Chhatrapati Shivaji Maharaj statue inaugurated by PM Modi in 2023 collapses in Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र हा पुतळा सोमवारी (२६ ऑगस्ट २०२४ रोजी) दुपारी दीडच्या सुमारास कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वच माध्यमातून या घटनेवर टीका होत आहे. विशेष म्हणजे २१ व्या शतकात अनेक प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असताना उभारलेला पुतळा कोसळणं ही खरंच खेदाची गोष्ट असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. हा पुतळा ज्या सागरी किल्ल्यासमोर उभारण्यात आला, तो सिंधुदुर्गचा किल्ला शिवाजी महाराजांनी तब्बल ३५७ वर्षांपूर्वी बांधला होता परंतु तो आजही मजबूत आहे आणि काही महिन्यांपूर्वी उभारलेला महाराजांचा पुतळा मात्र एक वर्षही पूर्ण न होता कोसळला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा नौदलाचा मानबिंदू असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी आणि त्याच्या उभारणीत वापरल्या गेल्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणं नक्कीच समयोचित ठरणारे आहे.
सिद्धी आणि चाच्यांचे वर्चस्व
१९४६-४७ च्या सुमारास हिंदवी स्वराज्याच्या हालचाली जोमाने सुरु झाल्या होत्या. ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या सीमा विस्तारित केल्या. त्याच काळात गोव्याच्या पोर्तुगीजांनी विजापूरच्या आदिलशाहीला शह देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मालवणच्या आचरा खाडीजवळ कर्लीच्या लढाईत पोर्तुगीजांनी विजापूरच्या सैन्याचा पूर्ण पाडाव करून दक्षिण कोकण किनाऱ्यापट्टीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे आदिलशाहीचा प्रभाव या किनारपट्टीवर क्षीण झाला. तर दुसऱ्या बाजूला स्वराज्याच्या सीमा कोकण प्रांती विस्तारू लागल्या होत्या. कोकणातील समुद्रावर सिद्दी आणि त्याच्या चाच्यांचे वर्चस्व होते. तर टोपीकर, साहकार, इंग्रज, डच, वलंदेज, फरांसीसही या समुद्रावर आपला हक्क सांगत होते. विशेष म्हणजे या परकीयांकडे उत्तम दर्जाची शस्त्र होती.
अधिक वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड सोडून राजधानीचे ठिकाण रायगड का निवडले? काय होते यामागील समीकरण?
महाराजांची दूरदृष्टी
एकूणच केवळ जमिनीवरच नाही तर समुद्रातून चालणाऱ्या व्यापारावर यांचीच सत्ता होती. परिणामी त्यांची आर्थिक बाजू बळकट होती आणि हेच शिवाजी महाराजांनी बरोबर ओळखले होते. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध पारंगत होते, युक्ती आणि शक्तीच्या बळावर त्यांनी शत्रूला नामोहरम केले. त्यांच्या दूरदृष्टीचे अनेक दाखले दिले जातात. त्याचेच उदाहरण म्हणजे आरमार स्थापन करणे. हे आरमार केवळ शत्रूला नामोहरण करण्यासाठी नव्हते तर सागरी व्यापारामार्फत स्वराज्याची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठीही होते. १६६४ च्या जानेवारी महिन्यात महाराजांनी सुरत ही व्यापारी पेठ लुटून, त्या लुटीचा उपयोग आरमाराचे सशक्तीकरण, जलदुर्गांची बांधणी आणि डागडुजीसाठी केला.
किल्ला बांधणीसाठी मालवणची निवड का?
चित्रगुप्त रचित बखरीत सिंधुदुर्ग किल्ला कसा बांधला याची हकीकत दिली आहे. “आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल, तशी त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच, ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. त्याकरिता आरमार अवश्यमेव करावे.” अशी महाराजांची भूमिका होती. जंजिऱ्याचा शत्रू जबर होता ते महाराजांना माहीत होते. मुरुडचा जंजिरा हा सिद्दीच्या ताब्यात होता. त्याभोवतीचे त्याचे आरमारही दांडगे होते. जमिनीवाटे त्यांची रसद तोडली तरी समुद्र मार्ग त्यांच्यासाठी खुलाच होता. किंबहुना महाराजांनीही पुष्कळ प्रयत्न करून त्यांना जंजिरा घेता आला नाही. म्हणूनच महाराजांनी आरमाराच्या आणि सागरी किल्ल्याच्या पायाभरणीचा मनसुबा केला.
