Raigad Chhatrapati Shivaji Maharaj’s Dog History: छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रायगड किल्ल्यावर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याची मागणी केली आहे. हा कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा असल्याचे मानले जाते. ‘वाघ्या’ नावाच्या या कुत्र्याचा पुतळा १९३० च्या दशकात त्याच्या निष्ठा आणि शौर्याच्या सन्मानार्थ उभारण्यात आला होता. १६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या निधनानंतर वाघ्या नावाच्या या कुत्र्याने त्यांच्या चितेत उडी मारून स्वतःहून प्राणत्याग केला, अशी कथा सांगितली जाते. आता याच कुत्र्याच्या पुतळ्यावरून पुन्हा एकदा इतिहासाशी संबंधित वादाला नवे तोंड फुटले आहे.
नेमका वाद काय आहे?
रायगड किल्ल्यावर असलेला वाघ्या या कुत्र्याचा पुतळा हटविण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २२ मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात हा पुतळा ३१ मेपूर्वी हटवावा अशी मागणी केली आहे. “हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्त्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती केली आहे”, असे पत्रात संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

१०० वर्षे होण्याआधी हटवा

“समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे,” असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शिवाजी महाराजांच्या कुत्र्याबद्दलचे सत्य

HistoryDraft या संकेत स्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ‘वाघ्या’ या शब्दाचा अर्थ वाघ होतो. वाघ्याचा जन्म १६७० च्या दशकात मराठा साम्राज्यातील रायगड किल्ल्यावर झाला होता. लोककथेनुसार, तो मिश्र वंशाचा पाळीव कुत्रा होता. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले, त्यावेळेस वाघ्याने चितेत उडी घेऊन प्राणत्याग केला, अशी लोककथा सांगितली जाते. १९०६ मध्ये इंदौरचे राजकुमार तुकोजी होळकर यांनी वाघ्याच्या सन्मानार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ स्मारक उभारण्यासाठी ५,००० रुपये देणगी दिली होती. नरसिंह चिंतामण केळकर यांच्या नेतृत्वाखालील श्री शिवाजी रायगड स्मारक समितीने (SSRSS) १९३६ मध्ये वाघ्याचा पुतळा उभारला.

शिवछत्रपतींच्या सैन्यात मुधोळ हाऊंड?

मराठीतील ख्यातनाम नाटककार राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकातही वाघ्याच्या पराक्रमाची कथा दाखवण्यात आली आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाने (ASI) या कथेला पाठिंबा देणारा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. शिवाजी महाराजांचे कुत्र्यांवर विशेष प्रेम होते. त्यांनी कर्नाटकातील स्थानिक प्रजातीचा ‘मुधोळ हाऊंड’ आपल्या सैन्यात समाविष्ट केला होता, असेही सांगितले जाते.

मुधोळ हाऊंड

एका लोककथेनुसार, या मुधोळ हाउंड्सपैकी एका कुत्र्याने शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांचे प्राण वाचवले होते. खरं तर २०२२ साली पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या विशेष सुरक्षा गटात (SPG) मुधोळ हाउंड या जातीचा समावेश करण्यात आला होता. २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात भारतीय लष्कराने मुधोळ जातीच्या कुत्र्यांची काही पिल्ले आपल्या रिमाउंट अँड व्हेटरनरी कोअर (RVC) प्रशिक्षण केंद्रात दाखल केली होती. या केंद्रात लॅब्राडॉर आणि जर्मन शेफर्डसारख्या परदेशी जातींना सेवेमध्ये घेण्याआधी प्रशिक्षण दिले जाते.

पुन्हा एकदा सैन्यात निवड

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आठ कुत्र्यांपैकी सहा कुत्र्यांची श्रीनगरमधील मुख्यालय १५ कोअर आणि नगरोटा येथील १६ कोअरसाठी प्रत्यक्ष चाचणी आणि उपयोगिता परीक्षणासाठी निवड झाली होती. या कुत्र्यांना स्फोटकं ओळखण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. मालोजीराव घोरपडेंनी १९०० च्या सुरुवातीला इंग्लंड दौऱ्यावर असताना याच कुत्र्याची दोन पिल्ल पंचम जॉर्ज यांना भेट दिली होती. कर्नाटकमधील मुधोळ गावात या श्वानाचं संगोपन करण्यात येतं. या ठिकाणी जवळपास ७५० कुटुंब मुधोळ हाऊंडचं पालन करतात आणि मग त्याची विक्री केली जाते. याच मुधोळ गावावरून या कुत्र्याचं नाव मुधोळ हाऊंड असं पडलं आहे.

पहिल्यांदाच घडलेले नाही

२०११ साली संभाजी ब्रिगेडने रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवण्याची अशीच मागणी केली होती. “या कुत्र्‍याच्या अस्तित्वाबाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. सरकारने ६ जूनपर्यंत हा पुतळा हटवावा, अन्यथा आम्ही तो फोडू,” असे ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांनी सांगितले होते. “आम्ही फक्त पूर्वीचा चुकीचा इतिहास दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यांना या कुत्र्याच्या पुतळ्याबद्दल आस्था आहे त्यांनी तो घरी नेऊन ठेवावा,” असेही त्यांनी पुढे नमूद केले. या संघटनेने असा दावाही केला होता की, ब्राह्मण इतिहासकारांनी लिहिलेला शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा आहे आणि तो मराठा समाजावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्या पद्धतीने लिहिला गेला होता. त्यांनतर वाघ्याचा पुतळा हटवण्यात आला होता. मात्र, स्थानिक धनगर समाजाने केलेल्या विरोधामुळे पुन्हा पुतळा बसवण्यात आला. आता छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्रानंतर हा पुतळा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.