श्वान हा सर्वांत इमानदार प्राणी मानला जातो. आपल्या मालकाच्या संरक्षणासाठी तो प्रसंगी स्वत:चा प्राणही देतो. मात्र महाराष्ट्रासह संपूर्ण देशात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भटक्या श्वानांकडून माणसांवरील हल्ल्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. काही ठिकाणी तर भटक्या श्वानांच्या हल्ल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देशात भटक्या श्वानांची काय स्थिती आहे? श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी प्रशासनाने काय करायला हवे? ही मोहीम राबवताना कोणत्या अडचणी येतात? हे जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला?

भटक्या श्वानांची संख्या, त्यांचा उपद्रव, हा उपद्रव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायोजना यांवर ‘लोकल सर्कल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात देशातील अनेक जिल्ह्यांत भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे, असे आढळून आले आहे. या सर्वेक्षणात एकूण ६१ टक्के लोकांनी भटक्या श्वानांकडून केले जाणारे हल्ले वाढले आहेत, असे मत मांडले आहे. हे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे.

हेही वाचा >>> थायलंडमध्ये राजकीय पक्षाने सेक्स टॉइज कायदेशीर करण्याचे आश्वासन का दिले?

‘लोकल सर्कल’च्या सर्वेक्षणात काय आढळले?

लोकल सर्कलद्वारे भटक्या श्वानांबाबत एकूण ५३ हजार लोकांचे मत जाणून घेण्यात आले. एकूण ३२६ जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. प्रश्न विचारलेल्यांमध्ये एकूण ६७ टक्के पुरुष तर ३३ टक्के महिला होत्या. तुमच्या परिसरात श्वानांचे मालक श्वानांना योग्य प्रशिक्षण देतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे एकूण १३ हजार ४६९ जणांनी उत्तर दिले. यांतील ३३ टक्के लोकांनी, श्वानांचे मालक त्यांच्याकडील पाळीव श्वानाला योग्य प्रशिक्षण देतात, असे सांगितले; तर २७ टक्के लोकांना वाटते की, श्वानांचे मालक श्वानांना योग्य ते प्रशिक्षण देत नाहीत.

प्रशासन त्यांची भूमिका चोखपणे बजावते का?

तुमच्या परिसरातील महानगरपालिका भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी चोख काम करते का? असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र १० पैकी आठ लोकांनी याचे नकारात्मक उत्तर दिले. भटक्या श्वानांची नोंद करण्यात तसेच त्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी ठरलेली आहे, असे बहुतांश लोकांना वाटते. स्वच्छ भारत योजनेंतर्गत केंद्र सरकारने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी निधी द्यावा का? असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. या कल्पनेचे एकूण ७१ टक्के लोकांनी स्वागत केले, तर २३ टक्के लोकांनी या कल्पनेला विरोध केला. सहा टक्के लोकांनी याबाबत निश्चित असे मत नोंदवले नाही.

हेही वाचा >>> विश्लेषण : वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांपेक्षा वंदे मेट्रो कशी वेगळी?, जाणून घ्या खासियत

भारतात श्वानांची संख्या किती आहे?

देशात सर्वाधिक भटके श्वान उत्तर प्रदेश, ओडिसा, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांत आहेत. शासकीय माहितीनुसार २०१९ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधी एकूण १६ दशलक्षांपेक्षा अधिक श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार देशात सध्या १० दशलक्ष श्वान आहेत.

श्वान आक्रमक का होतात? ते हल्ला का करतात?

भारतात श्वानांना मारण्यास परवानगी नाही. प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स अॅक्ट १९६० या कायद्यानुसार भटक्या श्वानांसह प्राण्यांची हत्या करणे बेकायदेशीर आहे. पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांना पाळणाऱ्या व्यक्तीची (मालकाची) असेल, असेही या कायद्यात सांगण्यात आलेले आहे. अॅनिमल बर्थ कंट्रोल (श्वान) रुल २००२ नुसार भटक्या श्वानांवरील नियंत्रणासाठी महापालिका जबाबदार आहेत. मात्र श्वानांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. याच कारणामुळे महापालिकांना श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यात म्हणावे तसे यश मिळालेले नाही.

हेही वाचा >>> ट्विटर ब्लू टिकचा घोळ; दिवंगत सेलेब्रिटी सुशांत सिंह राजपूत, लता मंगेशकर ब्लू टिकचे पैसे कोण देणार?

रेबीजमुळे भारतात ३६ टक्के मृत्यू

यावर दिल्लीमधील ऑल क्रिएचर्स ग्रेट अँड स्मॉल या संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त अंजली गोपालन यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “आपल्याकडे भटक्या श्वानांचा मुद्दा गंभीर आहे हे नाकारता येणारे नाही. मात्र आपल्याकडे रेबीज या आजारासंदर्भातही तशीच स्थिती आहे. त्यामुळे या दोन्ही अडचणींवर मात करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार जगात रेबीजमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३६ टक्के मृत्यू हे फक्त भारतात होतात.

