मनुष्याचं मन आणि मेंदू या दोन गोष्टी सोडल्या तर जगातील प्रत्येक गोष्टीचं उत्तर विज्ञानाकडे आहे. मनाचा विचार बाजूला ठेवला तरी मेंदू हा एक असा मानवी अवयव आहे ज्याबद्दल अजूनही वैज्ञानिकांना पुरेशी माहिती नाही. असं म्हणतात की माणूस हा त्याच्या मेंदूचा १०% वापर करतो आणि जर त्याने या मेंदूचा १००% वापर केला तर तो अशक्य गोष्टीही करू शकतो, असं झालं तर मनुष्य आणि परमेश्वर यांच्यात काहीच अंतर राहणार नाही. अर्थात या सगळ्या थिअरीला अजून कसलीच पुष्टी मिळालेली नाही. अजूनही यावर संशोधन सुरूच आहे.
केमिकल लोचा हा शब्द आपण मुन्नाभाईकडून शिकलो. पण हा केमिकल लोचा जसा मुन्नाभाईला सुतासारखा सरळ करू शकतो, तसंच तो माणसातील सर्वात क्रूर रूपसुद्धा जगासमोर आणू शकतो. आज आपण अशाच एका मनोरुग्णाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने ८० आणि ९० च्या दशकात अमेरिकेतील कित्येकांची झोप उडवली होती. मनोरुग्ण, सायको किलर हे शब्दही छोटे पडतील इतके भयावह अपराध याने अगदी कोवळ्या वयात केले आहेत. याचं नाव म्हणजे जेफ्री डॅमर. नुकतीच नेटफ्लिक्सवर याच्या कुकर्माला जगासमोर आणणारी वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळत असून, यामध्ये जेफ्रीने आजवर केलेल्या गुन्ह्याबद्दल या सीरिजमध्ये विस्तृतपणे भाष्य केलं आहे. ही सीरिज बघूनच कित्येकांची झोप उडेल याहून भयानक अपराध जेफ्रीने त्याच्या खऱ्या आयुष्यात केले आहेत.
आणखी वाचा : विश्लेषण : IMDb वरील चित्रपटांचं रेटिंग अचूक असतं का? जाणून घ्या कसं देतात रेटिंग
कोण होता जेफ्री डॅमर?
अमेरिकेच्या विस्कॉन्सिन या छोट्याश्या शहरात २१ मे १९६० रोजी जेफ्रीचा एका सर्वसामान्य अमेरिकन कुटुंबात जन्म झाला. सगळे लाडाने त्याला जेफ अशी हाक मारायचे. जेफ्रीच्या वडिलांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. शिवाय घरगुती हिंसाचाराचा जेफ्रीवर चांगलाच परिणाम झाला होता. वैज्ञानिक संशोधनाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला मरून पडलेला कुठलाही प्राणी, पक्षी किंवा जीव घरी आणून त्याला फाडून, त्याचे अवयव बघण्यात जेफ्रीला एक विचित्र आनंद मिळायचा. त्याच्या वडिलांनी या त्याच्या सवयीकडे कानाडोळा केला आणि इथूनच जेफ्रीच्या विकृतीत भर पडायला सुरुवात झाली. शाळा कॉलेजमध्ये असताना जेफ्री अगदी सामान्य मुलासारखा वागायचा, खोड्या टिंगल करण्यात तो माहिर होता.
जेफ्रीच्या गुन्ह्यांची सुरुवात :
वयाच्या केवळ १८ व्या वर्षी त्याने स्टीवन हिक्स नावाच्या व्यक्तीचा खून केला आणि नंतर मात्र जेफ्रीला याची चटकच लागली. तो समलैंगिक होता, त्यामुळे पुरुष आणि तरुण मुलं हे त्याच्यासाठी संधी होती. तो नजीकच्या बारमध्ये जाऊन मुलांशी ओळख करायचा, मैत्री करायचा, त्यांना घरी घेऊन यायचा, त्यांना पुन्हा दारू पाजायचा ज्यामुळे ती मुलं बेशुद्ध व्हायची आणि मग जेफ्री त्यांच्याबरोबर संबंध ठेवून त्यांना यमसदनी धाडायचा. जेफ्रीने आजवर कधीच कोणत्या मुलाशी शारीरिक संबंध ठेवले नसल्याचं तपासात कबूल केलं, त्याला फक्त त्या माणसांच्या मिठीत झोपायचं असायचं असं त्याने स्पष्ट केलं.
क्रूरतेची परिसीमा :
माणसांना घरात बोलवून, त्यांना बेशुद्ध करून, त्यांना मारणं इथवर जेफ्री थांबला नाही. तर लहानपणीची त्याची सवयही त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्या माणसांना मारल्यावर तो त्यांच्या मेंदूत ड्रिल मशीनच्या सहाय्याने भोकं पाडायचा. त्या माणसांच्या अवयवांची चिरफाड करायचा, इतकंच नाही तर त्यांचे काही अवयव तो चक्क खायचा आणि काही अवयव फ्रीजमध्ये जतन करून ठेवायचा. या अशा क्रूर पद्धतीने त्याने तब्बल १७ लोकांना मारल्याचं समोर आलं. त्या मृत व्यक्तींचे उरलेले अवयव तो घरातच अॅसिडमध्ये नष्ट करायचा आणि यामुळेच त्याच्या घरात कायम घाणेरडा वास यायचा. त्या मृत व्यक्तींचे अवयव खाण्याचा आणि जतन करून ठेवायची चटकच त्याला लागली होती.
आणखी वाचा : विवेक अग्निहोत्रींनी केलं बॉलिवूड पुरस्कारांवर टीका करणारं ट्वीट; हा रणवीर सिंगला टोला असल्याची चर्चा
अखेर जेफ्री पोलिसांच्या हाती लागला :
जेफ्री जेव्हा १८ व्या माणसाचा खुन करणार होता तेव्हा सुदैवाने तो माणूस जेफ्रीच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी ठरला आणि २२ जुलै १९९१ रोजी जेफ्री डॅमर पोलिसांच्या हाती लागला. जेव्हा पोलिसांनी डॅमरला अटक केली तेव्हा त्याच्या घरातील एका पिंपात अॅसिडमध्ये नष्ट झालेले काही लोकांचे अवयव, आणि फ्रीजमध्ये एका मृत व्यक्तीचं केवळ डोकं हाती लागलं आणि मग हळूहळू डॅमरच्या विकृतीबद्दल पोलिसांच्या तपासात गोष्टी उघड झाल्या. १५ लोकांच्या निर्घृण हत्येसाठी दोषी ठरवून न्यायालयाने डॅमरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि २८ नोव्हेंबर १९९४ या दिवशी या नरभक्षकाने पृथ्वीवर अखेरचा श्वास घेतला.