बांधकाम, खाणकाम, दंतचिकित्सा आणि इतर उद्योगांमधील व्यक्ती सिलिका या पदार्थाच्या दैनंदिन संपर्कात येतात. सिलिकावर मर्यादा आणल्यास जगभरातील सुमारे १३ हजार लोकांचा जीव वाचू शकतो, असे नवीन संशोधनातून समोर आले आहे. ब्रिटनमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, वारंवार कामगार सिलिका या पदार्थाच्या संपर्कात आल्यास त्यांना ‘सिलिकोसिस’ हा फुफ्फुसाचा घातक आजार होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. संशोधकांनी या आजाराविषयी सतर्क केले. “आमच्या संशोधनात सिलिकाचे प्रमाण ०.१ मायक्रोग्रामवरून कमीत कमी ०.५ मायक्रोग्राम करण्यास सांगण्यात आले आहे,” असे लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील अभ्यास लेखक पॅट्रिक होलेट यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा अभ्यास ब्रिटीश मेडिकल जर्नल थोरॅक्समध्ये ८ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रकाशित झाला. सिलिकोसिसच्या जोखमींवर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे. विशेषत: विकसनशील देशांमध्ये सिलिकोसिसबद्दलची जागरूकता आणि तेथील परिस्थितीचा अभ्यास आवश्यक असल्याचेही यात सांगण्यात आले. हा प्राणघातक आजार नक्की काय आहे? याची लागण नक्की कशी होते? अभ्यासात याविषयी आणखी काय सांगण्यात आले आहे? याविषयी जाणून घेऊ.

वारंवार कामगार सिलिका या पदार्थाच्या संपर्कात आल्यास त्यांना ‘सिलिकोसिस’ हा फुफ्फुसाचा घातक आजार होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : आंदोलक विद्यार्थी ते माजी नौदल कमांडो; बांगलादेशच्या अंतरिम सरकारमध्ये कोणाकोणाचा समावेश?

सिलिकोसिस म्हणजे नक्की काय?

सिलिकोसिस हा एक श्वसन रोग आहे; ज्यामुळे फुफ्फुस कडक होत जातात. हा आजार धुळीतील सिलिकाच्या कणामुळे किंवा सिलिकाच्या धुळीमुळे होतो. सिलिका हा पदार्थ माती, वाळू, काँक्रीट, मोर्टार, ग्रॅनाइट आणि कृत्रिम दगडांमध्ये आढळतो. बांधकाम, खाणकाम, तेल आणि वायूचे उत्खनन, दंतचिकित्सा, मातीची भांडी आणि शिल्पकाम आदी कामांमध्ये सिलिका आढळून येतो. या क्षेत्रात कार्यरत असणारे लोक दररोज सिलिकाच्या संपर्कात येतात आणि परिणामी त्यांना सिलिकोसिस होण्याचा धोका जास्त असतो. भारतातील लहान खाण समुदायांमध्ये या आजाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, असे संशोधकांनी सांगितले. सिलिकोसिस हा वाढत जाणारा आजार आहे आणि त्यावर कोणताही उपाय नाही.

याची लागण कशाप्रकारे होते?

जेव्हा जेव्हा खडक किंवा बांधकामासाठी आवश्यक सामग्री कापली जाते किंवा ड्रिल केली जाते, तेव्हा त्या हवेत अतिशय बारीक सिलिकाचे कण असतात. कामगार काम करत असताना त्यांच्या श्वासाद्वारे ते कण शरीराच्या आत जातात. सिलिकोसिस विकसित होण्यास बराच वेळ लागू शकतो. सामान्यत: १० ते २० वर्षांनंतर सिलिकोसिस शरीरात विकसित होत असल्याचे निदान होते.

