देशातील लहान शहरे आणि खेड्यात राहणारे लोकं नोकरी किंवा व्यवसायानिमित्त महानगर किंवा कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये स्थलांतरित होत असतात. सुरुवातीला काही दिवस भाड्याच्या घरात राहिल्यानंतर, उत्पन्न चांगलं मिळू लागलं की, लोकांच्या मनात पहिला विचार येतो, तो म्हणजे घर किंवा फ्लॅट विकत घेण्याचा… तेव्हा आपण भाड्याच्या घरात राहायचं की स्वत:चं घर खरेदी करायचं? हा प्रश्न उद्धभवतो. त्यामुळे या लेखात आपण अशाच काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला संबंधित प्रश्नांचे उत्तर शोधण्यात काही प्रमाणात मदत होऊ शकते.
जेव्हा तुम्ही घर विकत घेण्याचा किंवा भाड्याने राहण्याचा निर्णय घेता, तेव्हा तुमच्या आर्थिक स्थितीवर, अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम होतो. तुमची सद्याची आर्थिक स्थिती, भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे, आगामी मोठे खर्च आणि संभाव्य आपत्कालीन खर्च या सर्व बाबींचा विचार करून तुम्ही तुमचा निर्णय घेत असता. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, पुढच्या २० वर्षांत तुम्हाला कोणते मोठे खर्च करायचे आहेत? तोपर्यंत तुमची आर्थिक स्थिती कशी असेल? आणि गृहकर्जासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील? अशा सर्व प्रश्नांची गोळाबेरीज करावी लागते.
घर खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने घेण्यासाठी प्रारंभिक येणारा खर्च
जर तुम्ही दिल्ली किंवा नोएडामध्ये ६० लाख रुपयांपर्यंत फ्लॅट भाड्याने घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दरमहा सरासरी १२ ते १७ हजार रुपये भाडं द्यावं लागेल. त्यात देखभाल शुल्काचाही (मेंटेनन्स) समावेश आहे. दुसरीकडे, ६० लाख रुपये खर्चून तुम्ही तेच घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला किमान १५ लाख रुपयांचं डाउन पेमेंट करावं लागेल. उर्वरित ४५ लाख रुपयांचं गृहकर्ज तुम्हाला बँकेकडून घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला सुमारे ४० ते ४५ हजार रुपयांपर्यंत ईएमआय भरावा लागेल.
घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकाच वेळी दोन प्रकारचा आर्थिक बोझा तुमच्यावर पडू शकतो. एक म्हणजे घर घेताना डाउन पेमेंटसाठी आवश्यक असणारी १५ लाखांची रक्कम आणि दुसरे म्हणजे दरमहा भरावे लागणारे कर्जाचे हफ्ते. याशिवाय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा थेट परिणाम EMI वर होतो.
दीर्घकालीन कर्ज घेतल्यास किती आर्थिक भार पडू शकतो
जर तुम्ही २० वर्षांच्या मुदतीसाठी ६० लाखांचं गृहकर्ज घेतलं, तर कर्ज ते संपल्यावर तुमच्या घराची किंमत जवळपास दुप्पट होते.
घराची मूळ किंमत – ६० लाख रुपये
डाउन पेमेंट – १५ लाख रुपये
सरासरी EMI – ४५,००० X १२ X २० = रु. १,०८,००,०००
एकूण किंमत – रु १,२३,००,०००
दुसरीकडे, भाड्याच्या घरात राहण्याचा विचार केला तर अशा फ्लॅटसाठी तुम्हाला पुढील २० वर्षांसाठी दरमहा सरासरी २० हजार रुपये द्यावे लागतील. याची एकत्रित गोळाबेरीज केली तर पुढील २० वर्षासाठी तुम्हाला ४८ लाख रुपये भाडं द्यावे लागेल. याचा अर्थ भाड्याच्या घरात राहणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.
घर-फ्लॅटच्या किमतीत कमी वाढ
घर खरेदी करण्याच्या बाबतीत तुम्ही असाही युक्तिवाद करू शकता की पुढील २० वर्षांत संबंधित घराची किंमत वाढेल. पण अलीकडच्या काही वर्षांतील कल पाहता असं लक्षात येतं की, मालमत्तेची किंमत पूर्वीसारखी झपाट्याने वाढत नाही. पूर्वी मालमत्तेचं मूल्य ४ किंवा ५ वर्षांत दुप्पट होत असे, पण आता १० वर्षांत दुप्पट होण्याचा दावाही करता येणार नाही.
भविष्यात नोकरी आणि राहण्याचं ठिकाण बदलू शकते
सध्याच्या युगात बहुसंख्य तरुण वेगाने नोकऱ्या बदलण्यावर विश्वास ठेवतात. यामुळे त्यांना पद आणि पगार दोन्हीमध्ये मोठा फायदा होतो. शिवाय एकाच शहरात आपण खूप काळ राहू याबाबत स्पष्टता नसते. काही लोकांना तर ते भारतात किती काळ काम करू शकतील, याचीही खात्री नसते. याशिवाय दिल्ली, मुंबई सारखी काही शहरं इतकी मोठी आहेत की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तासन्तास लागतो. अशा स्थितीत तुम्हाला घर विकत घ्यायचं आहे की भाड्याने? ठरवावं लागेल.
करोनानंतर मालमत्तेच्या किमती झपाट्याने वाढल्या
रिअल इस्टेट तज्ज्ञ प्रदीप मिश्रा यांच्या मते, करोना साथीनंतर लोकांना घर आर्थिक बाबींपेक्षा सुरक्षितता आणि मानसिक आरामाचा मुद्दा वाटू लागला आहे. दिल्लीमध्ये करोना साथीनंतर फ्लॅटच्या किमतीत सरासरी २० टक्के आणि जमिनीच्या किमतीत सरासरी ८० टक्के वाढ नोंदली आहे. घर खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. एवढेच नव्हे तर लोकांना २ बीएचके फ्लॅटची गरज असेल तर ते ३ बीएचके फ्लॅट खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. मिश्रा यांच्या मते, करोना काळात परदेशात काम करणाऱ्या लोकांनाही भारतात किमान एक हक्काचं घर असलं पाहिजे, असं वाटू लागलं. यामुळे घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
घर खरेदी करायचं नसल्यास काय करावं?
तुम्हाला जर घर खरेदी करायचं नसेल, तर तुम्ही भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटचा EMI किती आहे? ते शोधा. त्यानंतर संबंधित रकमेतून भाडे वजा करा. उरलेली रक्कम तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवू शकता, ज्यातून तुम्हाला भरघोस नफा मिळू शकतो. उदा. २० हजार रुपये भाडे देऊन तुम्ही फ्लॅटमध्ये राहत आहात. हे घर खरेदी करायचं असल्यास तुम्हाला ४५ हजार रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अंदाजित EMI मधून भाडे वजा केल्यास दरमहा २५ हजारांची बचत होईल. ही बचत तुम्ही दरमहा SIP मध्ये गुंतवल्यास या गुंतवणुकीवर सरासरी १२ टक्के वार्षिक परतावा मिळू शकतो. त्यामध्ये चक्रवाढ व्याजाचा नियम लागू केल्यास, २० वर्षांत तुमच्याकडे १ कोटींहून अधिक रक्कम जमा झालेली असेल.