पुरेसे अन्न न मिळाल्यास श्वान आक्रमक होतात

भटके श्वान का चावतात? तसेच त्यांच्या स्वभावाबद्दल दिल्लीमधील के-९ स्कूलचे संस्थापक अदनान खान यांनी ‘द क्वींट’शी बोलताना सविस्तर सांगितले आहे. “भटके श्वान शिकारीच्या शोधात असतात. पुरेसे अन्न न मिळाल्यास श्वान आक्रमक होतात, परिणामी ते लहान प्राण्यांची शिकार करतात. तर पाळीव प्राण्यांच्या बाबतीत वेगळी स्थिती असते. पाळीव श्वांनाना अन्न दिले जाते, त्यांना बाहेर फिरायला नेले जाते. त्यामुळे पाळीव श्वानांमध्ये शिकार करण्याची प्रवृत्ती तुलनेने कमी असते,” असे अदनान खान यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण: NCRT textbooks remove Darwin’s evolution theory डार्विनच्या सिद्धांतावरून नेमका वाद कशासाठी?

ज्या भागात अन्न मिळते, त्याच भागात वास्तव्य करतात

श्वानांना कमी किंवा प्रमाणापेक्षा जास्त अन्न देणे अडचणीचे ठरू शकते. “प्रमाणापेक्षा जास्त अन्न मिळाल्यानेही या भटक्या श्वानांवर वाईट परिणाम होतो. भटके श्वान अन्नाच्या शोधात २ ते ३ किलोमीटरपर्यंत प्रवास करतात. मात्र एकदा प्राणीप्रेमींकडून त्यांना अन्न मिळायला लागले की, ते हा प्रवास थांबवितात. ज्या भागात अन्न मिळते, त्याच भागात ते वास्तव्य करतात आणि त्या भागातील लोकांवर हल्ला करतात,” असे खान म्हणाले. त्यामुळे भटक्या श्वानांना स्वत:पासून दूर ठेवायचे असेल तर दोन ते तीन किलोमीटर दूर जाऊन त्यांना अन्न दिले पाहिजे, असेही खान यांनी सांगितले.

श्वानांना घरात बांधून ठेवू नये

१९९५ सालापासून श्वांनाना प्रशिक्षण देणारे देव रावत यांनीदेखील श्वानांच्या स्वभावाविषयी सविस्तर सांगितले आहे. “मुळात श्वानांना कमी अन्न मिळते. काही लोक आवड म्हणून श्वान पाळतात. मात्र कामामुळे किंवा इतर व्यापामुळे ते घरी पाळलेल्या श्वानाला घरातच डांबून ठेवतात. परिणामी पाळीव श्वानदेखील चिडचिड करायला लागतात. श्वानांना घरात बांधून ठेवणे हे एक श्वानदंशाचे महत्त्वाचे कारण आहे,” असेही देव रावत यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण: रानटी हत्ती गडचिरोलीत वारंवार का येताहेत?

श्वानदंश रोखण्यासाठी काय करायला हवे?

प्राण्यांची काळजी घेण्यासाठी देशात प्रभावी धोरणनिर्मिती आणि या धोरणाच्या अंमलबजावणीची गरज आहे. युद्धपातळीवर श्वानांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण करायला हवे. श्वानांशी कसे वागायला हवे? याचे अनेकांना ज्ञान नसते. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात रेबीजविरोधी मोहीम तसेच निर्बिजीकरणाची मोहीम राबविणे गरजेचे आहे. श्वानपालकांनी श्वानांना घरात डांबून ठेवू नये. जे श्वांनाची काळजी घेण्यास सक्षम नसतील त्यांनी श्वानांना रस्त्यावर सोडू नये, असे अॅनिमल इंडिया ट्रस्टचे संस्थापक आणि विश्वस्त पशुवैद्य सरुंगबम देवी यांनी सांगितले.

भटक्या श्वानांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गरणे अनिवार्य

भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे अनेकजण त्यांच्यावर हल्ला करतात. कांदीवलीतील असेच एक प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेले होते. या याचिकेवर न्यायालयाने नुकतेच महत्त्वाचा निकाल दिला आहे. भटक्या श्वानांना खाणे देण्यापासून रोखल्याबद्दल एका प्राणीप्रेमी व्यक्तीने कांदिवलीतील एका गृहनिर्माण संस्थेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका निकाली काढताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरएन लढ्ढा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने महत्त्वाचे मत व्यक्त केले होते. सोसायटीच्या वादात प्राण्यांना त्रास होऊ नये, तसेच सोसायटीतील रहिवाशांनी भटक्या श्वानांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गरणे अनिवार्य आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: जो बायडेन यांच्या अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवारीचा अर्थ काय?

न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवले?

कांदिवाली पश्चिम येथील आरएनए रॉयल पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड आणि या सोसायटीतील रहिवासी पारोमिता पूथरन यांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाने या याचिकांची दखल घेत भटक्या श्वानांबाबतची समस्या सौहार्दपूर्णपणे सोडवण्याचे आणि संस्थेच्या आवारात भटक्या श्वांनाना खाणे देण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. याचिकाकर्तीला भटक्या श्वांनाना पिण्याचे पाणी द्यायचे आहे. याबाबत दोन्ही पक्षकारांनी आपापसात वाद मिटवणे गरजेचे आहे. श्वानांना पिण्याचे पाणी दिले जात नाही. तसे व्हायला नको. उन्हाळा सुरू असल्यामुळे भटक्या श्वानांसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करणे हे सोसायटीचे कर्तव्य आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stray dog attack rise in india know what is reason what efforts have to made prd
Show comments