आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी लोक यूट्यूबची मदत घेतात. एखाद्या विषयाची माहिती, गाणी, नृत्य, विनोद, चित्रपट, खाद्यपदार्थांचे व्हिडीओ यांसारख्या सर्वच गोष्टी बघण्यासाठी लोक यूट्यूबचा वापर करतात. यूट्यूब पाहणाऱ्यांबरोबरच यूट्यूब व्हिडीओ तयार करणाऱ्यांमध्ये म्हणजेच यूट्यूबर्समध्ये गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. यूट्यूब व्हिडीओ तयार करणारे असेच एक गाव आहे, जिथे गावातील प्रत्येक जण यूट्यूबर आहे. या गावाला ‘यूट्यूब कॅपिटल ऑफ इंडिया’ अशी ओळख मिळाली आहे. या गावाला ही ओळख कशी मिळाली? यूट्यूबचा वापर करून लोक पैसे कसे कमावतात? त्याविषयी जाणून घेऊ.
युट्यूब कॅपिटल ऑफ इंडिया
छत्तीसगडच्या रायपूरजवळ चार हजार लोकसंख्या असलेले तुलसी नावाचे एक गाव आहे. या गावात हजारो रहिवासी यूट्यूबर्स आहेत. या गावाला ‘यूट्यूब कॅपिटल ऑफ इंडिया’ अशी ओळख मिळाली आहे. या गावातील रहिवासी यूट्यूबवर कंटेंट तयार करण्यात आणि अपलोड करण्यात सक्रिय आहेत किंवा काही जण यूट्यूब प्लॅटफॉर्मशी संबंधित काम करतात. त्यांच्या कमाईचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम झाला आहे; ज्यामुळे गावाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे.
छत्तीसगडमधील तुलसी गाव नुकतेच ‘बीबीसी वर्ल्ड’च्या वृत्तात वैशिष्ट्यीकृत करण्यात आले. त्यात गावातील रहिवाशांवर युट्यूबच्या प्रभावावर भर देण्यात आला होता. युट्यूब त्यांच्या दैनंदिन जीवनात किती खोलवर रुजले आहे, पुरुष आणि महिला वयाची पर्वा न करता दिवसभर या प्लॅटफॉर्मवर स्वतःचा वेळ कसे घालवत आहेत, ते या अहवालात सांगण्यात आले आहे. काही रहिवाशांनी त्यांचे स्वतःचे स्टुडिओ तयार केले आहेत, तर काही केवळ मोबाइल फोन आणि ट्रायपॉडवर आपले कंटेंट तयार करतात. या गावातील प्रत्येक ठिकाणांचा वापर युट्यूब कंटेंट तयार करण्यासाठी केला जातो. यामुळेच या गावाला भारताचे ‘युट्यूब कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून ओळख मिळाली आहे.

युट्यूब कंटेंट तयार करणे ठरला कमाईचा स्रोत
‘बीबीसी’च्या वृत्तात स्थानिक अर्थव्यवस्थेवर युट्यूब कमाईच्या प्रभावाविषयीदेखील सांगण्यात आले आहे. आर्थिक फायद्यांसह, युट्यूब प्लॅटफॉर्मने सामाजिक समानता आणि बदल घडवून आणण्याचे कामही या गावात केले आहे. असंख्य रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात सब्सक्राइबर असणारे यशस्वी युट्यूब चॅनेल तयार केले आहेत; ज्यामुळे त्यांना पर्यायी उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे. अंदाजानुसार, भारतात दर महिन्याला सुमारे २५० दशलक्ष लोक युट्यूब प्लॅटफॉर्म वापरतात, ही संख्या फार मोठी आहे.
