savarkar attempted escape from ship : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (११ फेब्रुवारी) फ्रान्सच्या मार्सिले शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील या शहराच्या महत्त्वपूर्ण इतिहासाची आठवण करून दिली. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, “भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मार्सिले शहराचे विशेष स्थान राहिले आहे. वीर सावरकरांनी येथून इंग्रजांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मार्सिलेच्या नागरिकांनी व फ्रेंच आंदोलकांनी सावरकर यांना ब्रिटिशांच्या ताब्यात देऊ नये अशी भूमिका घेतली होती, मी त्यांचे आभार मानतो.” दरम्यान, सावरकरांना अटक का झाली होती, त्यांनी इंग्रजांच्या तावडीतून निसटण्याचा कसा प्रयत्न केला, हे जाणून घेऊ.
सावरकरांना इंग्रजांनी केली होती अटक
मार्च १९१० मध्ये विनायक दामोदर सावरकर यांना इंग्रजांनी लंडनमधून अटक केली होती. त्यांच्यावर राज्यविरोधी कृत्ये आणि नाशिक मॅजिस्ट्रेट ए.एमटी जॅक्सन यांच्या हत्येला मदत करण्याचा आरोप लावण्यात आला. एसएस मोरिया या व्यापारी जहाजातून त्यांना भारतात आणलं जाणार होतं. मात्र, त्याआधी सावरकरांनी इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन कोठडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, इंग्रजांचं व्यापारी जहाज १ जुलै १९१० रोजी लंडनहून निघालं होतं आणि एका आठवड्यानंतर ते मार्सिलेमध्ये पोहोचलं.
इंग्रजांच्या तावडीतून सावरकरांचा निसटण्याचा प्रयत्न
न्यायालयाच्या नोंदीनुसार, कोठडीत असलेल्या सावरकरांना इंग्रजांनी कडक सुरक्षेत ठेवलं होतं. कोणत्याही व्यक्तीला त्यांना भेटण्याची मुभा नव्हती. ८ जुलै १९१० रोजी सावरकरांनी इंग्रजांकडे शौचालयाला जाण्याची परवानगी मागितली. त्यानंतर त्यांनी शौचालयाचा दरवाजा आतून बंद केला आणि जहाजाच्या पोर्टहोलमधून समुद्रात उडी मारली. पोहता येत असल्याने अगदी सहजपणे सावरकर हे किनाऱ्यावर पोहचले.
आणखी वाचा : Phulmoni Das: १३ तासांच्या लैंगिक यातना; ‘ती’चा मृत्यू ठरला भारतीय संमती वयाच्या कायद्यासाठी निमित्त!
दरम्यान, समुद्रात धाडसी उडी घेऊन सावरकरांनी इंग्रजांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण युरोप हादरून गेलं. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. मात्र, फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं आणि क्रू मेंबर समजून जहाजाच्या रक्षकांच्या स्वाधीन केलं. दरम्यान, सावरकरांच्या पलायनामुळे फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटनमध्ये वाद निर्माण झाला, जो नंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (PCA) सोडवला. ब्रिटीश सत्तेविरुद्धच्या सावरकरांच्या संघर्षांची कहाणी जगाच्या कानाकोपर्यात पोहोचली.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात सावरकरांच्या खटल्याची सुनावणी
सावरकर यांच्यावरील आरोपांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला. न्यायालयासमोर हा प्रश्न होता की, ब्रिटिशांनी सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात द्यायचे की नाही. पीसीए वेबसाइटवरील खटल्यांच्या नोंदीमध्ये असं म्हटले आहे की, “सावरकरांना ब्रिटीश कोठडीत परत पाठवण्याच्या पद्धतीला फ्रेंच सरकारने मान्यता दिली नाही. त्यांना फ्रान्सकडे सुपूर्त करण्यात यावे, अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली. परंतु, सावरकर हे दोषी असून त्यांचे प्रत्यार्पण केले जाऊ शकत नाही, असं ब्रिटीश अधिकाऱ्यांनी सांगितलं. जहाज बंदरात असताना कैद्याच्या सुरक्षेसाठी केलेल्या व्यवस्था पाहता, फ्रेंच अधिकाऱ्यांना त्यांचे पलायन रोखणे बंधनकारक होते असा युक्तिवादही ब्रिटीश सरकारने केला.”
