सध्या देशभरामध्ये हनुमान चालिसाची चर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये तर हनुमान चालिसा हा मागील काही दिवसांपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेला विषय ठरतोय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्यावरुन शुक्रवार आणि शनिवारी मुंबईतील राजकारण चांगलेच तापले. या प्रकरणात आता राणा दांपत्याला कोठडीची हवा खावी लागली आहे. मात्र महाराष्ट्रात अचानक चर्चेत आलेली हनुमान चालिसा हे जगभरात सर्वाधिक रोज पठण होणाऱ्या धार्मिक पुस्तकांपैकी एक आहे. या चालिसाची कथा आणि इतिहासही फारच रंजक आहे. हनुमान चालिसा मूळ अवधी भाषेत लिहिण्यात आलेली. नंतर तिचं अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं.
लाखो लोक रोज करतात पठण
हनुमान चालिसा ही भगवान हनुमानाची प्रार्थना करण्यासाठी वापरण्यात येणारी पुस्तिका आहे. चालिसाचा अर्थ ४० रचना. या रचनेमध्ये ४० छंद आहेत. दररोज जगभरातील लाखो हिंदू हनुमान चालिसाचं पठण करतात असं मानलं जातं. यामध्ये भगवान हनुमानाची क्षमता, प्रभू श्री रामांबद्दल असणारा भक्तिभाव आणि हनुमानाचे पराक्रमही यात कथन करण्यात आलाय. हनुमान चालिसा वाचल्याने जीवनातील सर्व समस्या आणि संकटं दूर होतात असं भक्त मानतात.
भगवान शिवाचा अवतार…
हनुमान चालिसा तुलसीदास यांनी लिहिलेली. त्यांनी रामचरितमानस लिहिलं. तसेच त्यांनीच हनुमान चालिसा रचली. ही रचना कशापद्धतीने आणि कोणत्या परिस्थितीत करण्यात आली याची कथाही रंजक आहे. हनुमान स्वत:ला प्रभू रामांचे सर्वात मोठे भक्त म्हणायचे. वेळोवेळी भगवान हनुमानाने हे सिद्ध सुद्धा केलं आहे. अनेक पुराण ग्रथांमध्ये आणि शैव परंपरेनुसार हनुमान स्वत: भगवान शिवाचा अवतार असल्याचं मानलं जातं.
अकबराने रचनाकार तुलसीदास यांना केलेलं कैद
असं म्हटलं जातं की, तुलसीदासांना हनुमान चालिसा लिहिण्याची प्रेरणा मुघल सम्राट अकबराने कैद केल्यानंतर मिळाली. अकबराने तुलसीदास यांना दरबारामध्ये बोलावून घेतलं. त्यावेळेस तुलसीदास यांची भेट अब्दुल रहीम खान-ए-खाना आणि तोडरमल यांच्याशी झाली. बराच वेळ या तिघांमध्ये चर्चा झाली. त्यांना अकबरावर काही स्तुतीपर ग्रंथ लिहून घ्यायचे होते. तुलसीदास यांनी यासाठी नकार दिला. त्यानंतर तुलसीदास यांना अकबराने कैद केलं.
प्रभू रामांना भेटण्याची इच्छा अकबराने केली व्यक्त
पारंपरिक मान्यतांनुसार तुलसीदास हे चमत्कारिकरित्या कैदेतून मुक्त झाले. फतेहपुर सिक्री जिथे तुलसीदास यांना कैद करुन ठेवल्याचं मानलं जातं, तेथील लोकांच्या मानण्यानुसार तसेच वाराणसीमधील पंडितांच्या सांगण्यानुसार एकदा अकबराने तुलसीदास यांना दरबारामध्ये बोलावून घेतलं. प्रभू रामांना भेटण्याची इच्छा अकबराने तुलसीदास यांच्याकडे व्यक्त केली. तेव्हा तुलसीदास यांनी भगवान श्रीराम केवळ त्यांच्या भक्तांनाच दर्शन देतात असं सांगितलं. हे ऐकताच तुलसीदास यांना अकबराने पुन्हा एकदा कैदेत टाकलं.
मोठ्या संख्येने आली माकडं अन्…
धार्मिक मान्यतेनुसार कैदेत असतानाच तुलसीदास यांनी अवधी भाषेत हनुमान चालिसा लिहिली. याच कालावधीमध्ये तुलसीदास यांना कैद करुन ठेवण्यात आलेल्या फतेहपुर सिक्रीच्या तुरुंगाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माकडं आली. या माकडांनी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. तेव्हा मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार अकबर बादशाहने तुलसीदास यांना तुरुंगामधून मुक्त केलं.
३९ रचनेमध्ये तुलसीदास यांचा उल्लेख…
भारतामधील हिंदी ऑनलाइन एनसायक्लोपीडिया असणाऱ्या भारत कोषमध्ये तुलसीदास हेच हनुमान चालिसाचे रचनाकार असल्याचं म्हटलंय. हनुमान चालिसाच्या ३९ व्या रचनेमध्ये तुलसीदास यांच्या नावाचाही उल्लेख आहे. मात्र काही हिंदी तज्ज्ञांच्या दाव्यानुसार ही रचना तुलसीदास यांची असली तरी हे तुलसीदास वेगळे आहेत.
अशीही एक दंतकथा आहे की आधी ही भगवान हनुमानाने ऐकली
तुलसीदास यांनी पहिल्यांदा हनुमान चालिसाचं पठण केलं होतं तेव्हा भगवान हनुमानाने स्वत: ती ऐकली होती असं म्हटलं जातं. हनुमान चालिसा सर्वात आधी हनुमानाने ऐकल्याचं मानणारेही अनेक भक्त आहेत. प्रसिद्ध कथेनुसार जेव्हा तुलसीदास यांनी रामचरितमानस वाचून संपवलं तेव्हा त्यांच्यासमोर बसलेले सर्व श्रोते निघून गेले होते. मात्र त्यांच्यासमोर एकच म्हतारा व्यक्ती बसला होता. ती व्यक्ती म्हणजेच भगवान हनुमान होते अशी दंतकथा प्रसिद्ध आहे.
हनुमान चालिसासंदर्भातील रंजक गोष्टी
– हनुमान चालिसाची सुरुवात दोन रचनांनी होते त्या दोन्हींचा पहिला शब्द ‘श्रीगुरु’ आहे. यामधील श्रीचा संदर्भ सीता मातेशी असून हनुमान त्यांना आपलं गुरु मानायचे.
– हनुमान चालिसाच्या पहिल्या १० रचनांमध्ये त्यांची शक्ती आणि ज्ञानाबद्दल सांगण्यात आलंय. तर ११ ते २० व्या रचनेमध्ये भगवान रामांची गाथा सांगण्यात आलीय. शेवटच्या रचनेमध्ये भगवान हनुमानाची कृपा आपल्यावर राहू देत अशी प्रार्थना करण्यात आलीय.
– इंग्रजीबरोबरच अनेक भारतीय भाषांमध्ये याचं भाषांतर करण्यात आलंय. गीता प्रेसच्या माध्यमातून हनुमाना चालिसा ही सर्वाधिक छापलेली पुस्तिका आहे.