संदीप कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताचा सलामीवीर शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. गेल्या काही काळात क्रिकेटच्या सर्व प्रकारांत त्याने आपली छाप पाडली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी तो निर्णायक खेळाडू म्हणून समोर आला आहे. त्याच्याकडे भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहिले जाते आहे. गिलचे योगदान का महत्त्वाचे ठरते आहे आणि त्याचा संघाला कसा फायदा झाला आहे, याचा आढावा.

ट्वेन्टी-२० मधील शतकामुळे गिलने कोणते विक्रम रचले?

न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यातील नाबाद १२६ धावांच्या खेळीत गिलने अनेक विक्रम आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यातील भारतीय फलंदाजाची ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या (नाबाद १२२) नावे होता. तसेच गिलच्या नाबाद १२६ धावा ही आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही फलंदाजांनी केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी २०१२मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या रिचर्ड लेवीने नाबाद ११७ धावांची खेळी केली होती. गिल हा भारतासाठी ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वांत युवा (२३ वर्षे आणि १४६ दिवस) खेळाडू ठरला आहे. त्याने सुरेश रैनाचा (२३ वर्षे व १५६ दिवस) विक्रम मोडित काढला.

गेल्या काही काळात गिलची तिन्ही प्रकारांतील कामगिरी कशी राहिली?

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात गिलने १४९ चेंडूंत २०८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय लढतीत त्याने ७८ चेंडूंत ११२ धावा केल्या. त्यापूर्वी, श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात ९७ चेंडूंत ११६ धावांची खेळी केली. आता ट्वेन्टी-२० सामन्यातही त्याने शतक झळकावत संघासाठी आपले महत्त्व सिद्ध केले आहे. डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातही त्याने १५२ चेंडूंत ११० धावा केल्या होत्या. त्यापूर्वी, ऑगस्टमध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ९७ चेंडूंत १३० धावांची खेळी केली. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक झळकावणारा गिल हा भारताचा पाचवा आणि जगातील २१वा फलंदाज आहे. तसेच तिन्ही प्रकारांत शतकी खेळी करणारा तो जगातील दुसरा सर्वांत युवा फलंदाज आहे. गिलपूर्वी पाकिस्तानच्या मोहम्मद शेहजादने २२ वर्ष आणि १२७ दिवस वय असताना ही कामगिरी केली होती.

विश्लेषण: भारतीय हॉकीसाठी परदेशी प्रशिक्षकांचा शोध कधी संपणार? ग्रॅहॅम रीड यांचा राजीनामा की बळीचा बकरा?

गिलने आपल्या कारकीर्दीची सुरुवात कशी केली?

पंजाबच्या गिलने आंतर-जिल्हा स्पर्धांपासून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्याने २०१४मध्ये १६ वर्षांखालील स्पर्धेत पंजाबकडून खेळताना ३५१ धावा केल्या. यानंतर १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक स्पर्धेत त्याने द्विशतकी खेळी केली. २०१६-१७ मध्ये विजय हजारे करंडक स्पर्धेतून देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर पुढील हंगामात त्याला रणजी करंडकात खेळण्याची संधी मिळाली. प्रथम श्रेणीतील आपल्या दुसऱ्याच सामन्यात (सर्व्हिसेसविरुद्ध) गिलने शतक झळकावले. गिलला २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये ‘बीसीसीआय’च्या सर्वोत्तम कनिष्ठ खेळाडूच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले. त्यामुळे त्याची भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली. युवा संघाकडून खेळताना इंग्लंडविरुद्ध चार एकदिवसीय डावांत त्याने ३५१ धावा केल्या. यानंतर इंग्लंड दौऱ्यात त्याने चार डावांत २७८ धावा फटकावल्या. १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने जेतेपद मिळवले. त्या संघात शुभमन गिलने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. २०१८-१९च्या देशांतर्गत हंगामात चमकदार कामगिरीच्या बळावर त्याला भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक कसोटी दौऱ्यातही गिलचा समावेश होता.

कसोटी संघातील स्थानासाठी गिलला कोणाचे आव्हान?

गिलने कसोटीत चांगली कामगिरी केली असली तरीही, त्याला संघातील आपले स्थान भक्कम करण्यासाठी झगडावे लागते आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी गिलला संघात स्थान मिळाले आहे. मात्र, केएल राहुलचे पुनरागमन झाल्याने सलामीच्या स्थानासाठी चुरस निर्माण झाली आहे. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने पहिल्या कसोटीला मुकणार आहे. या स्थानासाठी गिलचा विचार केला जाऊ शकेल. मात्र, त्याला सूर्यकुमार यादवचे आव्हान आहे. गिलने आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली. त्याने आतापर्यंत १३ कसोटी सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले असून ७३६ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला अंतिम ११मध्ये संधी मिळाल्यास ती त्याच्या कारकीर्दीसाठी निर्णायक ठरू शकेल.