नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने (नासा) शनिवारी जाहीर केले की, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस)मध्ये अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना ‘स्पेसएक्स’च्या क्रू ड्रॅगन फ्लाइटने फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर परत आणले जाईल. नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर हे बोईंग स्टारलायनर या अंतराळयानाच्या आठ दिवसांच्या चाचणीसाठी म्हणून अंतराळात गेले होते. मात्र, त्यांच्या यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते अडीच महिन्यांहून अधिक काळ अंतराळातच अडकले आहेत.
नासाने जाहीर केल्यानुसार त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी २०२५ उजाडणार आहे. सध्या नासा आणि स्पेसएक्स ‘क्रू ड्रॅगन’ हे स्पेसक्राफ्ट लाँच करण्यापूर्वी अनेक गोष्टींवर काम करीत आहेत. उदाहरणार्थ, ते जागा निर्धारित करीत आहेत आणि अतिरिक्त माल वाहून नेण्यासाठी या यानाची क्षमता तपासत आहेत. क्रू ड्रॅगन नक्की काय आहे? या यानाचे वैशिष्ट्य काय? यावर एक नजर टाकू या.
हेही वाचा : भारत आणि अमेरिकेने संरक्षण करारावर केली स्वाक्षरी; काय आहेत दोन नवीन करार? याचा भारताला कसा फायदा होणार?
क्रू ड्रॅगन म्हणजे काय?
क्रू ड्रॅगन हे ‘स्पेसएक्स’कडील ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या दोन प्रकारांपैकी एक आहे. ‘स्पेसएक्स’च्या या स्पेसक्राफ्टने आधीही अंतराळवीरांशिवाय आणि अंतराळवीरांसह, अशी दोन्ही प्रकारची उड्डाणे केली आहेत. हे स्पेसक्राफ्ट पुन्हा वापरण्यायोग्य आहे. स्पेसक्राफ्टचा दुसरा प्रकार म्हणजे कार्गो ड्रॅगन. त्यांच्या नावांप्रमाणे, क्रू ड्रॅगन प्रामुख्याने अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर नेते आणि कार्गो ड्रॅगन अंतराळस्थानकावर मालाचा पुरवठा करते.
२०११ मध्ये स्पेस एजन्सीचा स्पेस शटल प्रोग्राम संपल्यानंतर अंतराळस्थानकाकडे नेणारी उड्डाणे अमेरिकन कंपन्यांकडे सोपविण्याच्या नासाच्या योजनेचा एक भाग म्हणून ‘स्पेसएक्स’ने क्रू ड्रॅगन लाँच केले. क्रू ड्रॅगनची आयएसएसमधील पहिली मोहीम २०२० मध्ये झाली होती. या मोहिमेत चार अमेरिकन आणि जपानी अंतराळवीरांना अंतराळस्थानकावर नेण्यात आले होते. या यानाने आतापर्यंत नासासाठी अंतराळस्थानकावर आठ क्रू रोटेशन मोहिमा केल्या आहेत. ही क्रू ड्रॅगनची नववी मोहीम असेल.
क्रू ड्रॅगनची वैशिष्ट्ये काय आहेत?
क्रू ड्रॅगनमध्ये एक पुन्हा वापरता येण्याजोगा स्पेस कॅप्सुल आणि दुसरा विस्तार करण्यायोग्य ट्रंक मॉड्युल, दोन भाग असतात. स्पेस कॅप्सुलमध्ये १६ ड्रॅको थ्रस्टर्स आहेत, जे यानाला चालवतात. प्रत्येक ड्रॅको थ्रस्टर्सचा व्हॅक्युम ९० पौंड इतकी शक्ती निर्माण करण्यास सक्षम आहे, असे ‘बीबीसी’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. वृत्तात असे म्हटले आहे की, ट्रंकमध्ये सौर पॅनेल, हीट-रिमूव्हल रेडिएटर्स, कार्गोसाठी जागा व आपत्कालीन परिस्थितीत स्थिरता प्रदान करण्यासाठी पंख आहेत. हे स्पेसक्राफ्ट पुन्हा वापरता येण्यायोग्य ‘स्पेसएक्स’ने विकसित केलेल्या रॉकेट ‘फाल्कन ९’द्वारे अंतराळात प्रक्षेपित केले जाते आणि हे यान स्वयंचलितपणे ‘आयआयएस’वर उतरते.
स्पेसएक्सच्या स्टारशिप मिशन हार्डवेअर आणि ऑपरेशनच्या संचालक जेसिका जेन्सेन यांनी ‘बीबीसी’ला सांगितले, “आम्ही ड्रॅगनवर जीपीएस सेन्सर लावले आहेत. तसेच, स्पेसक्राफ्टच्या अगदी समोरील टोकावर कॅमेरे व इमेजिंग सेन्सर, जसे की लिडार (लेझर रेंजिंग) आहेत. हे सेन्सर्स आमच्या फ्लाइट कॉम्प्युटरला डेटा पाठवतात आणि स्पेसक्राफ्ट अंतराळस्थानकापासून किती दूर आहे, अंतराळस्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी सापेक्ष वेग किती आहे यांसारख्या गोष्टी सूचित करतात.”
हेही वाचा : आधी पूरस्थितीचा आरोप, आता व्हिसा केंद्राबाहेर निषेध; बांगलादेशात भारतविरोधी भावना का वाढत आहे?
जेव्हा अंतराळवीरांना पृथ्वीवर परत जाण्याची आवश्यकता असते, तेव्हा अंतराळयान आयएसएसवरून अनडॉक होते. त्यानंतर त्याचे ट्रंक कॅप्सूलपासून वेगळे होते. नंतर हे कॅप्सूल थ्रस्टर्सचा वापर अवकाशयानाचा वेग कमी करण्यासाठी करते; ज्याला डी-ऑर्बिट बर्न, असे म्हणतात. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करणे शक्य होते. पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर कॅप्सूल खाली उतरण्यासाठी चार पॅराशूट तैनात करते. शेवटी अंतराळयान खाली समुद्रात पडते आणि मग तेथून यान जहाजाद्वारे परत आणण्यात येते.