वेल्समध्ये झालेल्या एका मोठ्या नैसर्गिक प्रयोगामुळे डिमेन्शिया अर्थात स्मृतिभ्रंश या आजारावर नागीणसदृश आजारावरील (शिंगल्स) लस प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या नागीणसदृश आजारावरील लस घेतल्यास, त्या व्यक्तीला स्मृतिभंश होण्याची शक्यता कमी होते. दोन लाख ८० हजार वृद्ध व्यक्तींचा अभ्यास या संशोधनासाठी करण्यात आला. त्यामध्ये असे आढळले आहे की, लसीकरण झालेल्या लोकांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता २० टक्के कमी आहे. त्यामुळे स्मृतिभ्रंश रोखण्यासाठी किंवा स्मृतिभ्रंशाने लवकर ग्रस्त होऊ नये यासाठीच्या उपाययोजना म्हणून या लसीकडे पाहता येऊ शकते.

काय सांगतो अभ्यास?
नवीन अभ्यासात असे आढळले आहे की, नागीणसदृश आजारावरील लस घेतलेल्या लोकांमध्ये नवीन स्मृतिभ्रंशाचे निदान सात वर्षांच्या कालावधीत ३.५ टक्क्यांनी कमी झाले. हे लसीकरण न झालेल्या लोकसंख्येच्या तुलनेत स्मृतिभ्रंश होण्याचा धोका २० टक्के कमी आहे. तसेच पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा परिणाम स्पष्टपणे दिसून आल्याचेही संशोधकांनी सांगितले आहे.

ज्या पद्धतीने वेल्समध्ये लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे या अभ्यासाला नैसर्गिक प्रयोग म्हटले गेले. लसीकरण कार्यक्रम १ सप्टेंबर २०१३ ला सुरू झाला. त्या तारखेला ७९ वर्षीय व्यक्ती एका वर्षासाठी लसीकरणासाठी पात्र ठरल्या. त्यानंतर ७८ वर्षांची व्यक्ती वर्षभराने लसीकरणासाठी पात्र ठरल्या. त्यामुळे समान वयाच्या लोकांचा एक समूह तयार झाला. हा समूह सारख्या परिस्थितीत राहत होता. त्यापैकी निम्मे लस घेण्यास पात्र होते; तर निम्मे अपात्र. त्यामुळे स्टॅनफॉर्ड मेडिसीनमधील संशोधकांसाठी स्मृतिभ्रंशावर लसीच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी पद्धत तयार झाली.

आतापर्यंत याबाबतचे सर्व पुरावे रुग्णांच्या नोंदींवरूनच मिळाले होते. त्यामध्ये एक प्रमुख पूर्वग्रह होता तो म्हणजे लसीकरण झालेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची चांगली काळजी घेणे. “या सर्व संबंधित अभ्यासांमध्ये एक मूळ अडचण होती आणि ती म्हणजे लसीकरण झालेल्या लोकांचे आरोग्याप्रति वर्तन हे लसीकरण न झालेल्या लोकांपेक्षा वेगळे होते. साधारणपणे त्यांच्याकडे कोणतीही शिफारस करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याप्रमाणेच पाहिलं जातं,” असे अभ्यासाचे संबंधित लेखक व स्टॅनफॉर्ड विद्यापीठातील प्राथमिक काळजी आणि लोकसंख्या आरोग्य विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. पास्कल गेल्डसेटझर यांनी सांगितलं.

सध्याचा अभ्यास लसीकरण कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या नागीणसदृश आजारावरील लस झोस्टावॅक्सच्या परिणामांवर आधारित आहे. हा लसीकरण कार्यक्रम २०२० मध्ये बंद करण्यात आला. गेल्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या आणखी एका अभ्यासात असे आढळले की, ही लस स्मृतिभ्रंशावर आणखी मजबूत संरक्षण देऊ शकते.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेला अभ्यास हा अमेरिकेतील दोन लाख लोकांच्या आरोग्य नोंदींवर आधारित आहे. या अभ्यासात शिंग्रिक्स नावाच्या लसीचे पुनर्संयोजित लसीकरण केल्यानंतर सहा वर्षांतच स्मृतिभ्रंशाच्या निदानात १७ टक्के घट झाल्याचे दिसून आले. हे प्रमाण त्याच लोकांइतके आहे जे स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांपेक्षा १६४ अतिरिक्त दिवस जगतात.

ही लस स्मृतिभ्रंशाचा धोका कसा कमी करते?
अभ्यासात आलेल्या निष्कर्षांबाबत संशोधकांना अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. एक सिद्धांत असा आहे की, ही लस विषाणूंच्या पुनरुत्पादनाला प्रतिबंध घालते. हा विषाणू मेंदूच्या रक्तवाहिन्यांना प्रभावित करून दीर्घकालीन मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. परिणामी स्ट्रोक किंवा रक्तस्राव होऊ शकतो. ही लस रोगप्रतिकार शक्तीमध्येही बदल घडवून स्मृतिभ्रंशापासून संरक्षण करू शकते.

या आजारात अंगावर वेदनादायक पुरळ उठतात. हे पुरळ व्हेरिसेला झोस्टर विषाणूमुळे होतात, ज्यामुळे कांजिण्या, नागीण किंवा इतर नागीणसदृश आजार होतात. साधारणपणे बालपणात या विषाणूमुळे कांजिण्या होतात. तरुण किंवा त्यापेक्षा मोठ्या वयोगटातील लोकांना नागीण होते. साधारणपणे कांजिण्या झाल्या असतील, तर हे विषाणू आयुष्यभर मज्जातंतू पेशींमध्ये (नर्व्ह सेल्स) राहतात. असे असताना एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल, तर हे विषाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतात.