सध्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ सुरू असून, संपूर्ण जग त्यातील खेळांचा आनंद लुटत आहे. या ऑलिम्पिकमध्ये ३२ प्रकारचे खेळ समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये टेनिस, व्हॉलीबॉल, सॉकर, तसेच कुस्ती, अॅक्वाटिक्स, जिम्नॅस्टिक्स व सायकलिंगचेही विविध प्रकार आहेत. ऑलिम्पिकमध्ये बऱ्याचदा काही नवे खेळ समाविष्ट केले जातात; तर काही जुने खेळ काढूनही टाकले गेले आहेत. आपण आता अशाच पाच खेळ प्रकारांची माहिती घेणार आहोत, ज्यांना ऑलिम्पिकमधून काढून टाकण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : तब्बल ४० वर्षांनी पुन्हा गगनभरारी घेणार भारतीय व्यक्ती; कोण आहेत शुभांशू शुक्ला?

लाइव्ह पीजन शूटिंग (१९००)

लाइव्ह पीजन शूटिंग म्हणजेच उडत्या कबुतरावर नेम धरून त्याची शिकार करणे होय. हा खेळ पहिल्यांदा आणि शेवटचाही पॅरिस ऑलिम्पिकमध्येच समाविष्ट करण्यात आला होता. १९०० सालचे ऑलिम्पिक पॅरिसमध्येच पार पडले होते. त्या ऑलिम्पिकमध्ये हा खेळ समाविष्ट करण्यात आला होता. या खेळामध्ये जिवंत कबुतरांना आकाशात सोडले जायचे आणि खेळाडूंना या उडणाऱ्या कबुतरांपैकी जास्तीत जास्त कबुतरांची शिकार करावी लागायची. ऑलिम्पिकमधील या खेळामध्ये जवळपास ३०० कबुतरे मारली गेली होती. बेल्जियमच्या लिओन डी लुंडेन या खेळाडूने या खेळात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये ऑलिम्पिकमधील अधिकाऱ्यांनी निशाणी साधण्यासाठी जिवंत लक्ष्यांचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी मातीच्या कबुतरांचा वापर सुरू केला. ही मातीची कबुतरे वेगवेगळ्या वेगाने व उंचीवर लक्ष्य म्हणून हवेत फेकली जायची आणि खेळाडूंना त्यांचा वेध घ्यावा लागायचा.

हॉट एअर बलूनिंग (१९००)

हॉट एअर बलूनिंग हा प्रात्यक्षिक खेळ म्हणून सादर करण्यात आला. या क्रीडाप्रकाराच्या अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा अनेक महिने चालल्या. १९०० साली झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हा खेळप्रकार समाविष्ट करण्यात आला होता. या खेळप्रकारात सहभागी खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये एकमेकांशी स्पर्धा केली होती. त्यामध्ये किती अंतर चालवले, किती उंची गाठली आणि बलून म्हणजेच फुग्यामधून घेतलेला सर्वोत्कृष्ट फोटो अशा निकषांवर विजेते ठरविण्यात आले होते. फ्रेंच बलूनिस्ट हेन्री डी ला वॉलक्सने पॅरिसपासून पोलंडपर्यंत म्हणजेच तब्बल ७६८ मैलांपर्यंत फुगा उडवून अंतराची शर्यत जिंकली होती. पोलंड त्यावेळी रशियाचा भाग होता. जेव्हा हा खेळाडू खाली उतरला तेव्हा रशियन पोलिसांनी त्याच्याकडे पासपोर्टची मागणी केली आणि त्याच्याकडे पासपोर्ट नसल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

टग-ऑफ-वॉर (१९०० ते १९२०)

टग-ऑफ-वॉर अर्थात रस्सीखेच हा खेळ १९०० ते १९२० या दरम्यानच्या पाच ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आला होता. या खेळाच्या नियमांनुसार दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी आठ खेळाडूंचा समावेश होता. विरोधी संघाला सहा फुटांपर्यंत खेचून आणण्याचा ज्या संघाचा प्रयत्न यशस्वी होईल, तो संघ विजयी घोषित केला जायचा. जर दोन्हीही संघ हा निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरले, तर पंचांकडून पुन्हा पाच मिनिटांचा कालावधी दिला जायचा. त्यातही एकाही संघाला विरोधी संघाला सहा फुटांपर्यंत खेचण्याचा निकष पूर्ण करता आला नाही, तर ज्या संघाने विरोधी संघाला सर्वाधिक खेचण्यात यश मिळवले आहे, त्याला विजयी घोषित केले जायचे. १९०८ ऑलिम्पिक खेळांचे आयोजन लंडनमध्ये करण्यात आले होते. तेव्हा रस्सीखेच खेळावरून वादही झाला होता. ब्रिटिश खेळाडूंनी पायांमध्ये नेहमीपेक्षा अधिक वजनदार बूट घातल्याचा आरोप इतर संघांतील खेळाडूंनी केला होता. या वजनदार बुटांमुळे त्यांना खेचणे अवघड जात असून हे नियमांच्या विरोधी आहे, असे इतर संघांतील खेळाडूंचे म्हणणे होते.

हेही वाचा : विश्लेषण: महिलांच्या विभागात ‘पुरुष’ बॉक्सर? ऑलिम्पिकमध्ये या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद काय आहे?

प्लंज फॉर द डिस्टन्स (१९०४-१९०८)

प्लंज फॉर द डिस्टन्स हा पोहण्याशी संबंधित खेळप्रकार होता; मात्र त्यात पोहणे अपेक्षित नव्हते. या खेळप्रकारामध्ये खेळाडूला स्वीमिंग पुलामध्ये उडी घ्यावी लागायची आणि त्याने शरीर अजिबात न हलवता, शक्य तितक्या दूरवर पोहणे अपेक्षित असायचे. ६० सेकंद उलटल्यानंतर पंचांकडून अंतराचे मोजमाप केले जायचे.

रनिंग डीअर शूटिंग (१९०८-१९२४)

रनिंग डीअर शूटिंग असे या खेळप्रकाराचे नाव असले तरीही यामध्ये कोणत्याही जिवंत हरणाचा समावेश नसायचा. खेळाडूंना लाकडी हरणांवर निशाणा धरावा लागायचा. हे लाकडी हरीण रेल्वेच्या एका डब्यावर बसवले जायचे. लक्ष्य म्हणून हे हरीण १०० मीटर दूरवर ठेवलेले असायचे. या लाकडी हरणावर निशाणा साधण्यासाठी खेळाडूंना फक्त चार सेकंदे दिली जायची. १९२० च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये स्वीडनचे खेळाडू ऑस्कर स्वान (वय ७२) यांनी या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्या ऑलिम्पिकमध्ये ते सर्वांत वयस्कर ऑलिम्पिक पदकविजेते ठरले होते.