Starlink Internet Price in India : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे. आज प्रत्येक कामासाठी इंटरनेटचा वापर केला जात आहे. मात्र, जसजशी इंटरनेटची मागणी वाढत गेली, तसतसे इंटरनेट पुरविणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या सेवांचे दरही वाढवले आहेत. असं असूनही देशातील बऱ्याच भागांत हायस्पीड इंटरनेट मिळत नाही, त्यामुळे मोबाइल कंपन्यांनी भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा आणण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी भारतीय एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन कंपन्यांनी ‘स्टारलिंक’ या कंपनीबरोबर करार केला आहे. दरम्यान, स्टारलिंकच्या इंटरनेट सेवेचा भारतीयांना कसा फायदा होणार? इंटरनेट स्वस्त होणार का? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
‘स्टारलिंक’ इंटरनेट सेवा कशी पुरवते?
स्टारलिंक ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील स्पेसएक्स द्वारे चालवली जाणारी एक उपग्रह इंटरनेट सेवा आहे. स्पेसएक्स ही एक खाजगीरित्या आयोजित रॉकेट आणि अंतराळयान कंपनी आहे. २००२ मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. पारंपरिक इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या मोबाइल टॉवर्स, भूमिगत फायबर केबलद्वारे ग्राहकांना इंटरनेट पुरवतात. मात्र, स्टारलिंक ही कंपनी ‘लो अर्थ ऑर्बिट’ उपग्रहांद्वारे ग्राहकांना सॅटेलाईट इंटरनेट सुविधा प्रदान करते. वापरकर्त्यांना इंटरनेट वितरीत करण्यासाठी ही कंपनी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांच्या नेटवर्कचा वापर करते.
आणखी वाचा : हृदयविकाराचा धोका टाळता येणार? या देशाने तयार केली लस; शास्त्रज्ञांचा दावा काय?
स्टारलिंक आणि त्याच्या योजना
स्टारलिंककडे सध्या सुमारे ७,००० उपग्रह कक्षेत आहेत. कंपनीचे १०० देशांमध्ये नेटवर्क असून सुमारे ४० लाख ग्राहक आहेत. भारताचा शेजारील देश भूतानमध्येही त्यांच्या सेवा आहेत. तथापि, स्टारलिंकला अद्याप भारतात नियामक मान्यता मिळालेली नाही आणि त्याबाबत सुरक्षेच्या चिंता आहेत. स्टारलिंकचे मुख्य उद्दिष्ट दुर्गम भागात हाय स्पीड इंटरनेट प्रदान करणे आहे. एलॉन मस्क हे स्पेसएक्सशिवाय टेस्ला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर) चे मालक आहेत. सध्या ते अमेरिकन प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
स्टारलिंक सध्या कुठे उपलब्ध आहे?
स्टारलिंक अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडसह अनेक देशांमध्ये आधीच उपलब्ध आहे. कंपनीने स्पेन, इटली व मेक्सिकोमध्येही आपल्या सेवांचा विस्तार केला आहे आणि त्यामुळे ग्रामीण व शहरी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये या सेवेचा लक्षणीय परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त बेल्जियम, आयर्लंड, स्वित्झर्लंड व डेन्मार्कसह पोर्तुगाल, ब्राझील, ऑस्ट्रिया व नेदरलँड्स या देशांमध्येही स्टारलिंकने प्रवेश केला आहे.
स्टारलिंकची सेवा तुम्ही कशी घेऊ शकता?
एलॉन मस्क २०२१ मध्येच भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्यास इच्छुक होते. परंतु, नियामक मंडळाच्या समस्यांमुळे त्यांचे काम लांबणीवर पडले. स्टारलिंक इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला ‘स्टारलिंक डिश’ आणि राउटरची आवश्यकता असेल, ही डिश जवळच्या स्टारलिंक सॅटेलाइट क्लस्टरशी आपोआप कनेक्ट होईल, यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय वापरकर्त्यांना हायस्पीड इंटरनेट मिळेल. विशेष म्हणजे दुर्गम भागात, हजारो फूट उंच आकाशात, धावत्या वाहनांमध्ये, समुद्रातील बोटींवर, स्टारलिंकचे इंटरनेट उपलब्ध असेल.
स्टारलिंकच्या इंटरनेटचा वेग किती असेल?
रिलायन्स जिओ आणि भारतीय एअरटेल या इंटरनेटसेवा पुरविणाऱ्या पारंपरिक कंपन्या भारताच्या शहरी भागात चांगली सेवा देतात. परंतु, ग्रामीण आणि दुर्गम भागात या कंपन्यांची फायबर कनेक्टिव्हिटी नाही. तसेच त्यांचे इंटरनेट खूपच संथ गतीने चालते. स्टारलिंक इंटरनेटच्या बाबतीत दोन्ही कंपन्यांना सहज मागे टाकते. स्टारलिंकच्या आगमनानंतर, भारतातील ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी बरीच मजबूत होऊ शकते, म्हणूनच या दोन्ही कंपन्यांनी स्टारलिंकबरोबर करार केला आहे.
हेही वाचा : विमानातील शौचालयांत कोणकोणत्या वस्तू आढळल्या? तुंबलेल्या टॉयलेटबाबत एअर इंडियाचा दावा काय?
स्टारलिंकचा भारतीयांना कसा फायदा होणार?
सध्या भारतातील अनेक गावे आणि लहान शहरे गरीब किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करीत आहेत, त्यामुळे लोकांना ऑनलाइन शिक्षण किंवा अगदी मूलभूत संप्रेषण यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. स्टारलिंकचे सॅटेलाइट इंटरनेट पारंपरिक ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जलद, विश्वासार्ह इंटरनेट सेवा पुरवू शकेल. स्टारलिंकच्या इंटरनेटचा स्पीड २५ एमबीपीएस ते ११० एमबीपीएसपर्यंत असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, स्टारलिंकची इंटरनेट सेवा विद्यमान कंपन्यांच्या इंटरनेटपेक्षा स्वस्त आहे की महाग असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
स्टारलिंक इंटरनेट सेवेची किंमत किती असेल?
भारतात अद्याप स्टारलिंकची इंटरनेट सेवा सुरू झालेली नाही, पण भूतानमधील स्टारलिंक सेवांच्या किमतींवरून भारतात त्याची किंमत किती असू शकते याचा अंदाज लावता येतो. भूतानमध्ये स्टारलिंकच्या इंटरनेट सेवेचा सर्वात कमी मासिक प्लॅन तीन हजार भूतानी चलन आहे. भारत आणि भूतानच्या चलनांचे मूल्य समान आहे. टेलिकॉम मार्केटतज्ज्ञांचा अंदाज आहे की, भारतातील स्टारलिंक सेवेची किंमत प्रतिमाह ३५०० ते ४५०० रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसोबतच्या करारामुळे ते स्वस्त होऊ शकते.