संदीप नलावडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे जग नश्वर आहे, ते लवकरच नष्ट होणार आहे, काही वर्षांत जगबुडी होणार आहे, समुद्राच्या प्रलयात पृथ्वीचा नाश होणार… अशा वावड्या नेहमीच उठतात. जगबुडी, प्रलयाची काल्पनिक आणि खोटी भाकिते अनेकदा झालेली असतील, मात्र पर्यावरणाचा ऱ्हास, वाढते प्रदूषण, वातावरणातील बदल, तापमानवाढ यांमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी कालांतराने नष्ट होणार आहे, अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करतात. नवीन अभ्यासात शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरून मानव आणि सस्तन प्राणी नामशेष होण्याची शक्यता वर्तवली आहे. याचे कारण केवळ तापमानवाढ नाही, तर खंडांच्या एकत्रीकरणातून होणारी संभाव्य महाखंडाची निर्मिती हे आहे. ही शक्यता काय आहे? याबाबत नेमके संशोधन काय? याविषयी…

पृथ्वी नष्ट होण्यासंबंधी नवे संशोधन काय?

इंग्लंडमधील ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधक डॉ. अलेक्झांडर फार्न्सवर्थ यांच्या नेतृत्वात संशोधकांच्या चमूचे संशोधनाअंती पृथ्वीच्या आयुर्मानाविषयी निष्कर्ष काढले आहेत. नेचर जिओसायन्स जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की पृथ्वीवरील सर्व खंड हळूहळू हलत आहेत. ते वाहत जाऊन एकच महाखंड तयार होणार आहे. ज्याला पँगिया अल्टिमा असते संबोधले गेले. नव्या खंड निर्मितीमुळे जीवसृष्टीला धोका निर्माण होणार असून मानव व सस्तन प्राणी नष्ट होतील, असा दावा संशोधकांनी केला आहे.

हेही वाचा >>> पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?

महाखंड निर्मितीनंतर धोका कसा?

महाखंड निर्मितीमुळे पृथ्वीच्या हवामानात लक्षणीय बदल घडून येतील, ज्यामुळे खूप उष्ण आणि कोरडे वातावरण होईल असा अंदाज आहे. तापमानात वाढ तीन कारणांमुळे होते; महाद्वीपीय प्रभाव, सूर्याचे वाढते तापमान आणि वातावरणातील अधिक कार्बन डायऑक्साइड. एआय आधारित हवामान मॉडेल्सचा वापर केलेल्या संशोधनानुसार, नवीन खंड निर्मितीमुळे पृथ्वीच्या हवामानात लक्षणीय बदल घडून येतील. महाखंडाच्या निर्मितीसह अधिक भूभाग समुद्राच्या थंड होण्याच्या प्रभावापासून दूर असेल, परिणामी तापमान वाढेल, ही एक घटना आहे जी महाद्वीपीय प्रभाव म्हणून ओळखली जाते. महाद्वीपांच्या विलीनीकरणामुळे अंतर्देशीय भागांना पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागेल. परिणामी वातावरण अधिक गरम होईल. येत्या एक दशलक्ष वर्षांमध्ये सूर्य अधिक उष्ण आणि तेजस्वी होईल, पृथ्वीवर अधिक ऊर्जा उत्सर्जित करेल आणि अधिक ज्वालामुखीय क्रियाकलाप अधिक कार्बनडाय ऑक्साइड सोडण्यामागील कारण असेल. डॉ. फार्न्सवर्थ यांच्या मते, पृथ्वीतलावरील ४० ते ५० अंश सेल्सिअस किंवा १०४ ते १२२ अंश फॅरेनहाइट या तीव्र तापमानामुळे अनेक प्रजाती नष्ट होतील.

जीवसृष्टी नष्ट होण्यास काय कारणीभूत?

पर्यावरणाचा ऱ्हास, वाढते प्रदूषण, वातावरणातील बदल, तापमानवाढ यांमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी कालांतराने नष्ट होणार आहे, अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करतात. अभ्यासात लेखकाने यावर जोर दिला आहे की सध्याचे हवामान संकट पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट हाेण्यास कारणीभूत असेल. संशोधकांच्या चमूने कार्बनडाय ऑक्साईडच्या भविष्याचा अंदाज घेण्यासाठी टेक्टोनिक प्लेट हालचाली आणि सागरी रसायनशास्त्राच्या मॉडेलचा वापर केला. सध्या कार्बनडाय ऑक्साइड पातळी प्रति दशलक्ष सुमारे ४०० भाग आहे, जी येत्या काही वर्षांत ६०० पीपीएमपेक्षा जास्त होईल. जर कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जन शक्य तितक्या लवकर शून्यावर आणले नाही तर मानवतेचे भविष्य अंधकारमय दिसते.

पृथ्वीवरील आजवरची विलोपने…

पृथ्वीवरील काही जीवसृष्टी नष्ट होण्याच्या काही घटना यापूर्वी पृथ्वीवर घडल्या आहेत. सुमारे ४४३ दशलक्ष वर्षांपूर्वी ऑर्डोविशियन-सिल्युरियन विलोपन (एक्स्टिंक्शन) झाले, ज्यात ८५ टक्के सागरी जीवन नष्ट झाले. त्यानंतर दुसरी घटना म्हणजे लेट डेव्होनियन विलोपन, जी सुमारे ३६० दशलक्ष वर्षांपूर्वी घडली. ज्यात ७५ टक्के प्रजातींचा नाश झाला. २५२ वर्षांपूर्वी पर्मियन-ट्रायसिक विलोपन घडले, ज्याला ‘द ग्रेट डायिंग’देखील म्हटले जाते. त्यावेळी आज जिथे सायबेरिया आहे, त्या प्रदेशात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यामुळे गंभीर हवामान बदल, आम्ल पाऊस आणि महासागराचे आम्लीकरण झाले. सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी ट्रायसिक-ज्युरासिक नामशेष होऊन ५० टक्के प्रजाती नष्ट झाल्या. सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी क्रेटॅशियस-पॅलिओजीन विलुप्त होणे घडले, जेव्हा एका प्रचंड अश्नीच्या प्रभावामुळे सध्याच्या मेक्सिकोमध्ये चिक्सुलब विवर तयार झाले आणि ७५ टक्के प्रजातींबरोबरच सर्व डायनासोर मारले गेले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction print exp zws