श्रीमद्भागवत कथावाचिका आणि मोटीव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांचे नाव देशभरात प्रसिद्ध आहे. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही त्यांच्या प्रवचनांचे आणि प्रेरणादायी भाषणांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रसिद्ध प्रवचनकार म्हणून त्यांचे नाव घरोघरी पोहोचले आहे. त्या आपल्या प्रेरणादायी भाषणांमधून साधी रहाणी आणि अलिप्ततेचा पुरस्कार करताना दिसतात. परंतु, नुकतंच त्यांच्याजवळ दोन लाखांहून अधिक किमतीची लक्झरी ‘डायर टोट बॅग’ पाहायला मिळाली. विमानतळावर जया किशोरी लक्झरी टोट बॅग हातात घेऊन दिसल्या. त्यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यांनी वापरलेल्या लक्झरी बॅगवरून लोक का संतापले? कोण आहेत जया किशोरी? जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाईच्या कातड्याची दोन लाखांची बॅग?

जया किशोरी लक्झरी टोट बॅगसह दिसल्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला. डायरच्या वेबसाइटनुसार, ही टोट बॅग कापसापासून तयार केली आहे. त्याचे आवरण कापूस आणि वासराच्या कातडीपासून तयार करण्यात आले आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने ‘एक्स’वर लिहिले, “आध्यात्मिक उपदेशक जया किशोरी यांनी त्यांचा २,१०,००० किमतीची टोट बॅग घेऊन जात असणारा व्हिडीओ हटवला आहे. त्या साध्या राहणीमानाचा उपदेश देतात आणि स्वतःला भगवान कृष्णाची भक्त म्हणवतात. डायर गाईच्या कातडीचा वापर करून बॅग तयार करते आणि तीच बॅग या वापरतात.”

हेही वाचा : फटाक्यांचा धूर फुप्फुस आणि हृदयासाठी किती घातक? फटाक्यांमधील हानिकारक घटक कोणते?

दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, “आपल्याला आपले योग्य मार्गदर्शक निवडावे लागतील. त्या जे उपदेश करतात ते जर कोणी पाळत नसेल तर त्या योग्य मार्गदर्शक नाहीत.” काहींनी जया किशोरी यांनी परिधान केलेल्या इतर लक्झरी वस्तूंकडेही लक्ष वेधले. नेटकर्‍यांनी त्यांची रोलेक्स घड्याळ, त्यांचे शिकवणी वर्ग आणि त्यांच्या जीवनशैलीवरदेखील प्रश्न उपस्थित केले. परंतु, अनेकांनी जया किशोरी यांची बाजू घेतली. “त्या कथावाचक आहेत, संन्यासी नाही,” असे एका वापरकर्त्याने लिहिले.

(छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

कोण आहेत जया किशोरी?

जया किशोरी यांचा जन्म १३ जुलै १९९५ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण कोलकाता येथेच पूर्ण केले आणि नंतर ओपन स्कूलिंगद्वारे बी.कॉम केले, अशी माहिती ‘इंडिया टाइम्स’च्या वृत्तात दिली आहे. त्यांना सुरुवातीला नृत्यकलेत आवड होती. ‘आज तक’च्या वृत्तानुसार त्या ‘बूगी वूगी’ या रिॲलिटी शोमध्येदेखील आल्या होत्या. मात्र, वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला आणि त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. त्यांच्या आठवडाभर चालणार्‍या ‘श्रीमद भागवत गीता’ कथा आणि ‘कथा नानी बाई रो मायरो’ नावाच्या तीन दिवसीय कथेसाठी त्यांना ओळख मिळाली. किशोरी यांना मार्च २०२४ मध्ये सामाजिक बदलासाठी राष्ट्रीय निर्माते पुरस्कार मिळाला. हा सरकार-समर्थित पुरस्कार पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

भगवान कृष्णावरील भक्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जया किशोरी यांनी यूट्यूबवर त्यांच्या भजनांद्वारे लोकप्रियता मिळवली. यूट्यूबवर त्यांचे अंदाजे ३.६१ दशलक्ष फोलोवर्स आहेत. ‘शिवस्तोत्र’, ‘मेरे कान्हा’ आणि ‘साजन मेरा गिरधारी’ ही त्यांची लोकप्रिय भजनं आहेत. जया किशोरी यांना त्यांच्या पिढीतील ‘मीराबाई’ म्हणूनही संबोधले जाते. अनुयायी त्यांना आपुलकीने ‘किशोरी जी’ म्हणतात. त्या अध्यात्म, धर्म, जीवन-प्रशिक्षण आणि नातेसंबंधांवर चर्चा करणाऱ्या पॉडकास्टवर वारंवार दिसून येतात.

(छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

हेही वाचा : डिजिटल अटक ते रोमान्स स्कॅम : ऑनलाइन घोटाळ्यांना लोक कसे बळी पडत आहेत? काय आहेत फसवणुकीचे नवीन प्रकार?

त्यांचे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत, इन्स्टाग्रामवर त्यांचे १२.३ दशलक्ष आणि फेसबुकवर ८.९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ‘न्यूज १८’नुसार, त्या त्यांच्या प्रत्येक कथावाचन कार्यक्रमासाठी नऊ लाख रुपये घेतात. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, “मी शुल्क आकारते हे खरे आहे, पण मी माझ्या टीममधील अनेकांना पगार देते. विविध ठिकाणी कथावाचन करणे माझ्या टीमशिवाय शक्य नाही.” अभौतिकता आणि निस्वार्थीपणाला प्रोत्साहन देत असणार्‍या जया किशोरी यांची एकूण संपत्ती १.५ कोटी ते दोन कोटी रुपये आहे, असे अमर उजालाच्या वृत्तात सांगण्यात आले आहे. वृत्तात असाही दावा करण्यात आला आहे की, त्यांनी त्यांच्या फीपैकी निम्मी रक्कम नारायण सेवा संस्थेला दान केली आहे. ही संस्था वंचित आणि अपंग मुलांना मदत करते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiritual leader jaya kishori spotted with rs 2 lakh dior bag rac