जयेश सामंत
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये मोठे यश मिळताच ठाणे जिल्ह्यातील भाजप नेते पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात भाजप पूर्वीप्रमाणे लहान भावाच्या भूमिकेत वावरायला तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत यांच्या कल्याण या लोकसभा मतदारसंघात त्यांना वारंवार डिवचण्याचा प्रयत्न भाजप नेते करताना दिसतात. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी संपूर्ण जिल्ह्यात यापुढे भाजपचे खासदार असतील असे वक्तव्य करत थेट शिंदे पिता-पुत्रांनाच शिंगावर घेतले. यापूर्वीही ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या कुरघोडीच्या राजकारणाकडे डोळेझाक करणाऱ्या शिंदेसेनेच्या नेत्यांनी या वेळी मात्र भाजपच्या ‘अरे’ला ‘कारे’ म्हणण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला भाजपकडून का डिवचले जात आहे?
ठाणे जिल्ह्यात पूर्वीचा जनसंघ आणि नंतरच्या काळात भाजपचे खासदार निवडून येत होते. रामभाऊ म्हाळगी, प्राध्यापक राम कापसे यांसारख्या नेत्यांनी ठाणे, डोंबिवलीचे खासदारपद भूषविले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी युतीच्या राजकारणात जुना ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून घेतला. तेव्हापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्याजाणत्यांच्या मनात ही सल कायम आहे. लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन नवा कल्याण मतदारसंघ अस्तित्वात आला. या पुनर्रचनेनंतर तरी कल्याण, डोंबिवली भाजपला मिळेल या आशेवर या पक्षाचे नेते होते. मात्र नरेंद्र मोदी हे केंद्रीय राजकारणात येण्यापूर्वी झालेल्या २००९ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात गेला. मोदी लाटेनंतर मात्र ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे प्रभावी नेते भाजपमध्ये आले आहेत. याशिवाय मोदी लाटेवर स्वार असलेल्या मतदारांचे मोठे जाळे जिल्ह्यातील शहरी भागात आहे. त्यामुळे आता शिवसेनेला वरचढ होऊ द्यायचे नाही अशी रणनीती भाजपच्या गोटात सातत्याने आखली जात आहे.
आणखी वाचा-विश्लेषण : सरळसेवा भरती ‘एमपीएससी’मार्फत कधी होणार?
ठाणे लोकसभा जागेवर भाजपचा दावा का?
ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी नवी मुंबईतील दोन तर ठाण्यातील एका ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. मिरा-भाईंदरमधून गीता जैन या अपक्ष आमदार असल्या तरी त्यांचे मूळ हे भाजपचेच आहे. उरलेल्या दोन म्हणजेच कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा या दोन मतदारसंघांत अनुक्रमे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत. सरनाईक हे सध्या शिंदे यांच्या शिवसेनेत असले तरी त्यांची भाजपशी जवळीक लपून राहिलेली नाही. याशिवाय या मतदारसंघाचे खासदार राजन विचारे हे अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा असा खासदार या मतदारसंघात उरलेला नाही. आमदारांचे गणित आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर या संपूर्ण मतदारसंघाचे राजकीय गणित बदलले आहे असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांचा पक्षाकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे.
शिंदे समर्थक अचानक आक्रमक का झाले?
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राज्याचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. शिंदे हे भाजपच्या पूर्ण प्रभावाखाली राहतील असे सुरुवातीला अनेकांना वाटले. या सूत्रानुसार दिल्लीतील भाजप नेत्यांच्या भेटींसाठी शिंदे यांच्या वरचेवर दिल्लीवाऱ्याही सुरू असतात. असे असले तरी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर पट्ट्यातील शहरांवर असलेली पकड मात्र शिंदे यांनी अजूनही ढिली होऊ दिलेली नाही. ठाणे आणि आसपासच्या शहरांमधील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर शिंदे यांचा पूर्ण वरचष्मा आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातही डाॅ. श्रीकांत म्हणतील तीच पूर्व दिशा असा कारभार चालतो. त्यामुळे इतके दिवस भाजप नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाकडे कानाडोळा करणारे शिंदे आणि त्यांचे समर्थक या वेळी मात्र आक्रमक रणनीती आखताना दिसत आहेत. तीन राज्यांतील निवडणुकांमधील विजयानंतर भाजप नेते आक्रमक होतील याची कल्पना असलेल्या शिंदे सेनेतील नेत्यांनी तातडीने ठाण्यात बैठकांचा सपाटा लावला. ठाणे, कल्याण तर आमचेच शिवाय भिवंडीतही आमची ताकद असल्याच्या बातम्या या बैठकीनंतर पद्धतशीरपणे पेरण्यात आल्या. ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा क्षेत्रात असलेल्या ताकदीची उजळणी मुद्दाम करण्यात आली. ठाणे, कल्याणच नव्हे तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातही आमची ताकद दाखवून देऊ असे इशारे शिंदे समर्थकांनी द्यायला सुरुवात केली आहे.
आणखी वाचा-भारतात अवयवदानाचे नियम काय? दोषी आढळल्यास १ कोटींचा दंड, जाणून घ्या कायदा काय सांगतो?
ठाण्याच्या उमेदवाराची नव्याने चाचपणी कशासाठी?
जागावाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला सुटला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होईल अशी भीती त्यांच्या निकटवर्तीयांना आहे. ज्या लोकसभा क्षेत्रात मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ येतो तोच भाजपला सोडून द्यावा लागला तर विरोधकांना आणि त्यातही उद्धव सेनेला आयता मुद्दा सापडेल हे स्पष्टच आहे. असे असले तरी मोदी-शहांच्या धक्कातंत्र राजकारणामुळे ठाण्यात काहीही घडू शकते या आशेवर भाजप नेते आहेत. शिवाय राजन विचारे हे ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने मुख्यमंत्र्यांकडे उमेदवार कुठे आहे असा सवालही भाजप गोटातून विचारला जात आहे. यासंबंधीचे संभ्रमित चित्र दूर व्हावे यासाठी शिंदे समर्थकांनी बैठकांचा सपाटा लावला असून ठाण्यातून आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक अशी नावे चर्चेत आणली जात आहेत.