यंदाच्या पावसाळ्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याचा अंदाज आहे. कारण प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या ला निना, एल निनो आणि तटस्थ स्थिती अशा नैर्ऋत्य मोसमी पावसाशी संबंधित हवामान विषयक तीन प्रणाली अनुकूल राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?
जून ते सप्टेबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांत नैर्ऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०५ टक्के पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. १९७१ ते २०२० या काळातील हवामान विषयक नोदींनुसार देशात पावसाळ्यात सरासरी ८७ सेमी पाऊस पडतो. त्यात यंदा पाच टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. लडाख, ईशान्य भारत आणि तमिळनाडू वगळता देशाच्या अन्य भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याचा विचार करता, दक्षिण कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने गतवर्षी १०६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला होता. प्रत्यक्षात १०८ टक्के पाऊस झाला.
प्रशांत महासागरातील स्थिती परिणामकारक?
प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या ला निना, एल निनो आणि तटस्थ स्थिती अशा नैर्ऋत्य मोसमी पावसाशी संबंधित हवामान विषयक तीन प्रणाली महत्त्वाच्या असतात. ला निनाची स्थिती निर्माण होते म्हणजे प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ ते ०.९ अंश सेल्सिअसने कमी होते. अशी स्थिती निर्माण झाल्यास ला निना सक्रिय झाला, असे म्हटले जाते. या स्थितीमुळे बाष्पयुक्त वारे भारत आणि भारतीय उपखंडाच्या दिशेने येऊन चांगला किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. एल निनो स्थिती सक्रिय असली, की प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढून बाष्पयुक्त वाऱ्याचा भारताकडील प्रवाह कमकुवत पडून दुष्काळ किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण होते. यंदा तटस्थ स्थिती असल्यामुळे सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय ला निना सक्रिय नसला तरीही हवामान विषयक प्रणाली, वाऱ्याचा वेग, प्रवाह ला निना स्थितीसारखाच आहे. त्याचा फायदा मोसमी पावसाला होणार आहे.
हिंदी महासागरीय द्विध्रुविता
हिंदी महासागरातील द्विध्रुविता (आयओडी) हा मोसमी पावसावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. हिंदी महासागराचे दोन भाग पडतात, एक इंडोनेशिया बेटांना लागून असलेला पूर्व हिंदी महासागर व दुसरा मादागास्कर बेटाकडील पश्चिम हिंदी महासागर. या दोन्ही ठिकाणच्या समुद्रातील पृष्ठभागावरील पाण्याच्या तापण्यामुळे आयओडीची स्थिती निर्माण होते. त्याला भारतीय एल निनोदेखील म्हणतात. भारतीय मोसमी पावसाच्या अनियमिततेसाठी एल निनोप्रमाणेच आयओडीसुद्धा जबाबदार असतो. शिवाय तो भारतातील पावसावर सकारात्म किंवा नकारात्मक परिणाम करतो. तटस्थ स्थितीत ऑस्ट्रेलियाच्या वायव्य किनारपट्टीजवळ प्रशांत महासागरातून उबदार पाण्याच्या प्रवाहामुळे पूर्व हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त वाढते. पण, पूर्व व पश्चिम हिंदी महासागराच्या तापमानात फरक फारसा नसतो. त्याला तटस्थ स्थिती म्हणतात. अशा स्थितीत मोसमी पाऊस सामान्य पडतो.
युरोप, आशियातील हिमवृष्टीचा परिणाम काय?
हिवाळ्यात किंवा डिसेंबर ते मार्च या काळात युरोप, मध्य आशिया किंवा हिमालयीन परिसरात किती हिमवृष्टी होते, हे महत्त्वाचे ठरते. सरासरीपेक्षा जास्त हिमवृष्टी झाल्यास कमी पाऊस आणि सरासरीपेक्षा कमी हिमवृष्टी झाल्यास चांगला पाऊस असे समीकरण आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी हिमवृष्टी झाली आहे. त्यामुळे चांगल्या पावसाचा अंदाज आहे. भारत आणि उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, त्यावेळी दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. कमी हिमवृष्टी झाल्यास नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रवाह जोमदार असतो. आफ्रिकेपासून येणारे आणि विषववृत्तावर दिशा बदलून नैर्ऋत्य दिशेने भारतात येणाऱ्या वाऱ्याचा जोर वाढतो. त्यामुळे देशात मोसमी वारे वेगाने सक्रिय होऊन चांगली पर्जन्यवृष्टी होते. हे वारे हिंदी महासागरावरून येत असल्यामुळे बाष्पयुक्त हवा देशात घेऊन येतात. त्यामुळे आयओडी सक्रिय असल्यास तुलनेने चांगला पाऊस पडतो. यंदा नकारात्मक स्थिती नाही, तटस्थ स्थिती असल्यामुळे सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.
dattatray.jadhav@expressindia.comx