Chhatrapati Shivaji Maharaj and Battle of Basrur: १९ फेब्रुवारी हा शिवजयंतीचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप वर्णावा तरी किती? महाराजांच्या अगणित महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक निर्णय म्हणजे स्वराज्याच्या आरमाराची उभारणी. याच मराठा आरमाराच्या इतिहासातील पहिली लढाई म्हणजे ‘बसरूरची लढाई’ होय. त्याचाच घेतलेला हा आढावा!
आरमार हे राज्याचे स्वतंत्र राज्यांगच
“आरमार हे राज्याचे स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्य मेव करावे.” असा संदर्भ रामचंद्र पंत अमात्यकृत ‘आज्ञापत्रा’त सापडतो. महाराजांच्या याच दूरदृष्टीची प्रचिती आपल्या बसरूरच्या लढाईच्या माध्यमातून येते. १४ मार्च १६६५ रोजी कारवारहून सुरतेला पाठवलेल्या एका इंग्रजी पत्रात या स्वारीबद्दल उल्लेख आहे. बसरूरची स्वारी ही मराठा आरमाराची पहिली ओळख होती. ज्याचे दूरगामी परिणाम झाले. या स्वारीमुळेच भारताच्या मध्ययुगीन इतिहासात पहिल्यांदाच एक राजा युद्धाच्या दृष्टीने स्वतःची परिपूर्ण जहाजे घेऊन स्वतः आरमारी स्वारीचे नेतृत्त्व करतो ही घटनाच अचंबित करणारी होती. या स्वारीमुळे आरमारी युद्ध, किनाऱ्यावरील किल्ले, बंदरे आणि भूगोलाचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले. १३-१४ फेब्रुवारी १६६५ च्या पहाटे मराठा नौदलाच्या ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी’ च्या गर्जनेने पोर्तुगीज सैनिकांना जाग आली. मराठा नौदलाने पोर्तुगीजांना पराभूत केलेल्या या युद्धामुळे बसरूरमध्ये स्वराज्याचा भगवा ध्वज फडकला.
शत्रूपक्षाच्या श्रीमंत शहरांवर धाडसत्रे
“स्वतःचे स्वतंत्र हिंदू (हिंदवी) राज्य स्थापन करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेला आकार देण्यासाठी प्रबळ मुस्लीम सत्तांच्या विरोधात धनाची अत्यंत गरज होती. युद्धासाठी आर्थिक पाठबळ सर्वांत महत्त्वाचे होते. बंदरे ताब्यात घेतल्यानंतर आणि जहाजे बांधल्यानंतर महाराजांनी व्यापाराच्या माध्यमातून धन मिळवण्याचा प्रयत्न केला. आपली व्यापारी जहाजे त्यांनी अरबस्तान आणि पारशी प्रदेशात पाठवली. मात्र, पूर्वेकडील व्यापार करणाऱ्या युरोपियन व्यापाऱ्यांच्या स्पर्धेमुळे या व्यापारावर अवलंबून राहणे जोखमीचे होते. त्यामुळे त्यांनी संपत्ती मिळवण्यासाठी आर्थिक दृष्टिकोनाबरोबरच थेट शत्रूपक्षाच्या श्रीमंत शहरांवर धाडसत्रे घालण्याचा मार्ग स्वीकारला” असे त्र्यंबक शेजवलकरांनी त्यांच्या SIVAJI’S RAID ON BASRUR या शोधनिबंधात म्हटले आहे. जानेवारी १६६४ साली त्यांनी सुरतवर आक्रमण करून मोठ्या प्रमाणात लूट मिळवली. या मिळालेल्या संपत्तीचा उपयोग त्यांनी सागरी किल्ला (सिंधुदुर्ग) उभारण्यासाठी आणि नव्या जहाजांच्या निर्मितीसाठी केला. त्यावेळी शिवाजी महाराजांनी साठ नवीन जहाजे बांधली आणि चाळीस जलदगतीने हालचाल करणाऱ्या जहाजांचा ताफा तयार ठेवला असल्याची बातमी पसरताच, त्यांच्या पुढील हालचालीबद्दल विविध अफवा पसरल्या आणि पाश्चिम किनारपट्टीवरील सत्ताधीशांमध्ये दहशत निर्माण झाली. १६६४ च्या पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) त्यांनी गुप्तपणे पन्नास हजार पायदळ आणि दहा हजार घोडदळ सैन्य भरती केले, अशा चर्चाही सुरू होत्या. त्यामुळेच वेंगुर्ल्याच्या आसपासच्या एखाद्या बंदरावर ते आक्रमण करणार आहेत असा समज डचांचा झाला, तर सुरतचा मुघल सुभेदार आपल्या प्रदेशावर हल्ल्याची भीती बाळगून होता.
