शाहरुख खान आणि करीना कपूरच्या ‘रॉ वन’ मधील ‘छम्मक छल्लो’ या गाण्यामुळे चर्चेत आलेला गायक आणि रॅपर एकॉन सध्या आफ्रिकेत स्वतःचे स्वतंत्र शहर बनवत आहे. मध्यंतरी त्याने सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट देखील केली आहे, ज्यामध्ये त्यांच्या शहराचा करार सेनेगल सरकारने निश्चित केलेला होता. सध्या काही अडचणी येत असल्या तरी एकॉनच्या या शहराच्या बाबतीत बरीच प्रगती झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे.
तब्बल ४ वर्षांपूर्वी एकॉनने या स्वप्नवत शहराचा निर्माण करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. ब्लॅक पॅंथर या चित्रपटातील वाकांडा प्रमाणे एकॉनला एक तंत्रज्ञानाने समृद्ध असं शहर आफ्रिकेत उभं करायची इच्छा त्याने तेव्हाच व्यक्त केली होती. २०१८ मध्ये केलेल्या या घोषणेनंतर या प्रकल्पात फारशी गती नसल्याचं दिसून आलं आहे. कोविडमुळे या शहराच्या निर्माणात बराच खंड पडला असल्याचं एकॉनने स्पष्ट केलं आहे. शिवाय लवकरात लवकर हे शहर उभं करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची ग्वाहीदेखील त्याने दिली आहे.
आणखी वाचा : जेम्स बॉन्डसह हॉलिवूडमध्ये झळकणार होती ऐश्वर्या राय पण… अभिनेत्रीच्या आधीच्या सेक्रेटरीचा खुलासा
सेनेगलची राजधानी दकारपासून निव्वळ १०० किलोमीटरवर या शहराचा निर्माण सुरू आहे. त्यासाठी देशातील सरकारने एकॉनला २००० एकर जमीन भेट म्हणून दिली आहे. या संपूर्ण प्रोजेक्टसाठी ६ बिलियन डॉलर्स इतका खर्च येणार असून त्यापैकी १/३ पैसा एकॉनने जमा केला आहे. शहराच्या अधिकृत वेबसाईटच्या अंदाजानुसार हे शहर ६ जिल्ह्यांमध्ये पसरलेलं असेल जिथे वैद्यकीय सुविधा, कचेऱ्या, आलीशान घरं, शॉपिंग मॉल, ईको फ्रेंडली पर्यटन क्षेत्र अशा वेगवेगळ्या सुखसोयी उपभोगायला मिळणार आहेत.
इतकंच नाही एवढं मोठं शहर उभारून या शहराच्या माध्यमातून सेनेगल येथील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारीसुद्धा गायकाने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. एवढंच नाही जगभरात इतर ठिकाणाहून पलायन करायला भाग पडलेले अमेरिकन आफ्रिकन्स आणि इतर पीडितांसाठी एकॉनच्या या भव्य शहराचे दरवाजे कायम उघडे असणार आहेत.
आणखी वाचा : शाहरुखचा ‘पठाण’ घेणार चिन्मय मांडलेकरच्या ‘नथुराम’शी टक्कर; बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार एक वेगळं युद्ध
एकॉनच्या या स्वप्नवत शहराचं आणखी एक आकर्षण म्हणजे इथे वापरलं जाणारं चलन, अशी चर्चा आहे की या शहरातील नागरिकांसाठी एकॉन स्वतःचं क्रिप्टोकरन्सी सुरू करणार आहे. शिवाय एकॉइन नावाची ही क्रिप्टोकरन्सी मोबाईलच्या अॅप्लिकेशनमधून वापरता येणार आहे. एकॉनच्या या घोषणेला बराच काळ लोटून गेला आहे त्यामुळे या चलनाला कायद्याकडून मान्यता मिळणार की नाही यावर अजूनतरी प्रश्नचिन्ह आहे.
स्वतः एक स्वतंत्र शहर उभं करू पाहणारा एकॉन हा काही एकेमव सेलिब्रिटी नाही. याआधीसुद्धा कित्येक लोकांनी अशी संकल्पना मांडलेली आहे. १९८१ मध्ये आध्यात्मिक गुरु रजनीष म्हणजेच ओशो यांनी अमेरिकेत ओरेगॉनमध्ये रजनिशपुरम नावाचं शहर वसवलं होतं. तब्बल ६४,२२९ एकर एवढ्या परिसरात हे शहर पसरलं आणि जगभरातून ओशो यांचे शिष्य तिथे येत असत. या शहरातील रहिवासी आणि काही नेते हे गुन्हेगारी विश्वात, खुनाच्या खटक्यात अडकल्याचं वृत्त बाहेर आलं आणि नंतर इतरांनीही ते शहर कायमचं सोडलं.