ज्ञानेश भुरे
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये अलीकडे स्पिन सर्व्हिसची जोरदार चर्चा आहे. या नव्या पद्धतीचा सर्व्हिसमध्ये सर्रास वापर केला जात आहे. मात्र, ही सर्व्हिस प्रतिस्पर्धी खेळाडूस गोंधळात टाकणारी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने अशा प्रकारची सर्व्हिस करण्यावर तात्पुरते निर्बंध आणले आहेत. स्पिन सर्व्हिस म्हणजे नेमके काय आणि त्यावर बंदी घालण्याचे नेमके कारण काय या विषयाचा घेतलेला हा आढावा.
स्पिन सर्व्हिस म्हणजे नेमके काय आणि कुणी प्रचलित केली?
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये सध्या स्पिन सर्व्हिसची चांगली हवा आहे. बॅडमिंटनला नवा चेहरा देणारी आणि परतविण्यात अशक्य असणारी म्हणून स्पिन सर्व्हिसकडे बघितले जाते. या सर्व्हिसचे तंत्र अवगत केलेले काही खेळाडू याकडे हुकमी अस्त्र म्हणून बघतात. खेळात बदल घडायला वेळ लागला, पण स्पिन सर्व्हिसची विविध तंत्रे झटपट लोकप्रिय झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर डेन्मार्कच्या मार्कस रिंडशोजने पोलंड खुल्या स्पर्धेत सर्वप्रथम याचा वापर केला. पण, याची खरी सुरुवात कोरियन लीगमध्ये कोरियाचा दुहेरीचा खेळाडू चोई सोल ग्यु याने केली.
विश्लेषण: बॅडमिंटनला ‘पूना गेम’ म्हणून का ओळखतात?
स्पिन सर्व्हिसचे नेमके तंत्र काय आहे?
आंतरराष्ट्रीय स्तरावर रिंडशोजने प्रसिद्ध केलेल्या स्पिन सर्व्ह मध्ये शटलचा रॅकेटशी संबंध येण्यापूर्वी ते फिरवले जाते. थोडक्यात, शटल पिसांच्या बाजूने अंगठा आणि मधल्या बोटात पकडले जाते. रॅकेटशी संपर्क येताना ते फिरवले जाते. त्यामुळे शटलला हलकासा झटका बसतो. रॅकेटशी संपर्क आल्यावर शटल फिरते आणि अगदी नेट जवळ प्रतिस्पर्धी खेळाडूच्या पुढ्यातच पडते किंवा ते शटल परतवणे अवघड होते. अर्थात, अशा सर्व्हिसमध्ये वेगावर नियंत्रण राखण्याचे आव्हान सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूवरही असते.
स्पिन सर्व्हिस परतवणे कठीण का?
नेहमीच्या सर्व्हिसमध्ये शटल प्रतिस्पर्धी खेळाडूकडे बरोबर कॉर्कच्या बाजूने येते. पण, स्पिन सर्व्हिसमध्ये ते एखाद्या वादळासारखे फिरत येते. त्यामुळे सर्व्हिस घेणाऱ्या खेळाडूकडे शटल लवकर मारायचे किंवा वेग कमी होईपर्यंत अखेरच्या सेकंदापर्यंत थांबणे असे दोनच पर्याय उपलब्ध असतात. या दोन्ही पद्धतीने सर्व्हिस परतवताना खेळाडूला नेमकी जागा शोधून फटका मारण्यावर बऱ्याच मर्यादा पडतात.
विश्लेषण: स्टारबक्स- ‘इट स्टार्ट्स विथ युवर नेम’; नेमका वाद आहे तरी काय?
अशा प्रकारच्या सर्व्हिसवर निर्बंध घालण्याचे नेमके कारण काय?
बंदीमागील मुख्य मुद्दा म्हणजे एक टेलिव्हिजन खेळ म्हणून बॅडमिंटनच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बॅडमिंटनमध्ये दुहेरीचे खेळ लक्षवेधक असतात. दुहेरीतल्या वेगवान रॅलीज आणि नेटवरील खेळाडूंचे कसब सगळे नेत्रदीपक असते. त्यामुळे खेळ लांबतो. एक दर्जेदार आक्रमण, प्रतिआक्रमण बघायला मिळते. पण, स्पिन सर्व्हिसमुळे खेळातील हा वेगच निघून जाईल. सर्व्हिस घेण्यातच कठीणता असल्यामुळे सामने झटपट संपू शकतात. अर्थात, हा चर्चेचा विषय आहे. यावर अनेक मतमतांतरे असू शकतात. स्पिन सर्व्हिस ही एक कला आहे. त्यासाठी कौशल्य आवश्यक आहे. त्याचे तंत्र नेमके अवगत होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हे निर्बंध तात्पुरत्या प्रकारचे घालण्यात आले आहेत. जागतिक महासंघाच्या बैठकीत यावर निर्णय अपेक्षित आहे.
बॅडमिंटन नियमात अशी सर्व्हिस कायदेशीर ठरू शकते का?
स्पिन सर्व्हिसवर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेने आणलेले निर्बंध हे तात्पुरते आहेत. अजून तसा नियम केलेला नाही. टेनिसमध्ये सर्व्हिस एक प्रमुख अस्त्र असते. वेगवान आणि ताकदवान सर्व्हिस करणारे अनेक विशेषज्ञ खेळाडू आहेत. पण, बॅडमिंटनमध्ये अजून सर्व्हिस हे आक्रमण करणारे शस्त्र म्हणून प्रचलित नाही. खेळाडू विजयासाठी केवळ सर्व्हिसवर अवलंबून राहू शकत नाहीत. त्यामुळे अशी सर्व्हिस नियमात बसणे कठीण आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर विचारांचा ऊहापोह होईल.