बसरूरची निवड कशी करण्यात आली?
मात्र, शिवाजी महाराजांनी संपूर्ण पावसाळ्यात आपली मोहीम गुप्त ठेवली. नोव्हेंबरमध्ये मात्र त्यांचा हेतू स्पष्ट झाला. त्यांनी चार जहाजे उत्तर कर्नाटकच्या किनाऱ्यावरील भटकल बंदराच्या दिशेने पाठवली. त्याआधीच त्यांनी वेंगुर्लामार्गे गोव्याच्या सीमेपर्यंत आपली आगेकूच केली होती. त्यांचा मूळ हेतू उत्तर कर्नाटकच्या दिशेने जाण्याचा होता. राज्यविस्तार आणि विजापूर तसेच पोर्तुगीजांना शह देण्यासाठीचा हा मार्ग होता. मात्र, त्यांच्या दक्षिणेकडील मोहिमेला विजापूरचा सेनापती खवासखानने अडसर निर्माण केला आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना पुन्हा फोंडा किल्ल्यावर परतावे लागले. म्हणूनच या विरोधात त्यांनी हल्ल्याचा दुसरा मार्ग निवडला आणि डिसेंबरच्या सुरुवातीस हुबळी व घाटमाथ्यावरील काही इतर गावे लुटली. त्यानंतर त्यांनी उत्तर कर्नाटकातील बेडनूरचे मुख्य बंदर बसरूरसाठी नौदल मोहीम आखली आणि ते मोठी लूट मिळवून परतले. महाराजांच्या यशामागे मुख्य कारण म्हणजे त्यांनी योग्य वेळ आणि स्थळ याची केलेली निवड.

बेडनूर का महत्त्वाचे होते?
प्रारंभी बेडनूरचे नायक हे विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखालील केळदी संस्थानाशी संबंधित होते. त्यांना त्यांची राजधानी इक्केरीच्या नावावरून इक्केरी नायक म्हणूनही ओळखले जात असे. या वंशातील सर्वांत पराक्रमी आणि दूरदर्शी शासकांपैकी शिवप्पा नायक हा होता. प्रारंभी तो वीरभद्राच्या अधिपत्याखाली एक सेनानी म्हणून कार्यरत होता. नंतर (१६४५-६०) स्वतः नायक म्हणून भोवतालच्या प्रदेशांवर त्याने स्वारी केली आणि उत्तरेस गोकर्ण मंदिराच्या दक्षिणेकडील नदीपासून दक्षिणेकडे मलबार आणि कूर्गपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यांनी विजयनगरच्या शेवटच्या नामधारी सम्राटाच्या नावाखाली आपला विजय घोषित केला. या सम्राटाने त्यांना मैसूरच्या उत्तरेस जिंकलेल्या प्रदेशावर आणि दक्षिणेकडील चार भागांवर निष्ठावान सरदार म्हणून मान्यता दिली. मात्र, विजापूरचा मुस्तफा खान आणि गोलकोंडाचा सेनापती यांनी एकत्र येऊन पूर्व किनाऱ्यावरून शिवप्पा नायकांना हुसकावून लावले तर मैसूरच्या इतर सरदारांनी आपली स्वायत्तता जाहीर केली. त्यामुळे, शिवप्पा नायकांनी उत्तर कर्नाटकाच्या सखल भागावर आपले लक्ष केंद्रित केले. या भागात सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून पोर्तुगीजांनी सागरी सार्वभौमत्वाचा दावा केला होता. परंतु, लवकरच डचांनी त्याला आव्हान दिले. डचांनी पोर्तुगीजांच्या वर्चस्वाविरुद्ध स्थानिक शक्तींना उत्तेजन आणि मदत दिली. उत्तर कर्नाटकाच्या पूर्व किनाऱ्यावर शिवप्पा नायकाने आधीच पोर्तुगीज प्रभावाला हादरा दिला होता आणि नंतर डचांच्या मदतीने त्यांच्या किल्ल्याला घेराव घालून त्यांचे प्रभुत्व मोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि १६५२ साली हळदीचा किल्ला ताब्यात घेतला. १६५३ साली कॅम्बोलिम (गंगोळी) जिंकले आणि पुढच्या वर्षी १६५४ मध्ये होन्नावर किल्ल्याला दीर्घकालीन वेढा घालून विजय मिळवला.

