युरोपियन स्पेस एजन्सी आणि जपानद्वारे संचालित अंतराळयानाने बुध ग्रहाचे दुर्मीळ छायाचित्र टिपले आहे. सूर्योदयाच्या वेळी ग्रहाच्या दक्षिण ध्रुवाचे कृष्णधवल (ब्लॅक अॅण्ड व्हाईट)छायाचित्र पहिल्यांदाच शास्त्रज्ञांच्या हाती लागले आहे. बेपीकोलंबो या अंतराळयानामुळे हे शक्य झाले आहे. या यानाने पाठविलेल्या छायाचित्रात ग्रहावरील अनेक खड्डेही दिसून येत आहेत, ज्यात शिखरांच्या असामान्य वलयांचाही समावेश आहे. या छायाचित्रांचे महत्त्व काय? बेपीकोलंबो मोहीम काय आहे? ही मोहीम जगासाठी इतकी महत्त्वाची का मानली जात आहे? त्याबाबत जाणून घेऊ.
छायाचित्रांवर शास्त्रज्ञांचे मत
इंग्लंडमधील ओपन युनिव्हर्सिटीमधील ज्वालामुखी शास्त्रज्ञ डेव्हिड रॉथरी हे बुध ग्रहाला ‘लॉर्ड ऑफ द पीक रिंग्ज’ असे संबोधतात. बेपीकोलंबोच्या विज्ञान संघाचे सदस्य असलेल्या रॉथरी यांनी सांगितले की, नवीनतम छायाचित्रे समाधानकारक होती. “मला जे पाहण्याची अपेक्षा होती, तेच यात दिसले; परंतु या छायाचित्रांची अधिक तपशील दर्शविणारी गुणवत्ता माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगली होती,”असे ते म्हणाले. युरोपियन स्पेस एजन्सीमधील बेपीकोलंबोचे प्रकल्प शास्त्रज्ञ जोहान्स बेनखॉफ यांनी एका ईमेलमध्ये लिहिलेय की, नवीन छायाचित्र पाहून, त्यांना अतिशय आनंद झाला. ते पुढे म्हणाले, “जेव्हा तुम्हाला कळते की सर्व काही नियोजित केल्याप्रमाणे घडत आहे तेव्हा खूप दिलासा मिळतो.”
हेही वाचा : उंच लोकांना होऊ शकतो तब्बल आठ प्रकारचा कॅन्सर, इतरांच्या तुलनेत धोकाही सर्वाधिक; कारण काय?
बेपीकोलंबो ही युरोपियन आणि जपानी अंतराळ एजन्सी यांच्यातील एक संयुक्त मोहीम आहे. बेपीकोलंबोला २०१८ साली प्रक्षेपित करण्यात आले. हे यान २०२६ च्या अखेरीस बुध ग्रहाच्या कक्षेत जाणार असल्याची माहिती आहे. या अंतराळयानाला थ्रस्टरच्या आणि इतर काही समस्यांमुळे नियोजित वेळेपेक्षा विलंब झाला आहे.
बेपीकोलंबो मोहीम महत्त्वपूर्ण का आहे?
बुध हा सूर्यमालेतील सर्वांत कमी अभ्यासलेला खडकाळ ग्रह आहे. या ग्रहाला अभ्यासण्यासाठी केवळ दोन ऑर्बिटर आहेत. एक ऑर्बिटर बुधाच्या लॅण्डस्केपवर केंद्रित आहे आणि दुसरा त्याच्या सभोवतालच्या अवकाशातील वातावरणाचा डेटा गोळा करतो. शास्त्रज्ञांना बेपीकोलंबो मोहिमेद्वारे बुध ग्रहाची रचना, भूविज्ञान व चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करून ग्रहाची उत्पत्ती आणि उत्क्रांती यांविषयी माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. बुध ग्रहापर्यंत पोहोचणे कठीण आहे. कारण- सूर्याकडे उड्डाण केल्याने अंतराळयानाचा वेग वाढतो. या अंतराळयानाने चार फ्लायबाय म्हणजेच चार उड्डाणे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. अजून दोन फ्लायबाय शिल्लक आहेत. त्यानंतर अंतराळयान बुध ग्रहाच्या कक्षेत पोहोचेल, अशी माहिती आहे.
