अमोल परांजपे
चीनमधील स्पर्धेसाठी निघालेल्या ‘वुशू’ या मार्शल आर्ट प्रकारात भारतीय चमूतील अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूंना व्हिसाचा शिक्का न देता ‘स्टेपल्ड’ म्हणजे जोड व्हिसा देण्यात आला. याचा निषेध म्हणून भारताने आपला संपूर्ण संघच स्पर्धेतून माघारी घेतला. यामुळे जोड व्हिसा म्हणजे काय, चीनने केवळ तीन खेळाडूंसाठीच त्याचा वापर का केला, त्यावर भारताने एवढे संतप्त होण्याचे कारण काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ही घटना, त्यामागची कारणे आणि परिणामांचा वेध घेणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोड व्हिसा म्हणजे काय?

चीनमधील चेंगडू येथे जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ निश्चित झाला होता. संघातील खेळाडू, प्रशिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी चीनच्या दूतावासाकडे व्हिसासाठी रीतसर अर्जही केले. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत व्हिसा देण्यात आले नाहीत. खेळाडूंची पहिली तुकडी रवाना होण्यापूर्वी व्हिसा देण्यात आले, मात्र यातील तीन खेळाडूंना जोड व्हिसा देण्यात आला. चीनने असा भेदभाव करण्याचे कारण म्हणजे हे तिन्ही खेळाडू अरुणाचल प्रदेशातील आहेत. साधारणत: पारपत्रावर व्हिसाचा शिक्का मारला जातो. अन्य खेळाडूंच्या पारपत्रांवर शिक्के मारले गेले, मात्र नेमन वंगशू, ओनिलू तेगा आणि मेपंग लामगू या तिघांच्या पारपत्रावर शिक्का मारला गेला नाही. त्याऐवजी एका स्वतंत्र कागदावर व्हिसाचा शिक्का मारून नंतर हा कागद पारपत्रावर स्टेपल पिनच्या साहाय्याने चिकटविण्यात आला.

चीनने असे का केले?

अरुणाचल प्रदेश हे भारतातील राज्य असताना, तेथे भारतीय संविधानानुसार सरकार असताना, तेथील खासदार संसदेमध्ये प्रतिनिधित्व करत असतानाही हा भाग आपला आहे, असा विस्तारवादी चीनचा दावा आहे. या प्रदेशाचा उल्लेख चीनकडून ‘झांगनान’ किंवा ‘दक्षिण तिबेट’ असा केला जातो. त्यामुळे अरुणाचलच्या नागरिकांच्या अधिकृत पारपत्रावर चीनच्या व्हिसाचा शिक्का न मारण्याचा प्रकार चीनकडून कायम केला जातो. आता वुशूच्या खेळाडूंना जोड व्हिसा देऊन चीनने याची पुनरावृत्ती केली आहे. अरुणाचलवर हक्क सांगण्याचा चीनचा हा खोडसाळ प्रयत्न आहे. अरुणाचलच्या नागरिकांना, विशेषत: खेळाडूंना व्हिसा देताना चीनने २००९ सालापासून हा प्रकार सुरू केला आहे.

स्टेपल्ड व्हिसा म्हणजे काय? अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना चीनकडून तो का दिला जातो?

यावर भारताची प्रतिक्रिया काय?

अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असून यामध्ये कोणताही परकीय हस्तक्षेप मान्य करणार नाही, अशी भारताची ठाम भूमिका आहे. या वेळीही परराष्ट्र खात्याने चीनच्या राजदूतांना बोलावून तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. केवळ एवढ्यावरच न थांबता चेंगडूमधील स्पर्धांमधून केवळ हे तीन खेळाडूच नव्हेत, तर संपूर्ण भारतीय संघाने नाट्यमयरीत्या माघार घेतली. अरुणाचलचे खेळाडू शुक्रवारी चीनकडे प्रयाण करणार होते. त्याआधी तीन वुशूपटू, प्रशिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी गुरुवारी निघणार होती. त्यांचे विमान उड्डाण करण्याच्या अवघे काही तास आधी या संघाला विमानतळावर थांबविण्यात आले आणि केंद्र सरकारच्या आदेशाने भारताने स्पर्धेतून माघार घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले. चीनने केलेली कृती आणि त्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर या दोन्ही तशा बघायला गेल्या तर प्रतीकात्मक घटना आहेत. मात्र यामुळे चीनमध्ये होणाऱ्या अन्य महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांमध्येही भारतीय संघाला अशीच माघार घ्यावी लागणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

चीनमधील भावी स्पर्धांचे काय?

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चीनच्या हांगझू येथे १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ४० क्रीडा प्रकारांमध्ये आशियाई देशांचे खेळाडू यात दोन हात करतील. अलीकडच्या काळात आशियाई स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी उंचावली असून या स्पर्धेकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. कराटे, तायक्वांदो आणि स्केटबोर्डिंग या प्रकारांमध्ये अरुणाचलचे खेळाडू नामांकित झाले आहेत. अद्याप भारतीय संघ अंतिम झाला नसला तरी यातील बहुतांश खेळाडूंची निवड निश्चित मानली जात आहे. अशा वेळी चीनने पुन्हा एकदा जोड व्हिसाचे हत्यार उगारले, तर भारताची प्रतिक्रिया काय असेल, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मात्र या स्पर्धा आशियाई ऑलिम्पिक संघटना आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या अखत्यारीत येत असल्याने प्रत्येक खेळाडूला स्वतंत्र व्हिसा दिला जात नाही. त्याऐवजी निवड झालेले खेळाडू, पंच आणि अधिकाऱ्यांना मायदेशातून निघण्यापूर्वीच यजमान देशात राहण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे तेव्हा चीनला जोड व्हिसाचा खोडसाळपणा करण्याची संधी मिळणार नाही आणि परिणामी भारतालाही टोकाची प्रतिक्रिया व्यक्त करण्याची गरज उरणार नाही.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stapled visa issue between india and china affecting competitions print exp pmw
Show comments