चांद्रयान-३ आणि आदित्य एल-१ या मोहिमा यशस्वी केल्यानंतर भारत आता सागर मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्रोने अंतराळाचा वेध घेतल्यानंतर भारत आता समुद्राचा तळ गाठण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी भारताच्या ‘मत्स्य ६०००’ सबमर्सिबलचे (submersible) फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मत्स्य ६०००’ सबमर्सिबल काय आहे? समुद्राच्या तळाशी जाण्याचा नेमका उद्देश काय? आणि कधीपर्यंत ही मोहीम पार पडणार याबाबत घेतलेला हा आढावा…

‘मत्स्य ६०००’ सबमर्सिबल

‘मत्स्य ६०००’ सबमर्सिबलमध्ये समुद्राच्या खाली तीन माणसांसह सहा हजार मीटरपर्यंत जाण्याची क्षमता आहे. सबमर्सिबलची निर्मिती चेन्नईमधील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेने (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी – NIOT) केली आहे. रिजिजू यांनी ट्विटरवर ट्वीट टाकून याची माहिती दिली. सुरुवातीला ६०० मीटर समुद्राच्या खाली जाऊन याच्या प्रवासाची सुरुवात होईल. सबमर्सिबलमुळे समुद्राच्या परिसंस्थेला कोणताही त्रास होणार नसल्याचेही ते म्हणाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ साली बंगालच्या सागरात ‘मत्स्य ६०००’ची चाचणी घेण्यात येणार आहे. ‘एनआयओटी’चे संचालक जी. ए. रामदास ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाले की, मत्स्य ६००० हे समुद्रयान गोल आकाराचे असून, त्याचा व्यास २.१ मीटर आहे. ८० एमएमच्या जाड थर असलेल्या टायटॅनियम मिश्र धातूपासून ही सबमर्सिबल बनवण्यात आली असून, समुद्राच्या सहा हजार मीटर खोलीवर ६०० पटींनी अधिक दबाव ती सहन करू शकते.

हे वाचा >> ‘टायटॅनिक’चे अवशेष पाहायला गेलेल्या ‘टायटन’ पाणबुडीचा स्फोट झाला? खोल समुद्रात काय घडलं असावं?

‘मत्स्य ६०००’ सलग १२ ते १६ तास काम करू शकते किंवा प्रवास करू शकते आणि त्यामध्ये ९६ तास चालेल इतका ऑक्सिजनचा पुरवठा केलेला आहे. “या सबमर्सिबलची चाचणी घेण्यासाठी सर्व मानक प्रक्रियांचे पालन करण्यात येणार हे आहे. जहाजातून सबमर्सिबल समुद्राच्या तळाशी पाठवणे आणि पाण्याखाली गेल्यानंतर पाण्याच्या वरच्या भागात त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी नेहमी एक जहाज तैनात राहणार आहे”, अशी माहिती रामदास यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच टायटन सबमर्सिबलचा पाण्याखाली अपघात झाला होता. सबमर्सिबलमध्ये उपस्थित असलेल्या पाचही अब्जाधीश प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला होता. मृतांमध्ये टायटन सबमर्सिबलची मालकी असलेल्या ओशनगेटच्या सीईओंचाही समावेश होता. ‘टायटन’ची दुर्घटना घडल्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी ‘मत्स्य’च्या रचनेचा पुन्हा एकदा आढावा घेऊन अशा अपघाताला ‘मत्स्य’ला सामोरे जावे लागणार नाही ना? हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काळजी घेतली.

द हिंदू या दैनिकाशी बोलताना रामदास म्हणाले की, ‘मत्स्य’ची निर्मिती करण्यापूर्वी कार्बन फायबरचा वापर करून तिची बॉडी बनवावी, असा प्रस्ताव आमच्यासमोर होता. मात्र, आम्ही त्याऐवजी टायटॅनियम धातू वापरण्याचा निर्णय घेतला. कार्बन फायबर मजबूत असले तरी ते पाण्याचा दबाव सहन करू शकेल का? याबद्दल शंका होती. समुद्राच्या एवढ्या खाली जाण्यासाठी टायटॅनियमव्यतिरिक्त इतर कोणत्याही धातूचा विचार होऊ शकत नाही. जगभरात जेवढ्या सबमर्सिबल मोहिमा झाल्या आहेत, त्यामध्ये हाच धातू वापरण्यात आल्याचेही ते म्हणाले.

माणसे वाहून नेणाऱ्या सबमर्सिबल फ्रान्स, यूएस, चीन, रशिया व जपान या पाच देशांकडे आहेत. ‘मत्स्य ६०००’च्या माध्यमातून समुद्राच्या तळाशी अनेक संशोधने केली जाणार आहेत. जसे की, समुद्राची जैवविविधता, कमी तापमान असलेले मिथेन समुद्रात कसे झिरपते आणि समुद्राच्या तळाशी असलेल्या धातूंचा शोध ‘मत्स्य’कडून करण्यात येणार आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, ‘मत्स्य ६०००’मुळे सागर पर्यटन आणि सागर साक्षरता वाढण्यास मदत होईल. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ क्लासिफिकेशन अँड सर्टिफिकेशन सोसायटी फॉर मॅन्ड सबमर्सिबल या संस्थेने ‘मत्स्य’चे परीक्षण केले आहे. ६००० मीटर खोलपर्यंत जाण्यासाठी ‘मत्स्य’चे डिझाईन, ऑपरेशन, आपत्कालीन बचाव या बाबींचे परीक्षण केल्यानंतर या संस्थेने प्रमाणपत्र प्रदान केले आहे.

‘मत्स्य ६०००’ समुद्राखाली जाऊन कोणते शोध घेणार?