शास्त्रज्ञ बुध ग्रहाच्या रिंग बेसिन्स म्हणजेच खोऱ्यांविषयीची माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहेत. त्यांची रचना ग्रहाच्या प्राचीन ज्वालामुखीशी कशी जोडली जाऊ शकते, तो ज्वालामुखी आजही किरकोळ स्वरूपात सक्रिय आहे का, हे जाणून घेण्यावर त्यांचा भर आहे. बेपीकोलंबोवरील तीन मॉनिटरिंग कॅमेऱ्यांनी या ग्रहाची छायाचित्रे टिपली आहेत. या मोहिमेतून अजूनही बरेच काही मिळणे शिल्लक आहे. या यानावर खूप शक्तिशाली स्वरूपाची वैज्ञानिक उपकरणे बसवलेली आहेत; ज्यात उच्च रेझोल्युशनच्या रंगीत कॅमेऱ्यांचाही समावेश आहे. जोपर्यंत अंतराळयान बुध ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करीत नाही, तोपर्यंत या उपकरणांचा वापर केला जाणार नाही. नासाच्या ‘मेसेंजर स्पेसक्राफ्ट’पेक्षा बेपीकोलंबो यान दक्षिण धृवाचा चांगला डेटा गोळा करील, अशी अपेक्षा आहे. नासाचे ‘मेसेंजर स्पेसक्राफ्ट’ ११ वर्षांच्या मोहिमेनंतर २०१५ मध्ये नष्ट झाले होते.
बुध ग्रहाचे रहस्य
बुध हा रहस्यांनी भरलेला ग्रह आहे. त्याच्या सभोवतालच्या खडकाळ कवचाच्या तुलनेत त्याचा एक गाभा रहस्यमयरीत्या मोठ्या आकाराचा आहे. सूर्यापासून संरक्षणासाठीचे वातावरण बुध ग्रहावर नसतानाही त्याच्या पृष्ठभागावर पाण्याचा बर्फ अस्तित्वात आहे. ग्रहावर अनपेक्षित चुंबकीय क्षेत्र आहे आणि त्या भागात क्लोरिन, सल्फर व पोटॅशियम यांसारखे घटक आहेत. उच्च तापमान असलेल्या ग्रहांवर अशा घटकांचे सहजपणे बाष्पीभवन होऊ शकते; मात्र बुध ग्रहावर तसे झालेले नाही. यातून हे सूचित होते की, बुध एकेकाळी सूर्यमालेत आज आहे त्यापेक्षा जास्त दूर तयार झाला होता, अशी माहिती रॉथरी यांनी दिली.
हेही वाचा : हवामान बदलामुळे गाड्यांची विक्री मंदावली?
डिसेंबर व जानेवारीतील बेपीकोलंबोच्या नियोजित उर्वरित फ्लायबायनंतर हे अंतराळयान २०२६ च्या अखेरीस बुधाच्या कक्षेत प्रवेश करील. त्यापूर्वी हे यान सूर्याभोवती फिरण्यात सुमारे दोन वर्षे घालवेल. पहिल्यांदा १९९३ मध्ये ही मोहीम प्रस्तावित करण्यात आली होती, जी २०१४ मध्ये लाँच केली जाणार होती. परंतु, काही तांत्रिक बाबींमुळे ही मोहीम चार वर्षांनी पुढे ढकलण्यात आली. अंतराळयानाच्या थ्रस्टरमध्ये अडचणी आल्यामुळे बुधाची कक्षा सुरू होण्यापूर्वी शास्त्रज्ञांना अतिरिक्त ११ महिन्यांच्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. हा विलंब निराशाजनक असला तरी रॉथरी यांना आनंद आहे की, या मोहिमेतील संघाने संयम बाळगला आहे.