Social Media Trends Explained: सोशल मीडिया इन्फ्लूएंसिंग हे सध्या वेगाने वाढत जाणारे व आता या घडीला कोट्यवधींची उलाढाल असणारे मार्केट ठरले आहे. भारतात युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक सर्व माध्यमांमधून एखाद्या वस्तूची जाहिरात करण्यासाठी उत्पादक मोठी रक्कम मोजायला तयार असतात. यापूर्वी अभिनेते- सेलिब्रिटी यांच्या लोकप्रियतेचा आधार घेत वस्तूंची विक्री होत असे,यातूनच जाहिरातींचे क्षेत्र विकसित झाले. पण आता सामान्य माणसांना सेलिब्रिटीज पेक्षा आपल्यासारखाच सामान्य माणूस देत असणारा सल्ला अधिक आपलासा वाटतो. यामुळेच लाइफस्टाइल, फॅशन, घरगुती वस्तू व त्यांचे उपयोग, इत्यादींवर व्हिडीओ बनवणारे क्रिएटर्स हे जाहिरातींचे नवे माध्यम बनत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमचे पैसे वाचवण्यासाठी काय विकत घ्यावे या स्वरूपात अनेक इन्फ्ल्यूएंसर्स व्हिडीओ बनवतात. यातील बहुतांश व्हिडीओ हे कंपनीने पैसे देऊनच बनवून घेतलेले असतात. आता याच सोशल मीडियावरील इन्फ्ल्यूएंसर्सनी एक नवा ट्रेंड सुरु केला आहे, तो म्हणजे ‘डीइन्फ्ल्यूएंसिंग’. हा प्रकार नेमका काय आहे चला जाणून घेऊयात..

DE Influencing म्हणजे काय?

DE influencing या हॅशटॅग अंतर्गत सोशल मीडियावर आतापर्यंत 68 दशलक्ष व्हिडीओज बनवण्यात आले आहेत. विशेषतः मेक-अप, दागिने आणि स्किनकेअरशी संबंधित उत्पादनांच्या जाहिरातीसाठी हा ट्रेंड बनवण्यात आल्याचे दिसत आहे. अगदी थोडक्यात सांगायचे तर आजपर्यंत जे क्रिएटर्स तुम्हाला काय विकत घ्याल हे सांगत होते तेच यापुढे काय विकत घेऊ नये हे सांगणार आहेत.

DE Influencing ची गरज व स्वरूप काय?

ग्लॉसी या यूएस ब्युटी अँड वेलनेस वेबसाइटच्या मते, बर्‍याच देशांमध्ये जागतिक मंदीची चिन्हे असताना, ग्राहकांना पैसे कसे वाचवता येईल याविषयी अधिक उत्सुकता आहे. यामुळेच विक्रीच्या उद्देशाने थेट बनवलेले व्हिडीओ पाहणे टाळले जाते. कारण लोकांना पैसे खर्च करण्याऐवजी वाचवण्याची पद्धत हवी आहे. मॅडी वेल्स हिने २०२० मध्ये या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख केला होता. या ब्युटी इन्फ्लुएंसरने एका मेक-अप व्हिडिओमध्ये अशा वस्तूंविषयी सांगितले होते ज्या लोकं एकदाच वापरून पुन्हा परत करतात. असे म्हणत तिने तिच्या फॉलोअर्सना उत्पादनांची गुणवत्ता कमी असल्याने ते विकत घेऊ नका असे सांगितले होते.

DE Influencing मुळे Influencers ना काय फायदा होणार?

जेव्हा DE influencing करताना एखादा क्रिएटर तुम्हाला अमुक गोष्टीवर पैसे वाया घालवू नका हे सांगतो तेव्हा त्याला पर्याय म्हणून अन्य वस्तू सुद्धा सुचवतो, म्हणजेच ‘अमुक’ ब्रँडपेक्षा ‘तमुक’ ब्रँड घेतल्यास तुमचे पैसे वाचतील असं अप्रत्यक्ष सांगितलं जातं. यामुळे फॅन्सचा विश्वास संपादन करून त्यांना वस्तू विकण्याचेही टार्गेट पूर्ण केले जाते. फॉर्च्युनने नमूद केले की, जाहिरातीचे संपूर्ण क्षेत्र पुढे भविष्यात अशाच ट्रेंडचे पालन करण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा<< विश्लेषण: आरोग्य सेतूने गोळा केलेल्या तुमच्या खासगी डेटाचं पुढे नेमकं काय झालं माहितेय का?

इन्फ्ल्यूएंसर्सच्या मते या ट्रेंडमुळे त्यांना प्रेक्षकांपर्यंत वेगळ्या मार्गाने पोहोचण्यास मदत झाली आहे. फक्त वस्तू विकणे नाही तर तुमच्या हिताची माहिती देत असल्याचे सांगून ग्राहकांचा विश्वास जिंकता येत असल्याचे ते सांगतात. इन्फ्ल्यूएंसर्सचे काम हे अजूनही विक्रीच असणार आहे पण फक्त “काय विकत घ्यावे” पासून “काय खरेदी करू नये” वर प्रभाव टाकला जाईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media influencers will not sell products for paid promotions due to de influencing trend explained svs