Shivaji Maharaj Temple in Maharashtra: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१७ मार्च) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात राज्यातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलेल्या मंदिराचे उद्घाटन केले. त्याच पार्श्वभूमीवर या मंदिराच्या वैशिष्ट्यांचा घेतलेला हा आढावा.

छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील दुसरे मंदिर

भिवंडी येथील शिवक्रांती प्रतिष्ठान या ट्रस्टने बांधलेले छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित हे महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र मंदिर आहे, असे सांगितले जात असले तरी हे भारतातील दुसरे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित पहिले मंदिर तेलंगणातील श्रीशैलम येथे आहे.

२०१७ मध्ये मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू पंचांगानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिराची पायाभरणी २०१७ मध्ये करण्यात आली आणि प्रत्यक्ष बांधकाम २०१८ साली मार्च महिन्यात सुरू झाले होते. त्याआधी ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन पालक मंत्री आणि नगर विकास मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.

२,५०० चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेले वर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या वास्तुशैलीने प्रेरित हे मंदिर २,५०० चौरस फूट क्षेत्रफळावर बांधले गेले आहे. याशिवाय, ५००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या किल्ल्यासारख्या तटबंदीने हे मंदिर वेढलेले आहे. या मंदिराचे बांधकाम शिवक्रांती प्रतिष्ठान या संस्थेने केलेलं असून ही संस्था स्थानिक बांधकाम व्यावसायिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त राजू चौधरी यांनी स्थापन केली आहे. राजू चौधरी यांनीच या मंदिरासाठी जागा दान दिली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची ६.५ फूट उंच मूर्ती

या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे ६.५ फूट उंचीची काळ्या दगडात कोरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. ही मूर्ती मैसूरस्थित प्रख्यात शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. दिल्लीतील इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांची २२ फूट उंच मूर्ती, केदारनाथ येथे १२ फूट उंच आदि शंकराचार्य यांची मूर्ती तसेच अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात विराजमान राम लल्लांची मूर्ती त्यांनीच घडवली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपासून प्रेरणा

हे मंदिर वास्तुविशारद विशाल विजयकुमार पाटील यांनी डिझाईन केले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या वास्तुशैलीवर आधारित आहे. मंदिराला किल्ल्यासारखी तटबंदी, बुरुज आणि भव्य प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या सभामंडपातील खांब अत्यंत नाजूक कोरीवकामाने सजवले गेले आहेत आणि महिरपाकार भव्य कमानींनी सौंदर्य खुलवले आहे. मुख्य प्रवेशद्वार ४२ फूट उंच असून त्याला २७ फूट उंच आणि १७ फूट रुंद सागवान लाकडाचे दरवाजे लावण्यात आले आहेत. हे संपूर्ण मंदिर सिमेंट-कॉंक्रिट, विटा आणि नैसर्गिक दगड यांच्या मिश्रणातून भव्य स्वरूपात उभारण्यात आले आहे.

३६ विभाग आणि भित्तिचित्रे

मंदिराच्या किल्ल्याच्या तळभागात एकूण ३६ विभाग आहेत. त्यात ९×६ फूट आकाराची भव्य भित्तिचित्रे कोरली आहेत. या भित्तिचित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग दर्शविण्यात आले आहेत. याशिवाय, इतिहासातील विविध शस्त्रे आणि चिलखतांचे संग्रहालय देखील मंदिर संकुलात उभारण्यात आले आहे. मंदिराभोवती सुंदर बगिचा असून संपूर्ण परिसर हा ऐतिहासिक भव्यतेने सुसज्ज आहे.

प्रदेशाच्या विकासाला संभाव्य चालना

मंदिर न्यासाला आशा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून तीर्थयात्री आणि पर्यटकांना आकर्षित करेल. त्यामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा न्यासाचा विश्वास आहे. पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी सरकारच्या मदतीची अपेक्षा न्यासााला आहे. यात मंदिराच्या आसपास वसतिगृह सुविधा उभारणे आणि मंदिराच्या शेजारी पोलीस चौकी स्थापन करणे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे की लवकरच या मंदिराला अधिकृत तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल.

या मंदिरापर्यंत कसे पोहोचाल ?

सध्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. सर्वात जवळील रेल्वे स्थानके भिवंडी आणि वसिंद अनुक्रमे १७ किमी आणि २५ किमी दूर आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहनाचा वापर करता येतो. तसेच ऑटो-रिक्षा किंवा खासगी वाहन भाड्याने घेऊन प्रवास करता येतो.

Story img Loader