न्यायालयाने सावरकरांच्या खटल्यावर काय निकाल दिला?
२४ फेब्रुवारी १९११ रोजी सावरकरांवरील खटल्याचा निकाल देण्यात आला. त्यावेळी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, ब्रिटीश सरकारला सावरकरांना फ्रान्स सरकारकडे परत करण्याची आवश्यकता नाही. या घटनेत सहभागी झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं होतं, असं न्यायालयाने म्हटलं. त्यामुळे सावरकरांच्या अटकेत अनियमितता झाली असली तरी अशा अनियमिततेमुळे त्यांना फ्रेंच सरकारकडे परत करण्याची ब्रिटीश सरकारची कोणतीही जबाबदारी नाही, असंही आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वेबसाइटवर म्हटलं आहे.
यानंतर सावरकरांना भारतात आणण्यात आले आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. डिसेंबर १९१० आणि जानेवारी १९११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सावरकरांना २५ वर्षांच्या दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ४ जुलै १९११ रोजी त्यांना अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील सेल्युलर तुरुंगात सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
‘माझी जन्मठेप’ या आत्मचरित्रात सावरकरांनी काय म्हटलंय?
सावरकरांनी आपल्या समुद्रमार्गे पलायनाच्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांचे मराठी आत्मचरित्र ‘माझी जन्मठेप’मध्ये केला आहे. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर प्राध्यापक व्ही. एन. नाईक यांनी ‘The Story of My Transportation for Life’ या नावाने केले आहे. सावरकर लिहितात, “जेव्हा ब्रिटीश सैनिकांनी कैद्यांना अंदमानला नेले, तेव्हा मी मागे राहिलो. आपल्याबरोबर असं का घडलं असावं याचा मी विचार करीत होतो. त्यावेळी एक मोटारगाडी दाराशी आली आणि त्यामधून सार्जंटस खाली उतरले. मला कारमध्ये बसवण्यात आले आणि ते दोघेही माझ्यापाठीमागे बसले. दार बंद झाल्यानंतर कार सुसाट वेगाने निघाली.”
हेही वाचा : ‘या’ देशात तरुण-तरुणी लग्न करायला तयारच होईनात; काय आहेत कारणं?
सावरकरांना इंग्रजांकडून मोठी सुरक्षा
सावरकर पुढे लिहितात, “मला इतर कैद्यांप्रमाणे रस्त्यावरून नेण्यात आलं नाही, कारण अधिकाऱ्यांना भीती होती की, ज्या लोकांना माझ्या पलायनाची माहिती होती, ते लोक मला पाहण्यासाठी रस्त्यावर वेगवेगळ्या गटांमध्ये उभे होते. कारण मी मार्सिलेमधून पळून गेलेला गुन्हेगार होतो. कदाचित माझे सहकारी किंवा इतर विरोधक मला प्रवासादरम्यान पळवून नेऊ शकतात, असं इंग्रज अधिकाऱ्यांना वाटत होतं. माझ्या पायाखाली लँडमाइनचा स्फोट होऊ शकतो आणि मी अचानक गायब होऊ शकतो, अशीही त्यांना भीती होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव इंग्रज अधिकाऱ्यांनी मला वेगवेगळ्या मार्गाने कारमधून स्टेशनपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. मार्सिलेमधील चूक त्यांना पुन्हा करायची नव्हती.”
पलायनाचा प्रयत्न माझ्यासाठी फायदेशीर – सावरकर
‘माझी जन्मठेप’ या आत्मचरित्रात सावरकर लिहितात, “जेव्हा मला एका खास गाडीतून आणि विशेष बंदोबस्तात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं जात असे, तेव्हा माझे सहकारी कैदी माझ्याबद्दल खूप चांगले विचार करायचे. मार्सिलेमधून पळून जाण्याचा माझा प्रयत्न अखेर मला काहीतरी चांगला फायदा करून गेला. या प्रयत्नामुळे मला लांब प्रवासाचा आनंद घेण्यासाठी एक कार मिळाली, त्यामुळे या कैद्यांच्या मनात माझ्याबद्दल एक प्रकारचा आदर निर्माण झाला. याशिवाय मी बरोबर असो वा चूक, अधिकारी जितके जास्त मला कमी लेखण्याचा प्रयत्न करायचे, तितकाच जास्त आदर ते माझ्याबद्दल दाखवत असत”, असंही सावरकरांनी म्हटलं आहे.