… आणि किल्ल्याची जागा महाराजांनी निश्चित केली
मोहिमेच्या निमित्ताने महाराज मालवण प्रांती आले त्यावेळी किनाऱ्याच्या जवळच असलेल्या एका बेटावर त्यांची नजर पडली. त्यांच्याबरोबर कृष्ण सावंत आणि भानजी प्रभू देसाई होते. त्यांनी महाराजांना त्या बेटाचे नाव कुरुटे असे सांगितले. महाराजांनी स्वतः त्या बेटाची पहाणी केली. या बेटावर पोहचण्यासाठी स्थानिक कोळ्यांनी मदत केली. हे स्थान महाराजांच्या पसंतीस पडले होते. त्यामुळे येथेच स्वराज्याचा पहिला सागरी किल्ला बांधण्याचे ठरले. यासाठी हिरोजी इंदुलकरांना बोलावण्यात आले. बांधकाम विद्येत त्यांचा अनुभव आणि तज्ज्ञता जबर होती. त्यांनी किनारपट्टीवरील स्थानिक कोळ्यांच्या मदतीने सारा परिसर तपासला. मराठी आरमाराच्या हालचालींसाठी अगदी योग्य असा जलदुर्ग अशा जागी हवा अशी त्यांची खात्री झाली. त्याप्रमाणे त्यांनी महाराजांना कळवले.
पालाणासाठी मोक्याची जागा
मालवणची प्राचीन ओळख महालवण अशी होती. मालवण हे प्राचीन बंदर होते याचे पुरावे वेगवेगळ्या कालखंडातील शिलालेखांमधून तसेच परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णनात सापडतात. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किनारपट्टीची पाहणी केली, त्यावेळी या सागर किनारी दडलेले भेसूर खडक शिवरायांना बरेच काही सांगून गेले. विवक्षित मार्गानेच कसेबसे आत येणारे पडाव, होडके, तरांडे, मचवे त्यांना दिसले तेंव्हा दर्याला पालाण घालायला ही जागा अतिशय मोक्याची आहे हे त्यांनी ताडले.
मोरयाचा धोंडा
विधिवत पूजा करून किल्ल्याच्या बांधणीचा मुहूर्त ठरला. पूजाविधी जेथे झाली तो मोरयाचा धोंडा आजही मालवणच्या किनाऱ्यावर उभा आहे. या ठिकाणी गणेशपूजा आणि त्यानंतर सागरपूजा करून सुवर्णाचे श्रीफळ समुद्रार्पण करण्यात आले. मग राजांची होडी कुरुटे बेटावर गेली. तिथे मुहूर्ताचा चिरा वसवला गेला. ५०० पाथरवट आणि २०० लोहार या किल्ल्याच्या बांधकामासाठी आणले. शिवाय शंभर गोवेकर आणि तीन हजार मजूर तीन वर्ष एकसारखे खपत होते. किल्ल्याच्या पायाचे दगड पंचखंडी शिशाच्या रसात वसविले.
जनसामान्यांचाही सहभाग
आदमासे एक कोटी होन खर्चून हा सिंधुदुर्ग किल्ला आकाराला आला. सामान्य भिक्षुकापासून कोळी, आरमारी जातींपर्यंत सगळे या कार्यात सहभागी झाले होते. मार्गशीर्ष बहुल द्वितीया, शके १५८६ म्हणजे २५ नोव्हेंबर १६६४ सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचा शुभारंभ झाला. दुर्गाची उभारणी सुरु असताना ८ फेब्रुवारी १६६४ रोजी मालवण बंदरातून २५ गलबतं, तीन मोठे तारवे घेऊन बसरूरच्या ठिकाणी गेल्याची नोंद इंग्रज कागदपत्रांमध्ये सापडते. या नोंदीनुसार मराठ्यांनी कोकणातील नऊ बंदरांवर मालकी निर्माण केली होती. यातून मराठा नौदलाच्या वाढत्या व्याप्तीची कल्पना येते. महत्त्वाचे म्हणजे आजही भारतीय नौदल आपल्या निर्मितीचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच देते.
