अन्वय सावंत
भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) २०२१ या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराची मानकरी ठरली. सांगलीच्या स्मृतीने २०२१मध्ये क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारांत दिमाखदार कामगिरी करताना कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा पुरस्कार आपल्या नावे केला. स्मृतीची जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम महिला फलंदाजांमध्ये गणना होते. तिने आघाडीच्या खेळाडूंना मागे टाकून ‘आयसीसी’च्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवताना स्वतःचा दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
कशी होती २०२१ वर्षातील कामगिरी?
स्मृतीने २०२१ वर्षात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून एकूण २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३८.८६च्या सरासरीने ८५५ धावा केल्या. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता. घरच्या मैदानांवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला आठपैकी केवळ दोन सामने जिंकता आले. स्मृतीने या दोन्ही विजयांत महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिने नाबाद ८० धावांची खेळी केली. त्यानंतर ट्वेन्टी-२० मालिकेच्या अखेरच्या लढतीत तिने नाबाद ४८ धावा साकारताना भारताला विजय मिळवून दिला. इंग्लंडमध्ये एकमेव कसोटीच्या पहिल्या डावात स्मृतीने ७८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच एकदिवसीय मालिकेतील एकमेव विजयात ४९ धावांचे योगदान दिले.
कोणती खेळी होती सर्वांत खास?
भारतीय महिला संघाला मागील वर्षी प्रथमच प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळण्याची संधी लाभली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेट्रिकॉन स्टेडियमवर (क्वीन्सलँड) झालेल्या या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर स्मृतीने सुरुवतीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत ५१ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर संयमाने खेळ करताना १७० चेंडूत कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियात कसोटी शतक साकारणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तिच्या १२७ धावांच्या खेळीमुळे भारताने हा सामना अनिर्णित राखला.
पुरस्कार पटकावताना कोणावर मात केली?
वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा ‘रेचल हेहो फ्लिंट’ करंडक पटकावताना स्मृतीने इंग्लंडची टॅमी ब्यूमॉंन्ट, दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली आणि आयर्लंडची गॅबी लेविस यांच्यावर मात केली. स्मृतीने याआधी २०१८ मध्येही हा पुरस्कार मिळवला होता. ‘आयसीसी’चा वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार दोन वेळा जिंकणारी ती ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीनंतर केवळ दुसरीच खेळाडू ठरली.
पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाली?
वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकल्यावर स्मृतीने ‘आयसीसी’चे आभार मानले. ‘‘जागतिक क्रिकेट नियामक मंडळाने माझ्या कामगिरीची दखल घेतली याचा खूप आनंद आहे. या पुरस्कारामुळे खेळात सुधारणा करत राहण्याची आणि भारतीय महिला संघाच्या यशात योगदान देत राहण्याची मला स्फूर्ती मिळेल. मी माझ्या भारतीय संघातील सहकारी, प्रशिक्षक, माझे कुटुंबीय, माझा मित्रपरिवार आणि चाहते या सर्वांचे आभार मानू इच्छिते. त्यांचा मला कायम पाठिंबा लाभला,’’ असे स्मृती म्हणाली. तसेच यंदा न्यूझीलंडमध्ये होणारा एकदिवसीय विश्वचषक जिंकणे हे भारतीय संघाचे लक्ष्य असून त्यासाठी तयारीला सुरुवात केल्याचेही तिने सांगितले.
पुरुषांमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला?
‘आयसीसी’चा वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने पटकावला. शाहीनने २०२१ वर्षात ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत तब्बल ७८ गडी बाद केले. त्याने हा पुरस्कार जिंकताना इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान यांच्यावर सरशी केली.