कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठी सोन्याची चोरी करणारा आरोपी भारतात आहे. शुक्रवारी सकाळी (२१ फेब्रुवारी), चंदीगडच्या बाहेर असणाऱ्या त्याच्या एका निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाने छापा टाकला. हा छापा सामान्य नव्हता, कारण त्याचा थेट संबंध कॅनडाशी आहे, म्हणजेच कॅनडातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीशी आहे. २० दशलक्ष डॉलर्स (१२२ कोटी) सोन्याच्या चोरीतील कथित भूमिकेसाठी कॅनडाच्या अधिकाऱ्यांना हवा असलेल्या ३२ वर्षीय सिमरन प्रीत पनेसरच्या घरी अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. खरं तर, इंडियन एक्स्प्रेस, सीबीसी न्यूज: द फिफ्थ इस्टेटसह अनेकांनी तो चंदीगडच्या बाहेरील भागात कॅनडाच्या अधिकाऱ्यांना चुकवून राहत असल्याचे वृत्त दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सिमरन प्रीत पनेसर नेमका कोण आहे? कॅनडातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीशी त्याचा संबंध कसा? याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनेसर याच्या निवासस्थानावर ईडीचा छापा

शुक्रवारी सकाळी ईडीचे अधिकारी पनेसर याच्या मोहालीच्या सेक्टर ७९ येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्याच्या चौकशीस सुरुवात केली. याविषयीची माहिती देताना ईडीच्या एका अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “आमची टीम सिमरन पनेसरच्या निवासस्थानी पोहोचली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.” ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) च्या सेक्टर २ (१) (रा) चा वापर करून पनेसर विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने ही कारवाई झाली आहे. हा कायदा सीमापार प्रकरणांशी संबंधित आहे. या कायद्यात नमूद करण्यात आले आहे की, भारताबाहेरील एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने केलेले कोणतेही वर्तन जे त्या ठिकाणी गुन्हा ठरवते, तसेच जे अनुसूचीच्या भाग अ, भाग ब किंवा भाग कमध्ये निर्दिष्ट गुन्हा आणि जो भारतात केला आहे, अशावेळी ही कारवाई केली जाते. ‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडातील चोरीच्या वेळी चोरले गेलेले सोने किंवा त्यातून मिळालेले पैसे देशात आले की नाही हे तपासणे हा या छाप्यांचा उद्देश असतो.

शुक्रवारी सकाळी ईडीचे अधिकारी पनेसर याच्या मोहालीच्या सेक्टर ७९ येथील निवासस्थानी पोहोचले आणि चौकशीस सुरुवात केली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पनेसर भारतात जगत आहे शांत जीवन

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या तपासात त्याचे ठिकाण उघड झाल्यानंतर काही दिवसांनी ही धाड टाकण्यात आली आहे. पनेसर मोहालीमध्ये त्याच्या कुटुंबासह भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी प्रीती पानेसर आहे, जी माजी मिस इंडिया युगांडा, एक गायक आणि एक अभिनेत्री होती. वृत्तपत्राच्या तपासणीत आढळले की, पनेसर सामान्य जीवन जगत आहे, त्याच्या पत्नीच्या आणि कुटुंबाच्या व्यवसायात मदत करत आहे. पानेसरच्या शेजाऱ्यांपैकी एकाने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, त्यांना कळाले आहे की ३२ वर्षीय तरुण कॅनडामध्ये काही आर्थिक वादात गुंतला होता, परंतु त्यांना सांगण्यात आले की तो वाद आता संपला आहे.

पनेसर आणि कॅनडातील सर्वात मोठ्या चोरीचा संबंध

१७ एप्रिल २०२३ रोजी टोरंटो पिअर्सन विमानतळावर झालेल्या सोन्याच्या चोरीनंतर पनेसर पहिल्यांदा चर्चेत आला होता. ही चोरी तब्बल १२० कोटींची होती. प्रसारमाध्यमांनी याला कॅनडातील सर्वात मोठी सोन्याची चोरी म्हणून संबोधले. तपासात असे दिसून आले की, ४०० किलोग्राम वजनाच्या ९९९९ शुद्ध सोन्याच्या ६,६०० विटा आणि २.५ दशलक्ष डॉलर्स किमतीचे विदेशी चलन स्वित्झर्लंड टोरंटोमधील झुरिच येथून एअर कॅनडाच्या फ्लाइटने पियरसन विमानतळावर आले होते आणि ते कॅनडातील सर्वात मोठ्या शहरातील बँकेसाठी नेण्यात येत होते. परंतु, विमान लँड केल्यानंतर मालवाहू एका पांढऱ्या बॉक्सच्या ट्रकवर उतरवले गेले आणि साइटवर सोडले गेले, मात्र दुसऱ्या दिवशी ते बेपत्ता झाल्याची नोंद केली गेली.