महाराजांची देखरेख
महाराजांसाठी हा दुर्ग बांधणीचा प्रकल्प महत्त्वाचा होता. अनेक अधिकारी या कामात व्यग्र होते. दुर्गाच्या कामात परकीयांचा व्यत्यय येऊ नये म्हणून पाच हजार संरक्षक मावळे दर्यावर पहारा करीत होते. एका आणीबाणीच्या क्षणी, दुर्गाच्या मजबुती संबंधी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना पत्र लिहून सविस्तर सूचना दिल्या होत्या. महाराजांचे या बांधकामावर बारकाईने लक्ष होते. महाराजांचे हे पत्र गजानन वालावलकर यांनी आपल्या सिंधुदुर्गावरील लेखात प्रकाशित केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र
“आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे हे बरे जाणणे, अवघे काम चखोट करणे, माणसे नवी आहे ती त्यास सांभाळोन इत्येकांचा उपेग करोन घेणे. पाय बहुत भला रुंद घेणे, खाली अवघा कातळ तरी वरी थोर इमारत तस्माद दो बाजूस दोन हात जागा सोडोन तर उभारता ये इतकी रुंदी घेणे, तर कोठे रुंद तर कोठे जागा अरुंद येणेप्रमाणे धरावा लागतो. अनुकूल दिलेस त्याप्रमाणे करणे. पायात ओतण्या आधी शिसे धाडायची व्यवस्था केली असे. नीट पाहोन मोजुन माळ ताब्यात घेणे. टोपीकर सावकार लबाड जात. डोळियातील काजळ चोरून नेतील. पत्ता लागो देणारा नाहीत. पुनःत्त्परतोन त्या कामाचा रोजमुरा मागतील. सावध असणे. गोडे पाणी हाताशी बहुत. पाण्याच्या थवापाशी टाक्या बांधोन त्यात वाळू साठविणे. गोड्या पाण्यामध्ये चार दोनदा भिजू देणे. खारटपणा धुतले जाईल. ती धुतलेली वापरणे. चुनखडी घाटावरोन पाठवत असो. बारी तपासोन घेत जाणे. मिसळ असणार नाही. तरी सावध असणे उत्तम. रोजमुरा हररोज देणे जाणे, त्यास किमपि प्रश्नच न देणे.”
अधिक वाचा: छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकामागे नेमकी मुत्सद्देगिरी काय होती?
शिवलंका अजिंक्य जागा…
दुर्गाचे काम सुरु असताना महाराज वारंवार कोकणात येत असत. परंतु दरम्यान महाराजांना आग्र्याला झालेली नजरकैद नंतर सुटका या सर्व कालखंडात गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या देखरेखीखाली सिंधुदुर्गाचे बांधकाम चालू होते. शिवरायांचे मुख्य स्थपती हिरोजी इंदुलकर यांचेही जातीने लक्ष असायचे. चैत्र शु. पौर्णिमा, शके १५८९ म्हणजेच २९ मार्च १६६७ रोजी सिंधुदुर्गचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंदही मिळते. चित्रगुप्ताच्या बखरीत किल्ला बांधकामाच्या यशाचे वर्णन करताना म्हटले आहे की, “चौऱ्यांऐंशी बंदरात हा जंजिरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा. जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन. राज्याच्या भूषणप्रद अलंकार. चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले.”
पद्मगड, सर्जेकोट, राजकोट
हा किल्ला अजय राहावा म्हणून त्याच्या पुढ्यातच असणाऱ्या खडकावर पद्मगड उभारण्यात आला. समोरच सर्जेकोट आणि राजकोट उभारण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी नागमोडी आहे. चार किलोमीटरच्या घेराच्या तटबंदीस वीस हेक्टर क्षेत्रफळ सामावले गेले आहे. दहा मीटर उंचीच्या तटबांधणीत वर खाली जाण्यासाठी ४५ जिने आहेत. पहारेकऱ्यांसाठी शौचकूपांची देखील सोय आहे. बुरुजांवर अर्धवर्तुळाकार तोफा ठेवण्याची सोय आहे. प्रवेशद्वारापाशी बाहेरच्या अंगास दक्षिणमुखी हनुमानाची स्थापना केलेली आढळते. एकूणच या किल्ल्याच्या बांधकामात प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी जातीने लक्ष घातलं होत. किल्ल्याचा पाया मजबूत व्हावा यासाठी काय करता येईल, बांधकामात वापरण्यात येणारा माल कसा पडताळून पहावा, किंवा लबाड टोपीकर सावकारांपासून सावध राहावे या महाराजांनी दिलेल्या मोलाच्या सल्ल्यातून आज ही बोध मिळतो!
अशी दूरदृष्टी असलेल्या छत्रपतींनी बांधलेला किल्ला आजही अभेद्यच आहे. मात्र सरकारने उभारलेला पुतळा कोसळला यामुळे जनसंताप उसळला असून छत्रपतींच्याच दूरदृष्टीचे दाखले देत सर्वच क्षेत्रांतून सरकारवर टीका होत आहे.
संदर्भ:
शिवलंका सिंधुदुर्ग; प्र. के. घाणेकर १९७६.
कोकणचा मानबिंदू सिंधुदुर्ग; अशोक कामत आणि प्र. के. घाणेकर १९८५.
मराठा आरमार एक अनोखे पर्व; डॉ. सचिन पेंडसे, २०१७.
A History of the Maratha Navy and Merchantships; Dr. B.K.Apte 1973.