धरणे क्रुरता नाही

क्रूरतेचे विविध प्रकार

कायद्यानुसार दोन प्रकारच्या क्रूरता लग्नसंबंधात दिसून येतात. एक म्हणजे शारीरिक क्रूरता, ज्यामध्ये हिंसक वर्तनामुळे जोडीदाराला वेदना देणे; तर दुसरी मानसिक क्रूरता, ज्यामध्ये जोडीदारासोबत एकत्र राहण्यास अशक्य अशी परिस्थिती निर्माण होणे. शारीरिक क्रूरता दिसून येते आणि त्यात कोणतीही साशंकता नसते. न्यायालयांनी नमूद केल्याप्रमाणे, शारीरिक क्रूरता हा विषय तथ्य आणि प्रमाणाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, एखादा पती पत्नीला मारहाण करून शारीरिक त्रास देत असेल तर पत्नी त्या आधारावर घटस्फोट मागू शकते.

शारीरिक क्रूरतेबाबत निर्णय देताना न्यायालयाने एके ठिकाणी म्हटले आहे की, कोणतीही शारीरिक हिंसा, शरीराला इजा करणे, जीविताला धोका निर्माण करणे, जोडीदाराच्या मनात सततची धास्ती निर्माण करून शारीरिक अवयव आणि आरोग्याला धोका निर्माण करणे ही शारीरिक क्रूरता असून घटस्फोटासाठी हे कारण वैध ठरविले जाऊ शकते.

मानसिक क्रूरतेच्या प्रकरणात काहीशी गुंतागुंत असते. भारतातील न्यायालयांनी मानसिक क्रूरतेशी संबंधित तंतोतंत अशी कोणतीही व्याख्या किंवा भाष्य केलेले नाही. परंतु, अनेक निर्णयांमधून असे दिसून येते की, एका जोडीदाराच्या वागणुकीमुळे दुसऱ्या जोडीदाराची घोर निराशा होणे किंवा तो वैफल्यग्रस्त होणे, ज्यामुळे वैवाहिक संबंध पुढे सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही जोडीदारास अशक्य अशी परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी मानसिक क्रूरतेचा संबंध जोडला गेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या एका निर्णयात म्हटले होते की, आधुनिक जीवनात झपाट्याने बदल होत असल्यामुळे वैवाहिक आयुष्यात क्रूरतेचा सामवेश अधिक प्रमाणात झालेला आढळतो. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांनी नमूद केले की, विवाहातील क्रूर वर्तनाची सीमा मानवी स्वभाव, क्षमता आणि तक्रार करणाऱ्याच्या वर्तनातील सहन करण्याची असमर्थता इत्यादी बाबींवर अवलंबून असते.

६ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांनी दिलेल्या एका निकालाचा हवाला फर्स्टपोस्टने दिला आहे. त्यात म्हटले आहे की, “प्रत्येक प्रकरण वेगळे असू शकते. प्रत्येक प्रकरणात एक वेगळीच प्रकारची क्रूरता समोर येऊ शकते.” या निकालात पुढे असे म्हटले होते, मानवी मन अतिशय गुंतागुंतीचे आहे आणि मानवी स्वभावदेखील तितकाच गुंतागुंतीचा आहे. तसेच मानवाच्या चातुर्यालाही सीमा नसते. एका प्रकरणात आपल्याला जी क्रूरता वाटू शकते, ती इतर प्रकरणात क्रूरता ठरत नाही. क्रूरतेची संकल्पना ही प्रत्येक व्यक्तीनुरुप वेगवेगळी असू शकते. प्रत्येक व्यक्तीचे संगोपन, संवेदनशील वृत्ती, शैक्षणिक-कौटुंबिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी, आर्थिक आणि सामाजिक स्थिती, रूढी, परंपरा, धार्मिक श्रद्धा, मानवी मूल्ये आणि मूल्य व्यवस्था याचा सांगोपांग विचार करता प्रत्येकाची क्रूरतेची संकल्पना वेगवेगळी असू शकते.

हे वाचा >> पत्नी आणि तिच्या भावनांकडे दुर्लक्ष ही मानसिक क्रूरताच!

न्यायमूर्ती सुंदरेश यांनी पुढे म्हटले की, आधुनिक संस्कृतीमध्ये प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वेग आणि मूल्य व्यवस्था इत्यादींमुळे मानसिक क्रूरता काळाच्या ओघात बदलत असते. आज मानसिक क्रूरता वाटणारी बाब ही काही काळानंतर मानसिक क्रूरता वाटू शकत नाही.

वैवाहिक जीवनातील मानसिक क्रूरतेची उदाहरणे

गतकाळात न्यायालयासमोर जी घटस्फोटाची प्रकरणे आली, त्यामध्ये पती किंवा पत्नीकडून होणारे विशिष्ट प्रकारचे वर्तन मानसिक क्रूरतेला कारणीभूत ठरत असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.

सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली दिलेल्या एका घटस्फोट प्रकरणात निकाल दिला की, पती किंवा पत्नीने पुरेशा कारणाशिवाय जोडीदाराला दीर्घकाळ लैंगिक संबंधांपासून वंचित ठेवले तर हे एकप्रकारचे मानसिक क्रौर्य आहे. याच निकालात न्यायालयाने पुढे म्हटले की, भूतकाळातही अशाप्रकारची प्रकरणे समोर आलेली आहेत. ज्यामध्ये जोडीदाराने जाणूनबुजून जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. अशा प्रकारचे कृत्य मानसिक क्रौर्य आहे.

सप्टेंबर महिन्यात दिल्ली न्यायालायने एका घटस्फोट प्रकरणाची सुनावणी करत असताना सांगितले की, महिलेच्या चारित्र्यावर खोटे आरोप करणे ही एक प्रकारची मानसिक क्रूरता आहे आणि हे विभक्त होण्याचे कारण असू शकते. महिलेच्या चारित्र्यावर खोटे आरोप करण्यापेक्षा मोठी क्रूरता असू शकत नाही, असेही न्यायालयाने आपला निर्णय देताना म्हटले होते.

आणखी वाचा >> विभक्त पतीनं दुसर्‍या स्त्रीबरोबर राहणं क्रूरता नाही!

कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार, पतीला त्याच्या पालकांपासून वेगळे होण्यास भाग पाडणे हेदेखील मानसिक क्रौर्य असल्याचे मानले गेले.

जुलै (२०२३) महिन्यात, छत्तीसगड उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, पुरुष जोडीदाराचे अति प्रमाणात मद्यपान करणे हे क्रूरतेचे लक्षण असून हिंदू विवाह कायद्याअंतर्गत घटस्फोट घेण्यासाठी हे वैध कारण आहे.

२०१७ साली “मायादेवी विरुद्ध जगदीश प्रसाद” या प्रसिद्ध खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते की, पत्नीने आपला पती आणि मुलांना जेवण न देणे हे लग्नातील क्रूरतेचे लक्षण आहे आणि घटस्फोट घेण्यासाठी हे कारण पुरेसे आहे.