१७ एप्रिल २०२३ रोजी टोरंटो पिअर्सन विमानतळावर झालेल्या सोन्याच्या चोरीनंतर पनेसर पहिल्यांदा चर्चेत आला होता. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

काही दिवसांनंतर, पील पोलिसांनी सिमरन प्रीत पनेसरसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनेसर हा चोरीच्या वेळी ब्रॅम्प्टनचा रहिवासी होता, जो एअर कॅनडाचा कर्मचारी होता. तपास सुरू असताना पोलिसांना आढळले की, पनेसर हा एकमेव असा होता, ज्याला या मालवाहतुकीच्या शिपमेंट्समध्ये आवश्यक प्रवेश होता. तसेच पानेसरने सोने असलेल्या येणाऱ्या फ्लाइटची यंत्रणा शोधली आणि त्याच्या हालचालीचा मागोवा घेतल्याचे तपासात आढळून आले. एकदा विमान उतरल्यानंतर अधिकारी म्हणतात की त्याने सोने असलेल्या कंटेनरचा मागोवा घेण्यास सुरुवात केली.

“त्याने एअर कॅनडा कार्गो सिस्टीममध्ये फेरफार केली. एकदा चोरी पूर्ण झाल्यानंतर त्याने पूर्णपणे शोध घेणे थांबवले, असेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांना पनेसरवर आणखी संशय निर्माण झाला, तो म्हणजे गुन्ह्याच्या काही महिन्यांतच त्याने एअर कॅनडामधील नोकरी सोडली आणि तो गायब झाला. परंतु, जून २०२४ मध्ये पील प्रादेशिक पोलिसांनी जाहीर केले की पानेसरने आत्मसमर्पण करण्यास सहमती दर्शविली आहे. त्या वेळी पानेसरचे वकील ग्रेग लॅफॉन्टेन यांनी ‘सीबीसी’ला सांगितले की, “त्यांचा क्लायंट कॅनडाच्या न्याय व्यवस्थेवर खूप विश्वास ठेवतो. जेव्हा हा खटला संपेल, तेव्हा तो या चुकीच्या कृत्यातून मुक्त झाला असेल,” असे ते म्हणाले. पनेसर कुठे आहे हे न सांगता लॅफॉन्टेन पुढे म्हणाले की, पानेसर कॅनडाला परतण्याच्या तयारीत परदेशातील त्याचे व्यवहार व्यवस्थित करत आहे.

सोन्याच्या चोरीतील इतर साथीदार

कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले की, पनेसर हा नऊ व्यक्तींच्या योजनेचाच भाग होता, ज्यामध्ये एअर कॅनडाचा आणखी एक कर्मचारी परमपाल सिद्धू याचा समावेश होता. पील प्रादेशिक पोलिसांचा असा विश्वास आहे की, दोघांनी एकत्र काम केले आणि चोरीला मदत केली. चोरीनंतर सिद्धूला अटक करण्यात आली होती आणि चोरीचा आरोप करण्यात आला होता. सोन्यासह पळून गेलेल्या ट्रकचा ड्रायव्हरही कॅनडाचा नागरिक होता, ज्याचे नाव ड्युरांटे किंग-मॅकलीन आहे. त्याला बेकायदापणे सीमा ओलांडल्यानंतर अमेरिकेत अटक करण्यात आली. तो आता तुरुंगात आहे.

आणखी एक संशयित असणारा अर्चित ग्रोव्हर याला मे २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला असता, त्याला अटक करण्यात आली होती. ग्रोव्हर हा चोरीत वापरल्या गेलेल्या ट्रकिंग कंपनीचा मालक असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे. तसेच तो परमपालचा मित्र होता. गुन्ह्यात सामील असलेल्यांमध्ये अमित जलोटा, अम्माद चौधरी, प्रशथ परमलिंगम, अर्सलान चौधरी आणि अली रझा यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. चौधरी वगळता या सर्वांना अटक करण्यात आली आहे. ‘सीबीसी’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे की, चौधरी दुबईत लपून बसला आहे. गुन्ह्याच्या जवळपास दोन वर्षांनंतर, तपासकर्त्यांना चोरीचे असलेले फक्त एक किलोग्रॅम सोने सापडले असल्याचा अंदाज आहे.