लॉरेन्स बिष्णोई हे नाव अचानक देशभरातल्या लोकांना माहिती होऊ लागलं आहे. राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू लागलं आहे. हे नाव अचानक चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई आणि त्याची गँग आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्या प्रकरणाचा तपास आत्ता कुठे सुरू झाला नाही तोच बॉलिवुड अभिनेता सलमान खान याला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात देखील संशयाची सुई थेट लॉरेन्स बिष्णोईच्याच दिशेनं वळली आहे. अर्थात, बिष्णोईनं हा आरोप फेटाळला असला, तरी त्या दिशेनं पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पण नेमका हा लॉरेन्स बिष्णोई आहे तरी कोण? जवळपास ७०० सदस्य असलेली ही बिष्णोई गँग कशी अस्तित्वात आली? काय आहे यांचा इतिहास?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७०० सदस्यांची बिष्णोई गँग?

लॉरेन्स बिष्णोईची तबब्ल ७०० सदस्यांची बिष्णोई गँग असल्याचं सांगितलं जातं. दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान अशा पाच राज्यांमध्ये झालेल्या अनेक हत्या ाणि खंडणीच्या प्रकरणांमध्ये या बिष्णोई गँगचं नाव गुंतलं आहे. याची सुरुवात करणारा यांचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोई हा पंजाबच्या फझिलका जिल्ह्यातल्या अबोहर भागातील दुतारनवली गावाचा आहे. गेल्या वर्षीपासून लॉरेन्स बिष्णोई हा दिल्लीच्या तिहार जेलमध्ये एका गुन्ह्याची शिक्षा भोगतोय. पण असं असलं, तरी लॉरेन्स बिष्णोईच्या कारवाया मात्र सुरूच आहेत. अगदी परदेशात देखील त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

विकी मिद्दूखेराच्या हत्येचा बदला?

दिल्ली पोलिसातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिष्णोईनं सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. अकाली दलचा तरुण नेता विकी मिद्दुखेराची मोहालीत गेल्या वर्षी हत्या झाल्याचा सूड म्हणून सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचा दावा लॉरेन्स बिष्णोईनं केला आहे. यासंदर्भात मुसेवालाचा फरार मॅनेजर शगन प्रीत सिंग याच्याविरोधात पंजाब पोलिसांनी लुकआऊट नोटीस देखील जारी केली आहे. लॉरेन्स बिष्णोईच्या गुन्हेगारी नोंदींवरून त्याच्या प्रवासाचा अंदाज लागू शकतो. द प्रिंटनं त्याच्या गुन्हेविषयक दस्तऐवजांचा दाखला देत त्याच्या अनेक गुन्ह्यांचा उल्लेख केला आहे.

हा लॉरेन्स बिष्णोई आहे तरी कोण?

लॉरेन्स बिष्णोईनं त्याचं शालेय शिक्षण अबोहारमधल्या एका नावाजलेल्या शाळेत पूर्ण केलं. दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी तो चंदीगडला गेला. ११वी-१२वीमध्ये असताना त्याचा अॅथलेटिक्समध्ये रस वाढला. विशेषत: दीड हजार मीटर शर्यतीमध्ये. महाविद्यालयीन शिक्षणासाठी लॉरेन्स बिष्णोईनं पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला आणि त्याचा गुन्हेगारीशी परिचय सुरू झाला.

विश्लेषण : ६० वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळानंतर पहिल्यांदाच चीनची लोकसंख्या घटणार?

महाविद्यालयाल लॉरेन्स बिष्णोई विद्यार्थी राजकारणात सक्रीय झाला. तेव्हाच तो काही छोट्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात देखील जाऊन आला होता. महाविद्यालयातच त्याची ओळख संपत नेहराशी झाली. हाच नेहरा सध्या सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी आहे. चंदीगडच्या खालसा कॉलेजचा विद्यार्थी म्हणून नेहरा पंजाब विद्यापीठातील मैदानात वारंवार येत असे. इथेच त्याची या प्रकरणातील तिसरा आरोपी काला राणाशी ओळख झाली. तेव्हापासून या तिघांमध्ये चांगलीच मैत्री जमली.

पंजाब विद्यापीठात असताना २०११ ते २०१२ या काळात लॉरेन्स बिष्णोई तिथल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष देखील झाला. याच काळात त्याचा दुसरा एक साथीदार ब्रारशी त्याची ओळख झाली. लॉरेन्स बिष्णोईला राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगढ या पट्ट्यामध्ये चालणाऱ्या गुन्हेगारी विश्वावर राज्य करायचं होतं. खरंतर २००८मध्येच लॉरेन्स बिष्णोईनं पंजाब विद्यापीठात विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत ब्रारचा विरोधी असलेल्या एका विद्यार्थ्यावर गोळी झाडली होती. तेव्हा तो दोन महिने तुरुंगातही राहिला होता.

विश्लेषण : नुपूर शर्मा वाद अन् आखाती देश… भारतासाठी हे देश एवढे ‘मौल्यवान’ का?

तुरुंगात गुन्हेगारी जगताशी जवळून परिचय

२०१० पासूनच लॉरेन्स बिष्णोईच्या तुरुंगातल्या वाऱ्या अधूनमधून सुरू झाल्या होत्या. या काळात त्याची गुन्हेगारी जगताशी जवळून ओळख झाली. त्याच्या तुरुंगातल्या वास्तव्यात त्याची ओळख हत्यारांची तस्करी करणाऱ्या रणजीत दुपलाशी झाली. आता हा दुपला अमेरिकेत स्थायिक झाला असून तिथून नेटवर्क चालवतो, असं म्हटलं जातं. २०१२मध्ये पंजाब विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर देखील लॉरेन्स बिष्णोईचं तिथल्या विद्यार्थी राजकारणावर वर्चस्व होतं. त्याच्याच टोळीतल्या विद्यार्थ्याची तिथे निवड होईल, यासाठी लॉरेन्स बिष्णोई प्रयत्नशील असायचा.

सलमान खानला धमकी

२०१४मध्ये लॉरेन्स बिष्णोईनं गोल्डी ब्रार आणि आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत मिळून त्याच्या चुलत भावाच्या मित्रासाठी लुधियाना महानगर पालिकेतील त्याच्या विरोधकाची हत्या केली. यानंतर त्याचं नाव अनेक गुन्ह्यांमध्ये येऊ लागलं होतं. २०१८मध्ये लॉरेन्स बिष्णोई आणि संपत नेहरा या दोघांनी मिळून अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानविरोधात तेव्हा १९९८ साली राजस्थानमधील काकानी भागात काळवीटाची शिकार केल्याचा खटला सुरू होता.

२०२१मध्ये लॉरेन्स बिष्णोईला मोक्का संदर्भातील एका खटल्यामुळे दिल्लीला आणण्यात आलं आणि तिहार जेलमध्ये टाकण्यात आलं. तेव्हापासून तो तिहारच्या तुरुंगातच आहे. मात्र, तिथूनही त्याचे बाहेरच्या जगाशी संपर्क सुरूच असल्याचं सांगितलं जातं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddhu moosewala murder accused lawrence bishnoi criminal history pmw