प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात विधिपूर्वक रामरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रत्येक रामभक्त वर्षानुवर्षे या क्षणाची वाट पाहत होता. या बहुचर्चित सोहळ्यानंतर सर्वांसाठी अयोध्येतील राममंदिर खुले करण्यात आले आहे. पौराणिक कथांमध्ये वर्णन केल्यानुसार श्रीरामरायाची मूर्ती सजविण्यात आली आहे. शास्त्राधारीत श्रीरामाच्या सौंदर्यानुसार त्यांचे वस्त्र आणि दागिने तयार करण्यात आले आहे. ५१ इंचाच्या नवीन मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभू रामचंद्रांच्या बालस्वरूपातील या मूर्तीचे ऐश्वर्य आणि सौंदर्य अतिशय मनमोहक आणि लोभस आहे. भाविक आणि मंदिर ट्रस्टच्या मते संशोधनानुसार या मूर्तीला चढवण्यात आलेल्या प्रत्येक दगिन्याला विशेष महत्त्व आहे.

या दागिन्यांमध्ये विशेष काय आहे? जाणून घ्या..

मुकूट

प्रभू रामचंद्रांनी एक किलो ७०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट परिधान केला आहे. लखनौमधील हरसहयमल श्यामलाल ज्वेलर्सने तयार केलेल्या या मुकुटात ७५ कॅरेट हिरे, १३५ कॅरेट (अंदाजे) झांबियन पन्ना आणि २६२ कॅरेट माणिक यासह इतर रत्न जडले आहेत. “हे मुकूट फक्त साडेपाच वर्षांच्या मुलाला घालायचे होते हे लक्षात घेऊन बनवण्यात आले. आम्ही हिंदू ग्रंथ आणि टीव्ही शो रामायणातून प्रेरणा घेतली आहे,” असे ज्वेलर्सने एका प्रकाशनात म्हटले आहे. प्रभू रामाच्या मुकुटात सूर्याचे प्रतीकही बनवण्यात आले, कारण राम हे सूर्यवंशी होते.

टिळा

पिवळ्या सोन्यात बनवलेल्या प्रभू रामचंद्रांच्या टिळ्याचे वजन सुमारे १६ ग्रॅम आहे. त्याच्या मध्यभागी एक गोल तीन-कॅरेटचा हिरा बसविण्यात आला आहे. या हिऱ्याच्या आजूबाजूला १० कॅरेट वजनाचे लहान हिरे बसवण्यात आले आहेत. टिळ्यात वापरलेले माणिक हे सर्व बर्मी माणके आहेत. ते भुवयांच्या मध्यभागी स्थित असलेल्या अजना चक्राला झाकतात.

हार

प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला लहान-मोठे सुंदर हार घालण्यात आले आहेत. हे सर्व हार सोन्याचे आहेत. गळ्यात कांथा, चंद्रकोराच्या आकाराचा हार रत्नजडित आहे. यात सौभाग्याचे प्रतीक असलेल्या फुलांच्या डिझाईन्स आहेत. सोन्यापासून तयार केलेला आणि हिरे, माणिक आणि पाचूंनी जडलेला हा हार दैवी वैभव दर्शवतो.

प्रभू रामाचा दुसरा हार आहे पांचालदा. हा हिरे आणि पाचूंनी बनलेला पाच स्ट्रँडचा हार आहे. या हारात मोठे अलंकृत पेंडेंट आहे. माणिक, हिरे, कौस्तुभ मणी यांनी जडलेला हा हार ६६० ग्रॅम वजनाचा आहे.

प्रभू रामचंद्रांनी परिधान केलेल्या सर्व हारांपैकी लांब हार आहे विजयमाला. विजयाचे प्रतीक म्हणून हा हार परिधान करण्यात आला आहे. हा हार वैष्णव परंपरेचे प्रतीक दर्शवते – सुदर्शन चक्र, कमळ, शंख आणि मंगल कलश यांसह हारामध्ये कमल, कुंड, पारिजात, चंपा आणि तुळशी ही पाच पवित्र फुलेदेखील आहेत. या हाराची लांंबी प्रभू रामचंद्रांच्या चरणाला स्पर्श करते, जे अमर्याद भक्ती आणि मानव कल्याणाचेही प्रतीक आहे.