समुद्रयान प्रकल्पांतर्गत ‘मत्स्य ६०००’
समुद्राच्या पृष्ठभागावर आणि त्याच्याही खाली असलेल्या संसाधनांचा शोध घेणार आहे. या मोहिमेत कोबाल्ट, तांबे व मॅंगनीज या खनिजांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच या प्रकल्पात समुद्राच्या जैवविविधतेचाही अभ्यास करण्यात येणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते की, या वर्षाच्या सुरुवातीला किंवा २०२६ पर्यंत समुद्रयान प्रकल्पाची पूर्ण तयारी होण्याची शक्यता आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने महासागर मोहिमेसाठी (Deep Ocean Mission) ४,०७७ कोटींची तरतूद केली आहे. समुद्रयान प्रकल्प हा याच मोहिमेचा एक भाग आहे.

हे वाचा >> ‘टायटॅनिक’ पाहायला गेलेली ‘टायटन पाणबुडी’ गायब, १४ हजार फूट खोल पाण्यात शोधमोहीम राबवणे अवघड का आहे? जाणून घ्या…

सबमर्सिबल आणि पाणबुडीत काय फरक आहे?

सबमर्सिबल आणि पाणबुडी दोन्ही पाण्याखाली काम करीत असल्या तरी त्यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. दोघांचीही रचना, कामाची पद्धत व उद्देश वेगवेगळे आहेत. पाणबुडी ही समुद्रसपाटीवर आणि समुद्राखालीदेखील काम करू शकते. पाणबुडी चालविण्यासाठी वीज किंवा डिझेल इंधनाचा वापर होतो. ती आकाराने मोठी असते आणि त्यामध्ये अनेक जण राहू शकतात. पाणबुड्यांचा वापर शक्यतो सैनिकी कारवायांसाठी केला जातो; ज्याद्वारे टेहळणी करणे, हल्ला करणे अशी कामे केली जातात.

तर दुसऱ्या बाजूला सबमर्सिबलचे काम पाण्याखाली चालते. पाण्याखाली काम करण्याच्या उद्देशाने याचे डिझाईन तयार करण्यात आलेले आहे. सबमर्सिबलचा आकार छोटा असतो आणि त्यातून अतिशय कमी लोक नेता येतात. शोधमोहिमा किंवा पर्यटनासाठी सबमर्सिबलची निर्मिती करण्यात आलेली आहे. तिचा सैनिकी वापर होत नाही. सबमर्सिबल कार्यरत राहण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावरून त्याला एखाद्या जहाजाची मदत लागते. कारण- खोल समुद्रात जाण्यासाठी सबमर्सिबल जहाजातून वाहून नेली जाते आणि मग पाण्यात सोडली जाते. पाणबुडीमध्ये नेमकी हीच बाब उलट आहे. पाणबुड्या स्वतंत्र पद्धतीने काम करतात; त्यांना कार्यरत राहण्यासाठी जहाजाची मदत लागत नाही.

समुद्राखालील संसाधने महत्त्वाची का?

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत चालल्यामुळे वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरी तयार करण्याची अधिक गरज निर्माण झाली आहे. बॅटरी बनविण्यासाठी ज्या खनिजांची गरज लागते, त्याचा साठा कमी होत चालला आहे. त्यामुळेच आता समुद्राच्या तळाशी असलेल्या खनिजांचा शोध घेतला जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये लागणारे कोबाल्ट आणि लोखंडाच्या कारखान्यांना लागणारे मँगनीज समुद्राच्या खोलवर उपलब्ध होऊ शकते, असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे सबमर्सिबलची शोधमोहीम महत्त्वाची मानली जाते.

समुद्र शोधमोहिमेद्वारे नवी संसाधने विकसित करू

रिजिजू यांनी जून २०२३ मध्येच सबमर्सिबल प्रकल्पाबाबतची माहिती दिली होती. “समुद्राच्या खोलवर समुद्रयान नेऊन मानवयुक्त आणि मानवरहित शोधमोहिमेसाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मानवरहित मोहीम ७००० मीटरच्या पुढे गेली आहे; तर मानवयुक्त मोहिमेसाठी नव्या सबमर्सिबलची निर्मिती केली जात आहे”, अशी प्रतिक्रिया रिजिजू यांनी पूर्वी दिली होती. ८ जून २०२३ रोजी जागतिक सागर दिनानिमित्त (World Ocean Day) NIOT मध्ये बोलत असताना रिजिजू म्हणाले की, आपले शास्त्रज्ञ आणि अभियंते अथक परिश्रम घेऊन सबमर्सिबलची बांधणी करीत आहेत. या प्रकल्पाच्या प्रगतीवर मी लक्ष ठेवून आहे आणि मला आशा आहे की, लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल.

“ज्याप्रमाणे आपण अंतराळ संशोधन करण्यासाठी नव्या मोहिमा हाती घेत आहोत, त्याप्रमाणेच आपल्याला समुद्राच्या खोलवर जाऊन अधिक संशोधन करायचे आहे. आपण अधिक खोलवर जाऊन भारताची मान उंचावण्याचा प्रयत्न करणार आहोत. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवनाचा जमिनीच्या पृष्ठभागावरील जीवनाशी थेट संबंध आहे. संतुलित विकासासाठी शाश्वत पद्धतीने नवी संसाधने विकसित करणे आणि समुद्राच्या शोधमोहिमेत जगाचे नेतृत्व करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावण्यात भारत महत्त्वाचा वाटा उचलेल”, अशी प्रतिक्रिया रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना त्यावेळी दिली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six thousand metres under the sea what we know about indias deep sea submersible matsya 6000 kvg
Show comments