What are the side effects of reels : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असून, इंटरनेटचा वापर झपाट्यानं वाढला आहे. सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडीओ पाहणं सामान्य झालं आहे. अगदी लहान मुलांपासून, तरुण ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला रील्स पाहण्याचं जणू व्यसनच जडलं आहे. मात्र, करमणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या या साधनामुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. चीनमधील हेबेई मेडिकल युनिव्हर्सिटीच्या फर्स्ट हॉस्पिटलमधील संशोधकांनी नुकतंच एक संशोधन केलं आहे. त्यात काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. दरम्यान, अभ्यासात नेमकं काय म्हटलं आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
हेही वाचा : Heart Attack Exercise : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्यायाम करावा?
अभ्यासात काय म्हटलं आहे?
बायोमेड सेंट्रल (BMC) या जर्नलमध्ये नुकताच एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला. त्यात असं म्हटलं आहे की, “सोशल मीडियावर तासन् तास रील्स पाहिल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रात्री झोपण्याआधी रील्स पाहणाऱ्या तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींना हृदयविकाराच्या समस्या, तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. स्क्रीन टाईम वाढल्याने यांसारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहणं टाळायला हवं”, असा सल्ला देण्यात आला आहे.
रील्स पाहणाऱ्या व्यक्तींचे आरोग्य धोक्यात?
सोशल मीडियाचा वापर आणि उच्च रक्तदाबाचा धोका यांच्यातील एक त्रासदायक दुवा अभ्यासातून उघड झाला आहे. चीनमध्ये जानेवारी ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत एक संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहणाऱ्या चार हजार ३१८ तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातून असं समोर आलं की, तासन् तास रील्स पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त होते.
संशोधकांनी असंही सांगितलं की, “स्क्रीन टाईममध्ये टीव्ही पाहणं, व्हिडीओ गेम्स खेळणं व संगणकाचा वापर करणं इत्यादी बाबींचा समावेश आहे. मात्र, टीव्ही पाहताना,तसेच व्हिडीओ गेम खेळताना शारीरिक हालचाली होतात. आमचा अभ्यास फक्त झोपण्याच्या आधी रील्स पाहणाऱ्या व्यक्तींवर आधारित होता. त्यातून असा निष्कर्ष निघाला की, रील्स पाहताना शरीराची कुठलीही हालचाल होत नाही.”
रील्स पाहिल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम
संशोधकांनी केलेल्या अभ्यासाचा संदर्भ देत टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात असं म्हटलं आहे की, सतत रील्स पाहणाऱ्या व्यक्तींना मानसिक तणावाच्या समस्या जाणवू शकतात. रील्स पाहण्याच्या सवयीमुळे मेंदूवर ताण येऊन हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन उच्च रक्तदाबाच्या समस्या निर्माण होतात. चिंताजनक बाब म्हणजे अभ्यासात असंही आढळून आलं आहे की, झोपण्यापूर्वी एक ते दोन तास रील्स पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
रील्स पाहिल्याने होऊ शकतो उच्च रक्तदाब
बंगळुरू येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या अभ्यासानं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. “लक्ष विचलित करणं आणि वेळेचा अपव्यय करण्याव्यतिरिक्त रील्सचं व्यसन तरुण आणि मध्यमवयीन लोकांना होणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या त्रासाशीही जोडलेलं आहे. ते ‘अनइन्स्टॉल’ करण्याची वेळ आली आहे”, असं डॉ. कृष्णमूर्ती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. रील्स पाहणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या सवयी बदलायला हव्यात, असं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात ३० ते ७९ वयोगटातील १.३ अब्ज व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं असून, अनेकांचे अकाली मृत्यू होत आहेत.
हेही वाचा : नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?
उशिरापर्यंत रील्स पाहिल्याने झोपेवर दुष्परिणाम
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रात्री उशिरापर्यंत रील्स पाहिल्यानं झोपेच्या वेळेवर मोठा दुष्परिणाम होतो. मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश ‘मेलाटोनिन’ला रोखतो, ज्यामुळे शरीराला आराम मिळणं आणि झोपेची तयारी करणं कठीण होतं. क्लीव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, मेलाटोनिन हा एक ‘स्लीप हार्मोन्स’ आहे, जो प्रामुख्याने मेंदूच्या ग्रंथीतून तयार होतो. झोप लागणं आणि जाग येण्यासाठी ‘मेलाटोनिन’ महत्त्वाची भूमिका बजावतो. शरीराला पुरेशी झोप न मिळाल्यानं उच्च रक्तदाबासाठी एक मोठा धोका निर्माण होतो. जेव्हा तुम्ही कमी झोपता, तेव्हा तुमच्या हृदयाला पुरेसा आराम मिळत नाही. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
रात्री शांत झोप लागण्यासाठी काय करावे?
झोपण्यापूर्वी रील्स पाहणं आणि स्क्रीन टाईम वाढणं कसं टाळता येईल यासाठी संशोधकांनी काही उपाय सुचवले आहेत. त्यामध्ये त्यांनी उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी शरीराचं वजन, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर व युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी सोडियमचे उच्च प्रमाण असलेला आहार टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीतील काही सवयीदेखील बदलण्यास सांगितलं आहे.
- रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरण्यासाठी एक ठरावीक वेळ निश्चित करा.
- रात्रीच्या वेळी मोबाईलचा ब्राइटनेस कमी ठेवा. तसेच ब्ल्यू लाइट फिल्टर्स किंवा अॅप्स वापरा.
- झोप येत नसल्यास जास्त वेळ मोबाईल पाहणं टाळा, चांगली पुस्तकं वाचा किंवा ध्यान लावण्याचा प्रयत्न करा.
- रात्री बेडरूममधील लाइट्स बंद ठेवा; जेणेकरून तुम्हाला लवकर आणि शांत झोप लागेल.