कर्धानी किंवा कमरबंद

प्रभू रामचंद्रांचा कमरबंद रत्नजडित असून माणिक, मोती, हिरे पन्नासह सोन्याने बनलेला आहे. याचे वजन सुमारे ७५० ग्रॅम आहे. प्राचीन धर्मग्रंथांमध्ये कमरबंदला राजेशाही आणि दैवी कृपेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. बहुतेक वेळा देवता आणि राजे-महाराजे आपल्या भव्यतेचे प्रतीक म्हणून परिधान करत असत, असे ज्वेलर्सने सांगितले.

ते म्हणाले, “या पवित्र अलंकारातील हिऱ्यांचा वापर अतूट शक्ती आणि शाश्वत गुणांचे प्रतिनिधित्व करतो, तर माणिक प्रभू रामाचे धैर्य दर्शवते. ज्ञान आणि शांततेचे प्रतीक असलेले पाचू प्रभू रामाच्या बुद्धीला दर्शवतात आणि मोती पवित्रता दर्शवतात; यासह आध्यात्मिक आभा वाढवतात. या हारातील बारकाई अयोध्येच्या भव्य वास्तुकलेशी प्रेरित असून प्रभू रामाच्या राज्याचे वैभव आणि समृद्धी दर्शवते.”

बाजूबंद

प्रभू श्रीरामाच्या बाजूबंदाचे वजन सुमारे ४०० ग्रॅम असून शुद्ध पिवळ्या सोन्यात तयार करण्यात आले आहे. यासह त्यांच्या हातात सुंदर रत्नजडित बांगड्याही आहेत. याव्यतिरिक्त, प्रभू श्रीरामाच्या बोटांमध्ये अंगठी आहे, ज्याला मुद्रिकाही म्हणतात. ही अंगठीही रत्नजडित आहे.

प्रभू श्रीरामाच्या डाव्या हातात मोती, माणिक आणि पाचूंनी सजवलेले सोन्याचे धनुष्य आहे, तर उजव्या हातात सोन्याचा बाण आहे.

पैंजण

प्रभू श्रीरामाचे पैंजण सुमारे ४०० ग्रॅम वजनाचे आहे. या पैंजणावर माणिक आणि हिरे जडलेले आहेत. यासोबतच आणखी एक पैंजण आहे, जे २२ कॅरेट सोन्यात बनवण्यात आले आहे, ज्याचे वजन अंदाजे अर्धा किलो आहे. प्रभू श्रीरामाची समृद्धता आणि दैवी कृपा दर्शवण्यासाठी प्रत्येक दागिना काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे.

या सर्व दागिन्यांची जबाबदारी कोणाला देण्यात आली होती?

प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीने परिधान केलेले सर्व दागिने हरसहायमल श्यामलाल ज्वेलर्स (एचएसजे) द्वारे तयार करण्यात आले आहेत. या प्रसंगी बोलताना, लखनौच्या ज्वेलर्सनी न्यूज१८ ला सांगितले की, “या प्रकल्पासाठी निवड झाल्याबद्दल आम्ही खरोखरच सन्मानित आणि धन्य झालो आहोत. स्वत: श्रीरामलल्ला यांच्यासाठी दागिने तयार करण्याची संधी मिळणे हे आमचे सौभाग्य आहे.”

हेही वाचा : ‘मेटा’वर दररोज एक लाख मुलांचे होते लैंगिक शोषण; तुमची मुले सुरक्षित आहेत का?

या ज्वेलरी फर्मची स्थापना १८९३ मध्ये झाली होती. १३० वर्षांपासून हे ज्वेलर्स व्यवसायात आहेत. श्रीरामाच्या मूर्तीचे दागिने अध्यात्म रामायण, वाल्मिकी रामायण, रामचरितमानस आणि अलवंदर स्तोत्रम यांसारख्या ग्रंथांच्या संशोधन आणि अभ्यासानंतरच तयार करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special jwellery worn by shri ram in ayodhya rac