यावेळी पोर्तुगीज हे संरक्षण करण्यात अपयशी ठरले होते. त्यांचे लक्ष सिलोनच्या बचावावर केंद्रित होते. त्यांनी विजापूरशी तह करण्याचे ठरवले आणि आदिलशहाकडे शिवप्पा नायकाकडून मंगळूर पुन्हा पोर्तुगीजांकडे परत करावे अशी मागणी केली. त्यामुळे आदिलशहाने पोर्तुगीजांशी युती केली आणि नायकांना धमकावले. शिवप्पा नायकाचा मृत्यू १६६०-१६६२ या कालखंडात झाला. त्यानंतर बेडनूरच्या नायकपदासाठी अनेक दावेदार पुढे आले. त्यामुळे राज्य कमकुवत झाले होते. या संधीचा फायदा घेत शिवप्पाच्या भावाने शिवप्पाचा मुलगा भद्रप्पा याला डावलून सत्ता बळकावली. त्यानंतर आदिलशाही हस्तक्षेपामुळे वेंकटप्पा (शिवप्पाच्या भाऊ) बाजूला झाला आणि भद्रप्पा नायकपदी बसला. मात्र, तो किशोरवयीन असल्याने प्रत्यक्ष सत्ता त्याचा मंत्री मल्लप्पा याने सांभाळली. दरम्यान मल्लप्पा याने सोंडाच्या सरदाराचे प्रदेश बळकावल्याने त्याने विजापूरकडे धाव घेतली. परिणामी भद्रप्पाला सोंडाचा प्रदेश त्या सरदाराला परत द्यावा लागला आणि सात लाख सोन्याचे होन वार्षिक खंडणी द्यावी लागली. आदिलशाह विजापूरला परत गेल्यावर मल्लप्पाने पोर्तुगीजांकडून मदत घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना होन्नावर वगळता सर्व जुने तट परत देण्याचे मान्य केले. परंतु, मल्लप्पाचा ३ जुलै १६६४ रोजी गोव्यात मृत्यू झाला. तर त्याच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या अराजकतेचा फायदा पोर्तुगीज, डच आणि आदिलशाह यांनी घेण्याचा प्रयत्न केला.
परिस्थिती चिघळत असताना शिवाजी महाराजांनी वेंगुर्ला उध्वस्त केले आणि डच व पोर्तुगीज दोघांनाही जबर धक्का दिला. त्यांनी भटकळ बंदराच्या दिशेने चार शोध नौका पाठवल्या. त्यामुळे, त्यांना त्या प्रदेशाच्या भौगोलिक व राजकीय परिस्थितीची अधिक माहिती मिळाली.
मल्लप्पाच्या मृत्यूमुळे उत्तर कर्नाटकाच्या किनाऱ्यावरील जुनाट आणि पडझड झालेल्या किल्ल्यांवर पोर्तुगीजांनी नाममात्र ताबा मिळवला असला तरी ते सक्षम नव्हते. त्यांच्याकडे ना पुरेसा पैसा होता, ना संरक्षणाची व्यवस्था. त्यांच्या तिजोरीतील उत्पन्न कर आणि सीमाशुल्कांवर अवलंबून होते आणि त्यांचे लक्ष मुख्यतः उत्तरेकडे बॉम्बेकडे (मुंबई) लागले होते. बॉम्बे बेट इंग्लंडच्या राजा चार्ल्स दुसऱ्याला पोर्तुगीज राजकन्येच्या हुंड्यात देण्यात आले होते. पण भारतातील पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी कायदेशीर हस्तांतरण लांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोर्तुगीज राजाचे मन वळवण्यासाठी आणि हा करार रद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. १४ जानेवारी १६६५ रोजी राजाने अधिकृत आदेश दिल्यानंतर अखेर फेब्रुवारी १६६५ मध्ये बॉम्बे इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आले आणि त्याच दिवशी शिवाजी महाराजांनी गोव्याच्या किनाऱ्यावरून माळंद ते बसरूरपर्यंत जलमार्गाने प्रवास केला आणि पोर्तुगीज नियंत्रणाखालील प्रदेश पार केला.

शिवाजी महाराजांनी ८ फेब्रुवारी १६६५ रोजी बसरूरवरील मोहिमेसाठी प्रयाण केले. त्यांच्या ताफ्यात ८५ लहान युद्धनौका होत्या. या ताफ्याने उत्तर कर्नाटकच्या किनाऱ्यावरून प्रवास केला. कारवार, होनावर आणि भटकळ या प्रदेशांना मागे टाकत त्यांनी दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील कुंडापूर खाडी गाठली हा प्रवास सुमारे दोनशे किलोमीटर अंतराचा होता. त्या वेळी पोर्तुगीजांचे लक्ष मुंबईमध्ये गुंतले असल्यामुळे त्यांनी मराठ्यांच्या ताफ्यावर कोणताही हल्ला केला नाही. या स्वारीचा उल्लेख एका इंग्रजी पत्रात सापडतो.
