रसिका मुळय़े
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या स्वप्निल लोणकरच्या डिसेंबर २०२१ मधील आत्महत्येनंतरही उमेदवारांच्या आत्महत्येचे सत्र थांबलेले नाही. दोन दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मूळ परभणी येथील उमेदवाराने पुण्यात आत्महत्या केली. त्यापूर्वी जेमतेम आठवडाभर आधी बीड येथे एका उमेदवाराने आत्महत्या केली. असे का होते आहे?
जागा किती, स्पर्धक किती?
प्रशासकीय सेवेतील भरतीसाठी स्पर्धा परीक्षा राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येतात. त्यातील राज्यसेवा परीक्षा ही उमेदवारांच्या विशेष जिव्हाळय़ाची. अ आणि ब श्रेणीच्या पदांसाठी ही परीक्षा द्यावी लागते. दरवर्षी किती आणि कोणत्या पदांसाठी भरती होणार हे शासनाचे धोरण, रिक्त जागा यांनुसार ठरते. राज्यसेवेसह वर्षभरात आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांची पदसंख्या ही साधारण दहा ते बारा हजारांच्या घरात असते आणि परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या मात्र साडेतीन ते चार लाखांच्या घरात असते. यातून अडीच ते तीन टक्केच उमेदवारांची निवड होते.
स्पर्धा परीक्षांचे वेड का?
ढोबळ आढावा घेतल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अधिकांश उमेदवार मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांची स्थिती तुलनेने बरी असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांचे प्रमाण कमी दिसते. शहरे आणि कोकणात हे वेड आणखी कमी असल्याचे दिसते. मराठवाडा, विदर्भात महाविद्यालये, विद्यापीठांची संख्या अधिक असली तरी विद्यार्थ्यांना त्यांच्याच परिसरात रोजगाराच्या संधी कमी असल्याचे दिसते. त्यामुळेही शासकीय नोकरीसाठी तेथील पदवीधर धडपडत असल्याचे दिसते. शासकीय नोकरीतील शाश्वतता लग्नाच्या बाजारातही उमेदवारांच्या पथ्यावर पडते. त्यामुळेही ग्रामीण भागांत या परीक्षांचे वेड कायम आहे.
पर्यायाचा विचार का हवा?
स्पर्धा परीक्षांमधील अशाश्वतता, शासकीय पदभरतीसाठी असलेली मर्यादा याची जाण या परीक्षा देण्यापूर्वी उमेदवारांना असणे आवश्यक आहे. परीक्षेतील यश हे पैसे, प्रतिष्ठा आणि चांगले काम करण्याची संधी मिळवून देणारे असले तरी त्यापर्यंत पोहोचण्याची वाट ही तीव्र स्पर्धेमुळे सोपी नाही. अनेकदा उमेदवार पदवीचे शिक्षण घेताना परीक्षेची तयारी सुरू करतात. उपजिल्हाधिकारी होण्याचे उद्दिष्ट ठेवून तयारी करताना हळूहळू सर्व वर्गातील पदांच्या परीक्षा देऊ लागतात. या स्पर्धेत कधी थांबायचे याचे नियोजन उमेदवारांकडे असणे गरजेचे असते. गेली काही वर्षे अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसह इतर व्यावसायिक विद्याशाखांची पदवी घेतलेल्या उमेदवारांची संख्या वाढते आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेपासूनच स्पर्धा परीक्षांच्या साच्याशी ओळख झालेल्या उमेदवारांचे यशाचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसते. मात्र, स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश मिळाल्यास आणि कुठे आणि कधी थांबायचे याची जाणीव असल्यास उमेदवारांना त्यांच्या पदवीच्या आधारे पर्यायी वाट चोखाळण्याचा पर्याय असतो. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवीधरांसाठी स्पर्धा परीक्षांची वाट अधिक खडतर ठरते आहे. स्पर्धा परीक्षेसाठी असलेल्या वयोमर्यादेचा आणि संधींचा विचार केल्यास जवळपास ३५ ते ४० वर्षांपर्यंत उमेदवार स्पर्धा परीक्षांच्या मागे असल्याचे दिसते. आयुष्यातील सर्वाधिक कार्यक्षमता असलेला, स्थिर होण्याचा कालावधी परीक्षेच्या तयारीत गेल्यानंतरही हाती काही न लागल्यास उमेदवारांसमोर पुढे काय करायचे, असा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना पर्यायाचा विचारही अत्यावश्यक ठरतो.
धोरणांचा परिणाम कसा होतो?
दरवर्षी काढल्या जाणाऱ्या जाहिरातीत कोणत्या गटाच्या किती जागा असतील याचा ठरावीक साचा नाही. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत भरतीचे स्वरूप उमेदवारांच्या लक्षात येत नाही. त्यात परीक्षेची रचना, स्वरूप यांमध्ये बदल झाल्यास अनेक वर्षे तयारी करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नव्याने तयारी करावी लागते. उमेदवार अनेकदा राज्यसेवा आणि केंद्र स्तरावरील लोकसेवा परीक्षेची तयारी एकाच वेळी करत असतात. या दोन परीक्षांचा अभ्यासक्रम, रचना यांमध्ये मोठी तफावत असल्यास तेही उमेदवारांसाठी तणावपूर्ण ठरते. दरवर्षी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या लाखोंच्या घरात असताना तुलनेने परीक्षा काटेकोर, बिनचूक व्हाव्यात यासाठीचे नियोजनही तोकडे पडत असल्याची उमेदवारांची तक्रार आहे. एकेक गुण आयुष्याची गणिते बदलत असताना प्रश्नपत्रिकेतील चुका, चुकीच्या प्रश्नांच्या गुणदानाबाबतचे धोरण, न्यायालयीन प्रकरणांमुळे अडकणारे निकाल यांचा परिणाम उमेदवारांवर होतो. वर्षांनुवर्षे परीक्षांच्या तयारीचे गणित चुकते आणि उमेदवार निराश होतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे अनेक विषय प्राथमिक पातळीवर तयार होत असतात. मात्र, त्यांना दुसऱ्या क्षेत्रात जायचे असल्यास त्याच्या स्वतंत्र परीक्षा द्याव्या लागतात. अनेक वर्षे तयारीसाठी अभ्यास केलेल्या परंतु नोकरीची संधी न मिळालेल्या उमेदवारांसाठी सद्य:स्थितीत कोणत्याही पातळीवर कसलेही धोरण नाही.
rasika.mulye@expressindia.com