स्टारबक्स ही कॉफीहाऊस क्षेत्रातील नावाजलेली कंपनी आहे. कॉफीसोबत विविध खाद्यपदार्थ व पेय विक्री ही स्टारबक्सची ओळख आहे. स्टारबक्सचा दुसरा परिचय भेटीचे आरामदायक ठिकाण म्हणूनही आहे.स्टारबक्सचा स्वतःचा चाहता वर्ग आहे. अनेक जण आपल्या रोजच्या कार्यालयीन कामांसाठीही या कॉफी हाऊसची निवड करतात. मीटिंग्ज, गप्पा, तसेच काहीजण अगदी फ्री- वायफायसाठी स्टारबक्स कॉफी हाऊसचा वापर करतात. त्यामुळेच त्याला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. असे असले तरी स्टारबक्सने भारतात नुकत्याच प्रदर्शित केलेल्या जाहिरातीचा अनेकांनी निषेध केलेला आहे. तसेच समाजमाध्यमांवर ‘बायकॉट स्टारबक्स’ अशी मोहीम सुरु केली होती. त्याचवेळी अनेकांनी मात्र या जाहिरातीला समर्थन दिल्याचेही चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर या जाहिरातीवरून नेमका वाद कशासाठी ? आणि का ? हे समजून घेण्याचा हा प्रयत्न.
या वादग्रस्त जाहिरातीचा नेमका विषय काय आहे?
टाटा स्टारबक्स प्रा.लिमिटेडने ‘इट स्टार्ट्स विथ युवर नेम’ ही नवीन मोहीम भारतात सुरू केली आहे. या मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी नुकतीच एक जाहिरात झळकली. या जाहिरातीत LGBTQIA समुदायातील कलाकारांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या जाहिरातीचे दिग्दर्शन हे गौरव गुप्ता यांनी केलेले आहे. तसेच ट्रान्सजेंडर मॉडेल आणि अभिनेत्री सिया या मुख्य भूमिकेत आहेत. जाहिरातीत वृद्ध जोडप्याने आपल्या मुलाच्या लिंग परिवर्तनाच्या घेतलेल्या भूमिकेवर भाष्य केलेले आहे. जाहिरातीच्या सुरुवातीला हे जोडपे आपला मुलगा अर्पित येण्याची वाट पाहताना दिसतात. मुलाच्या निर्णयावर त्याचे वडील नाराज असल्याचे तर आई समजुतीची भूमिका घेताना दाखविण्यात आले आहे. नंतरच्या भागात एक चिंताग्रस्त तरुण मुलगी त्या जोडप्याजवळ येते आणि त्यांच्या शेजारी बसते. तर ही मुलगी त्यांचा मुलगा अर्पितच असून ते आपल्या ट्रान्सजेंडर मुलीला पहिल्यांदा भेटत असतात. हा सगळा प्रकार पाहून वडील तिथून उठून ऑर्डर देण्यासाठी जातात. ते परत येतानाची परिस्थिती अवघडल्यासारखी असते परंतु त्याच वेळी काउंटरवरून आवाज येतो “अर्पितासाठी तीन कोल्ड कॉफी”. हे ऐकताच वडिलांनी तिचा स्वीकार केल्याचे समजते व सानंद आश्चर्य वाटते आणि कुटुंब पुन्हा एकत्र आल्याने सर्व भावूक होतात. हा जाहिरातीचा विषय साधा व सोपा वाटत असला तरी अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे.
आणखी वाचा: विश्लेषण : भारतीय संस्कृतीतील मातृसत्ताक कुटुंबपद्धती !
आक्षेप काय आहे ?
या जाहिरातीच्या माध्यमातून स्टारबक्स भारतीय संस्कृतीची प्रतिमा मालिन करत असल्याचा आरोप अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे. ‘ एक स्वागतार्ह, सर्वसमावेशक ब्रॅण्ड असल्याचा आणि आमच्या ग्राहकांच्या सोयीपेक्षा आमच्यासाठी काहीही महत्त्वाचे नाही असा संदेश या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे’ हे या कॉफी हाऊसच्या शृंखलेच्या मुख्य विपणन अधिकारी दीपा कृष्णन यांनी आधीच स्पष्ट केले होते. किंबहुना #‘इटस्टार्ट्सविथयुवरनेम’ #itstartswithyourname या हॅशटॅग खाली “तुम्ही कोण आहात हे तुमचे नाव ठरवते – मग तो अर्पित असो किंवा अर्पिता. स्टारबक्समध्ये, तुम्ही आहात तसे आम्ही तुम्हाला स्वीकारतो व तुमच्यावर प्रेम करतो. कारण आपण स्वतः असणे म्हणजे आपल्यासाठी सर्वकाही आहे.” असे स्टारबक्स इंडियाने पोस्ट केले आहे.
टीकेचा सूर कशाबद्दल?
या स्वीकृती आणि सर्वसमावेशकतेच्या जाहिरातीची अनेकांनी प्रशंसा केलेली असली तर दुसरीकडे, या जाहिरातीवर टीकाही होत आहे. ‘स्टारबक्स ही एक विदेशी कंपनी आहे. त्यांनी आमच्या देशांतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करू नये. आम्ही आमचे प्रश्न सांभाळण्यात सक्षम आहोत. पाश्चात्यांनी यात हस्तक्षेप टाळावा व कॉफी सर्व्ह करण्याचं फक्त काम करावं.’ अशा स्वरूपाचे संदेश स्टारबक्सला येत आहेत. काहींनी या जाहिरातीचा संबंध राष्ट्रवादाशीही जोडला आहे. ‘स्टारबक्स, तनिष्कसारख्या कंपन्या भारतीय राष्ट्रवादाचे मुद्दे पुढे करून जाहिरात करतात व प्रत्यक्ष डोनेशन हे वायर, हार्डवड, कॉर्नेल यांना देतात. त्यामुळे त्यांनी यासारखे विषय न हाताळलेले बरे’ या आशयाच्या प्रतिक्रियाही काहींनी नोंदविल्या आहेत. ‘भारतासारख्या अतिसंवेदनशील देशात अशा स्वरूपाचे मुद्दे हाताळणे, हा त्या मल्टिनॅशनल कंपनीचा मुद्दाम केलेला डाव असल्याची टीकाही स्टारबक्सवर होत आहे. तसेच भारत हा किती मागासलेल्या विचारांचा देश आहे हे दाखविण्याचा प्रयत्न या जाहिरातीतून केल्याचाही आरोपही होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्टारबक्सवर बंदी घालण्यात यावी अशीही मागणी आता पुढे आली आहे.