इंग्रजी पत्राचा मराठी अर्थ: शिवाजीने मालवणहून ८५ फ्रीगेटस् आणि ३ मोठी जहाजे घेऊन गोव्यातील पोर्तुगीजांकडून कोणताही विरोध न होता (बार्सिलोर) बसरूरवर स्वारी केली आणि त्याने बसरूर लुटले. तो परत जाताना मिरजण आणि अंकोला यामधील गोकर्ण येथील हिंदू चर्चात (देवळात) गेला आणि नंतर ४००० पायदळ घेऊन अंकोल्यास आला. तेथे त्याने आपल्या बरोबर स्वराज्यात जाताना येणाऱ्या नद्या ओलांडण्यासाठी १२ फ्रीगेटस् ठेवून बाकीचे आरमार पुढे पाठवून दिले. अकोल्याहून शिवाजी कारवारला आला. ह्या वेळी आम्हाला हेरांकडून ही बातमी कळली होती. पळून जाण्यास वेळ कमी असल्याने आम्ही तेथील नदीत नांगरलेल्या मस्कतच्या इमामाच्या जहाजावर कंपनीचा माल आणि पैसा हलवला. जहाजाचा कप्तान इमनुएल दोनावाडो याने आम्हाला हव्या त्या बंदरास पोहचवले. शिवाजीच्या १२ फ्रीगेटस् आदल्या दिवशी पुढे गेल्या.” (मेहंदळे, पृ. ५३-५४)
बसरूरवरील हल्ला
बसरूरवर झालेल्या हल्ल्याचे कोणतेही सविस्तर वर्णन उपलब्ध नाही. परंतु सभासद बखरीतील (दुसरी आवृत्ती, पृष्ठ ५५) काही ओळींवरून असे दिसते की, शिवाजी महाराज पहाटे बसरूर येथे पोहोचले आणि शहरातील लोकांना काही कळण्याच्या आत त्यांनी हल्ला सुरू केला. कोणीही प्रतिकार केल्याचा उल्लेख नाही यावरून स्पष्ट होते की संपूर्ण प्रदेश जवळपास असंरक्षित होता. कुंडापूर येथे बसरूर बंदराच्या प्रवेशद्वाराचे संरक्षण करणारा एक लहानसा पोर्तुगीज किल्ला होता, पण त्यानेही कोणताही प्रभावी प्रतिकार केला नाही. बसरूर येथील लुटीचे मूल्य निश्चित करणे कठीण आहे. वेगवेगळ्या स्त्रोतांमध्ये त्याचे वेगवेगळे अंदाज दिले गेले आहेत. मात्र, सर्वांत कमी दिलेली किंमत देखील लाखो होन (सोन्याची नाणी) इतकी मोठी आहे. शिवाजी महाराज कधीही अत्यल्प लूट मिळवून मोठ्या नुकसानास कारणीभूत होतील अशा मोहिमा आखत नसत. शिवाजी महाराजांनी आपल्या नौदलाचा मुख्य भाग सुरक्षित ताफ्याच्या संरक्षणात परत पाठवला, तर स्वतः फेब्रुवारीच्या १८ तारखेच्या सुमारास फक्त १२ युद्धनौका आणि ४,००० सैनिकांसह प्रवास सुरू ठेवला. गोकर्ण येथे त्यांनी धार्मिक विधी पार पाडले आणि नंतर भूपथावरून अंकोला गाठले. त्यांच्या बरोबरच्या १२ युद्धनौकांनी त्यांचे सैन्य नद्या आणि खाड्यांमधून सुरक्षितपणे पार नेले. फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटी होळीनंतर ते राजगड येथे पोहोचले. अशा प्रकारे, संपूर्ण मोहिमेसाठी त्यांनी फक्त ४० दिवस घेतले होते. शिवाजी महाराजांची ही पहिली मोहीम अशाप्रकारे ऐतिहासिक ठरली!
संदर्भ:
Shejwalkar, T. S. “SIVAJI’S RAID ON BASRUR.” Bulletin of the Deccan College Research Institute, vol. 4, no. 2, 1942, pp. 135–46. JSTOR, http://www.jstor.org/stable/42929309. Accessed 18 Feb. 2025.