तुलसी या गावामध्ये स्थानिकांचे जीवन आता ऑनलाइन व्हिडिओंभोवती फिरते. “यामुळे मुले वाईट सवयी आणि गुन्हेगारीपासून दूर राहात आहे,” असे तुळशी गावातील ४९ वर्षीय शेतकरी नेतराम यादव यांनी बीबीसीला सांगितले. “या युट्यूबर्समुळे गावातील प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाचा आणि कार्याचा अभिमान वाटला आहे,” असेही ते पुढे म्हणाले. तुलसी गावात युट्यूबची सुरुवात २०१८ मध्ये झाली जेव्हा जय वर्मा आणि त्यांचे मित्र ज्ञानेंद्र शुक्ला यांनी बीइंग छत्तीसगढिया नावाचे युट्यूब चॅनल सुरू केले. वर्मा यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, आम्ही आमच्या नित्याच्या जीवनात समाधानी नव्हतो आणि आम्हाला काहीतरी करायचे होते.”
त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात एका तरुण जोडप्याला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बजरंग दलाच्या सदस्यांकडून त्रास दिला जात होता. कॉमेडी आणि सामाजिक भाष्य यांचा मिलाफ लोकांना आवडला. अवघ्या काही महिन्यांत या दोघांनी झपाट्याने हजारो फॉलोअर्स मिळवले. हा आकडा तेव्हापासून १२०,००० पेक्षा जास्त सदस्यांपर्यंत वाढला आहे. त्यांची कमाई जसजशी वाढत गेली, तसतसे सोशल मीडियावर ते घालवत असलेल्या वेळेविषयीची त्यांची पूर्वीची चिंता दूर झाली. त्यावेळी त्यांची दर महिन्याला ३०,००० रुपयांहून अधिक कमाई होत होती. त्यानंतर, दोघांनी केवळ त्यांच्या युट्यूब करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

गावकऱ्यांना मिळाले चित्रपटांमध्ये काम
वर्मा आणि शुक्ला यांच्या यशाने लवकरच तुलसी गावातील इतर रहिवाशांना प्रेरणा दिली. त्यांच्या कार्यसंघामध्ये प्रशिक्षित अभिनेते, व्हिडिओ संपादक आणि स्क्रिप्ट रायटर यांचा समावेश करण्यासाठी विस्तार केला; ज्यामध्ये प्रत्येकाला त्यांच्या योगदानासाठी पैसे मिळतात. काही गावकऱ्यांनी त्यांचे स्वतःचे चॅनेल सुरू केले, तर काहीजण इतर युट्यूब चॅनल टीममध्ये सामील झाले. २०२३ मध्ये, राज्य सरकारने गावात अत्याधुनिक स्टुडिओची स्थापना केली आहे. तुलशीतील शेकडो तरुणांसाठी युट्यूबहे एक व्यवहार्य उपजीविकेचे साधन म्हणून उदयास आले आहे. तुलसी गावात २७ वर्षीय पिंकी साहू प्रसिद्ध झाली.
टीकांकडे लक्ष न देता साहूने इंस्टाग्राम रील आणि यूट्यूब शॉर्ट्सवर डान्स व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. तिच्या कंटेंटने लोकप्रियता मिळवली. तिच्या प्रसिद्धीमुळे छत्तीसगड प्रादेशिक चित्रपट उद्योगात तिच्यासाठी संधी निर्माण झाल्या आणि त्यानंतर ती सात चित्रपटांमध्ये दिसली. त्याचप्रमाणे इतर अनेक गावकऱ्यांनीही प्रादेशिक सिनेमांमध्ये अभिनयाच्या भूमिका मिळवल्या.
युट्यूबने खेड्यातील स्त्रियांची समज आणि वागणूक यावर लक्षणीय परिणाम केला आहे.
बीबीसीच्या अहवालात असे म्हटले आहे की, युट्यूबमुळे घरातील आणि समाजात महिलांसाठी आदर आणि समानतेचे महत्त्व अधिक अधोरेखीत झाले आहे. गावातील अनेक महिला आता स्वतःचे युट्यूब चॅनल चालवत आहेत. करोना काळात कंटेंट तयार करणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. करोनानंतर अनेकांनी युट्यूब कंटेंट तयार करण्यावर भर दिला आहे. अनेकांनी यातील यश पाहाता आपल्या नोकऱ्याही सोडल्या आहेत.