सौरभ कुलश्रेष्ठ

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीवाटपावरून राष्ट्रवादीकडील अर्थखात्यावर पर्यायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी, आमदारांनी उघडपणे नाराजीचा सूर लावल्यानंतर गृह विभागाच्या कारभारावरही शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा झाली. या घटनांना आठवडाही उलटत नाही तोच गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांचे जाहीर कौतुक करत आघाडीत आलबेल असल्याचा दावा केला. त्याचबरोबर मुंबईत मराठीविरोध सहन करणार नाही या शिवसेनेच्या मराठी अस्मितेच्या सुरात अजित पवारांनी सूर मिसळल्याचे दिसले. आठवडाभरात वातावरण एवढे कसे बदलले? ते खरे की हे खरे असा प्रश्न पडावा इतके मनपरिवर्तन दोन्ही पक्षांचे कसे झाले?

काय म्हणाले ठाकरे-पवार?

मराठी माणूस म्हटले की संघर्ष आलाच. मुंबईही आपल्याला संघर्ष करूनच मिळाली हे विसरता येणार नाही. दुकानांवर मराठी पाट्यांच्या निर्णयाला विरोध होतो. मुंबईवरचा मराठी ठसा पुसण्याचा प्रयत्न केल्यास योग्य तो धडा शिकवू. कोणीही यावे आणि उरावर नाचावे हे चालणार नाही, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विरोधकांना म्हणजेच भाजपला दिला. तर महाराष्ट्रात राहायचे आणि मराठीला विरोध करायचे हा नैतिकद्रोह असल्याची तिखट टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मुंबईत येऊन पोट भरता आणि गावाकडे पैसे पाठवता. मग मराठी पाट्यांना विरोध कसा करता, असा सवालही अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादीने मुंबई आणि मराठीवादी सूर लावण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी मागच्या वर्षी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी असाच सुरात सूर मिसळला होता. बीडीडी चाळीच्या रूपात मुंबईत मराठी टक्का टिकला आहे. पुनर्विकासानंतर मिळणारी नवीन घरे विकून जाऊ नका. मुंबईतील मराठी टक्का टिकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे व शरद पवार या दोघांनी त्यावेळी केले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी मुंबई आणि मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या सुरात सूर मिसळल्याचे चित्र दिसले. तसेच जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय अजित पवार यांना आहे. आपल्यामध्ये कटुता निर्माण व्हावी अशा मनाच्या गुढ्या काही जण उभारत आहेत. त्यांना आपण आपल्या कृतीतून दिलेले हे चोख उत्तर आहे, अशा शब्दांत अजित पवारांचे कौतुक करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी कसलाही वाद नसल्याचा संदेश दिला. स्थानिक पातळीवर संघटना व लोकप्रतिनिधींच्या पातळीवर काही प्रमाणात कुरबुरी असल्या तरी आमच्यात (नेतृत्वामध्ये) सहमती व परस्पद सहकार्य असल्याचा संदेश यातून पवार-ठाकरे यांनी दिला.

मुंबईतील सध्याची राजकीय समीकरणे

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यावर्षी होणार आहेत. मुंबईत मराठी, उत्तर भारतीय, गुजराती, अल्पसंख्याक हे चार प्रमुख मतदारवर्ग आहेत. गेल्या काही वर्षांत भाजपच्या हिंदुत्वाच्या लाटेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यामुळे मुंबईतील गुजराती आणि व्यापारी समाजातील मतदार भाजपकडे वळला असून त्याचे प्रत्यंतर २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुका, २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत आले. उत्तर भारतीय मतदार पूर्वी प्रामुख्याने भाजप व काँग्रेसमध्ये विभागलेला होता. आता मुंबईतील काँग्रेसचे बरेच उत्तर भारतीय नेते भाजपवासी झाल्याने व उत्तर प्रदेश हिंदुत्वाच्या राजकारणाचा आधार झाल्याने उत्तर भारतीय मतदार भाजपकडे वळला आहे. त्यामुळे अल्पसंख्याक मतदार आणि मराठी मतदार हे दोन मतदार वर्ग भाजपविरोधी राजकीय समीकरणांना साथ देऊ शकतात.

मराठीवरून शिवसेना-राष्ट्रवादीचे संभाव्य गणित

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता टिकवण्यासाठी गुजराती व उत्तर भारतीय मतदारांकडून आता शिवसेनेला फारशी आशा नाही. उलट या दोन मतदारवर्गांच्या आधारे शिवसेनेची मुंबईतील सत्ता उलथवून टाकण्याची भाजपची रणनीती आहे. शिवाय काही प्रमाणात मराठी मतदारांनाही आपल्याकडे ओढता येईल असा भाजपचा विचार आहे. मनसे हा तिसरा वाटेकरी मराठी मतांमध्ये असला तरी अजूनही शिवसेनेला मराठी अस्मितेच्या मुद्यावर मराठी मतदारांवरील प्रभाव टिकवण्याची आशा आहे. आगामी निवडणुकीत हा मराठी मतदार आपल्या खेचण्यासाठी भाजप-मनसे प्रयत्न करणार हे उघड असल्याने शिवसेनेने मराठी हिताचा सूर आक्रमकपणे लावला आहे. शिवाय मराठी पाट्या, मराठी विषय शिकणे यासारख्या गोष्टींना विरोध करणारी मंडळी ही भाजपचे समर्थक असल्याने मराठीविरोधाला भाजप आश्रय देतो ही मांडणी अधिक ठळकपणे करून मराठी मतदार आपल्याकडे खेचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या विधानांमधून दिसून आला. त्याचबरोबर अजित पवार यांचे कौतुक करत महाविकास आघाडी सरकार स्थिर ठेवून मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांना सोबत घेण्याचा विचारही दिसतो.

विश्लेषण : राऊतांच्या संपत्तीवर जप्ती आणणारं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा?

काँग्रेसने महापालिका निवडणुकीतील आघाडीबाबत वेगळा सूर लावलेला असला तरी राष्ट्रवादी आपल्यासोबत आल्यास काँग्रेसलाही राजी करण्याची संधी मिळू शकते. त्यातून भाजप-मनसेला तोंड देण्यासाठी शिवसेनेच्या मदतीला महाविकास आघाडीतील हे दोन्ही पक्ष आले तर महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांच्या जोडीला अल्पसंख्याक मतदारांची मोट बांधून महापालिकेतील सत्ता राखता येईल, असे संभाव्य गणित शिवसेना मांडत आहे. तर शिवसेनेच्या आधारे मुंबई महापालिकेत शक्य तितका प्रभाव वाढवण्याचे आणि त्याचबरोबर मुंबई महानगर क्षेत्रात नवी मुंबई, ठाणे आदी परिसरात राष्ट्रवादीला बळ मिळावे असा हेतू दिसतो. त्यातून शिवसेना- राष्ट्रवादी हे मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक सूर लावत मुंबई महापालिका व मुंबई महानगर परिसरात संभाव्य युतीचे संकेत देत आहेत.