“जगभरात लाखो लोकांना सिलिकोसिस आहे, असा अंदाज आहे. परंतु, याचा डेटा फारच कमी आहे. ब्रिटन आणि युरोपमध्ये दरवर्षी याची शेकडो प्रकरणे नोंदवली जातात, ” असे पॅट्रिक होलेट यांनी एका मुलाखतीत ‘डीडब्ल्यू’ला सांगितले. सिलिकोसिसमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगासह इतर गंभीर आजार होऊ शकतात. परंतु, हे नक्की कसे होते याची शास्त्रज्ञांना खात्री नाही. काही तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, सिलिकाचे कण फुफ्फुसात साठतात आणि त्यामुळे सतत जळजळ होते.

जगभरात लाखो लोकांना सिलिकोसिस आहे, असा अंदाज आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

अभ्यासात नक्की काय?

या नवीन अभ्यासात सिलिकोसिसच्या जोखमीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. अभ्यासामधील ६५,९७७ सहभागींमध्ये ८,७९२ लोकांमध्ये सिलिकोसिस असल्याचे आढळले. या अभ्यासात फुफ्फुसांचे निरीक्षण, शवविच्छेदन तपासणीचे अहवाल आणि मृत्यू प्रमाणपत्रे यांचाही समावेश होता. “४० वर्षे अशा क्षेत्रात काम करणार्‍या नागरिकांना घेऊन आम्ही यावर संशोधन केले. बऱ्याच अभ्यासांमध्ये खाण कामगारांचा समावेश होता आणि फक्त दोन अभ्यासांमध्ये खाण कामगार नव्हते,” असे होलेट म्हणाले. संशोधकांना असे आढळून आले की, खाणकामातील ४० वर्षांच्या कार्यकाळातील सरासरी प्रमाण ०.१ मायक्रोग्रामवरून ०.०५ मायक्रोग्रामपर्यंत निम्म्यावर आणल्यास, सिलिकोसिसच्या प्रकरणांमध्ये ७७ टक्के घट होईल. याविषयी अधिक डेटा आवश्यक असल्याचे आणि सविस्तर अभ्यासाची गरज असल्याचेही होलेट यांनी सांगितले.

सिलिकाचे प्रमाण कमी करणे शक्य आहे का?

ब्रिटनमध्ये सिलिकाची व्यावसायिक मर्यादा ०.१ मायक्रोग्राम आहे. फ्रान्स, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडसह बहुतेक युरोपियन देशांमध्येही सिलिकाची व्यावसायिक मर्यादा ०.१ मायक्रोग्राम इतकीच आहे. इतर देशांमध्ये, जसे की चीनमध्ये याची मर्यादा सुमारे एक मायक्रोग्रामपर्यंत आहे. परंतु, अमेरिकेतील मानकांनुसार सिलिकाचे प्रमाण ०.०५ मायक्रोग्राम करणे शक्य आहे. होलेट म्हणाले की, कामाच्या ठिकाणी सिलिकाचे प्रमाण कमी करणे शक्य आहे. त्यांनी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे उदाहरण दिले. या देशांमध्ये असे सुरक्षित उपाय प्रभावी ठरले आहेत.

हेही वाचा : ‘या’ देशात ९ वर्षांच्या मुलीशी लग्न करण्यास परवानगी? प्रस्तावित कायदा काय आहे? बालविवाहास कोणकोणत्या देशात मान्यता?

ऑस्ट्रेलियाने हा पदार्थ मोठ्या प्रमाणात असणार्‍या दगडाच्या वापरावर बंदी घातली आहे. कारण ते कापताना किंवा ड्रिल केल्यावर मोठ्या प्रमाणात हवेल सिलिकाचे कण पसरतात. “अशी सामग्री कापताना किंवा ड्रिल करताना कमी धूळ व्हावी यासाठी पाण्याचा उपयोग होणार्‍या फोम्स आणि मिस्ट्स या पद्धतींचा वापर, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वापरणे यासह इतरही काही उपाययोजना आहेत,” असे होलेट यांनी सांगितले. त्यांनी हेदेखील सांगितले की, सिलिकोसिसची समस्या विकसनशील देशांमध्ये अधिक वाईट होण्याची शक्यता आहे. कारण या देशांमध्ये सिलिका नियंत्रित करण्यासाठी कोणतेही सुरक्षा उपाय नाहीत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silica dust health risk in construction and mining workers rac