स्टारबक्स कॉर्पोरेशन मुळचे कुठले?
स्टारबक्स कॉर्पोरेशन ही मूलतः अमेरिकन कंपनी आहे. त्यांचे मुख्यालय सिएटल, वॉशिंग्टन येथे आहे. स्टारबक्स मूळतः ३० मार्च १०७१ रोजी सिएटल, वॉशिंग्टन येथे सुरू करण्यात आले होते. जेरी बाल्डविन, झेव्ह सिगल आणि गॉर्डन बोकर या तीन व्यावसायिक भागीदारांनी या कंपनीची स्थापना केली होती.
आणखी वाचा: विश्लेषण: भारताला मातृपूजेची तब्बल २६ हजार वर्षांची परंपरा !
भारतातील स्टारबक्स ही जाहिरात ‘यूके’ मधील झालेल्या कुप्रसिध्दीची भरपाई आहे का ?
स्टारबक्सने एका ट्रान्सजेंडर महिला कर्मचाऱ्याला हल्लीच कामावरून काढून टाकले. हा सगळं प्रकार भारतात नव्हे तर युरोपात घडला. ट्रान्सजेंडर महिला कर्मचाऱ्याने कॉफी हाऊसमध्ये आलेल्या महिला ग्राहकांसोबत वाद घातला होता. त्यानंतर या वादाचे चित्रीकरण करणाऱ्या पुरुषावर (कथित) हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे या ट्रान्सजेंडर महिला कर्मचाऱ्यावर ठोस कार्यवाही करत स्टारबक्सने तिला कामावरून कमी केले. हा सर्व प्रकार ३० एप्रिल २०२३ रोजी हॅम्पशायरमधील साउथॅम्प्टन फेरी टर्मिनलजवळील ग्लोबल कॉफी चेनच्या शाखेत घडला. या प्रकरणाची प्रसारीत ध्वनिमुद्रित क्लिप जवळपास एका मिनिटाची आहे. भांडणात ग्राहक महिला त्या कर्मचारी महिलेला तुमचे वागणे ‘रूड’ असल्याचे सांगते. कर्मचारी महिलेने “तुम्ही मला पुरुष म्हणत आहात, तुम्ही ट्रान्सफोबिक आहात येथून चालते व्हा असा प्रतिसाद दिलेला दिसतो. या भांडणाची क्लिप समाज माध्यमांवर प्रसारित होताच अनेक संमिश्र प्रतिक्रियांचा भडीमार झाला होता. ४० लाखांहून अधिक जणांनी ही क्लिप पाहिली. यानंतर अनेकांनी यूके येथील स्टारबक्सच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यात प्रसिद्ध ओली लंडन यांचाही समावेश होता. केवळ इतकेच नाही तर ट्रान्सजेंडर समुदायाच्या अस्तित्त्वावरच या प्रकारामुळे काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्टारबक्सने झाल्याप्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आणि अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही असेही नमूद केले होते. त्यामुळेच १० मे रोजी स्टारबक्सने प्रदर्शित केलेल्या जाहिरातीमुळे स्टारबक्स यूकेत झालेल्या प्रकरणाची भरपाई भारतात तर करत नाही ना ? अशी शंका काहींनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली.
भारतात राबविण्यात येणाऱ्या ‘इट स्टार्ट्स विथ युवर नेम’ मोहिमेची पाळेमुळे युरोपातच !
२०२० साली युरोपात ‘व्हॉट्स युअर नेम’ या नावाखाली स्टारबक्सने अशाच स्वरूपाची मोहीम राबवली होती. आलेल्या ग्राहकांना त्यांचे नाव विचारून त्यांचे नाव त्यांच्या कॉफी ग्लासवर लिहिण्यात येत असे. या मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी स्टारबक्सने त्यावेळी ही LGBTQIA समुदायाचा संदर्भ घेतला होता. ‘ग्राहकाचे नाव घेणे, ते कपवर लिहिणे आणि त्या नावाने हाक मारणे हे आमच्या स्वागताचे प्रतीक आहे. हा क्षण आमच्या येथे मिळणाऱ्या वेगळ्या अनुभवाचा आहे व तोच क्षण ग्राहक व आमचा बॅरिस्टा यांच्यात एक बंध निर्माण करतो’ असे स्टारबक्सकडून या मोहिमेचे समर्थन करताना सांगण्यात आले होते. ही स्वाक्षरी मोहीम ट्रान्सजेंडर आणि लैंगिक वैविध्य असलेल्या व्यक्तींना व्यक्तिमत्त्व उघडपणे व्यक्त करता यावे या साठी होती. स्टारबक्स त्यांना यासाठी एक सुरक्षित वातावरण प्रदान करते, असेही त्यावेळेस नमूद करण्यात आले होते.
स्टारबक्सच्या या पूर्वेतिहासाशीही काहींनी भारतातील प्रस्तुत जाहिरातीचा संबंध जोडला आहे!