Indian Student Missing in US State : अमेरिकेत शिकणारी भारतीय वंशाची २० वर्षीय विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाली. सुदीक्षा कोनांकी असे या तरुणीचे नाव असून, सध्या पोलिस तिचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुदीक्षा गुरुवारी तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर डोमिनिकन रिपब्लिक येथील समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेली होती. बीचवर चालता चालता ती रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झाली. सुदीक्षाच्या मित्रांनी तिचा आसपासच्या परिसरात शोध घेतला; पण ती कुठेही आढळून आली नाही. शनिवारी या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. दरम्यान, सुदीक्षा कोनांकी कोण आहे? ती अचानक बीचवरून बेपत्ता कशी झाली? सुदीक्षाच्या मैत्रिणींनी पोलिसांना काय सांगितलं? याबाबत जाणून घेऊ…
सुदीक्षा कोनांकी कोण?
सीएनएनच्या वृत्तानुसार, सुदीक्षा कोनांकीचे कुटुंब मूळचे भारतातील आहे. २००६ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर ते परदेशात स्थायिक झाले. डोमिनिकन रिपब्लिक येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदीक्षा ही पीट्सबर्ग विद्यापीठात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेते. याआधी ती थॉमस जेफरसन सायन्स टेक्नॉ़लॉजी या महाविद्यालयात शिक्षण घेत होती. गुरुवारी विद्यापीठाला सुट्टी असल्याने सुदीक्षा तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सहलीसाठी डोमिनिकन रिपब्लिकला गेली होती. बीचवर चालता चालता अचानक ती बेपत्ता झाली.
आणखी वाचा : Fashion Show Kashmir : काश्मीरमधल्या फॅशन शो मुळे वादाची ठिणगी; काय आहे नेमका प्रकार?
सुदीक्षा बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार
सुदीक्षाच्या मित्रांनी तिचा शोध घेऊनदेखील ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. डोमिनिकन रिपब्लिक पोलिसांनी सुदीक्षा बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यामध्ये तिचे वर्णन- ५ फूट ३ इंच उंची, काळे केस आणि तपकिरी डोळे असे करण्यात आले आहे. पोस्टर्सनुसार, सुदीक्षाने तपकिरी रंगाची बिकिनी, मोठे गोल कानातले, उजव्या पायात मेटल डिझायनर अँकलेट, उजव्या हातात पिवळे ब्रेसलेट आणि डाव्या हातात बहुरंगी मणी असलेले ब्रेसलेट घातलेले होते.
पीट्सबर्ग विद्यापीठाने सुदीक्षाच्या कुटुंबाला आणि अधिकाऱ्यांना पूर्ण पाठिंबा देणारे एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. “विद्यापीठाचे अधिकारी सुदीक्षा कोनांकीच्या कुटुंबाशी, तसेच व्हर्जिनियातील लाउडून काउंटीमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. आम्ही तिला शोधण्यासाठी आणि तिला सुरक्षितपणे घरी आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत,” असे विद्यापीठाचे प्रवक्ते जेरेड स्टोनसिफर यांनी न्यू यॉर्क पोस्टला सांगितले.
सुदीक्षा कोनांकी कशी बेपत्ता झाली?
नागरी संरक्षण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुदीक्षा तिच्या मित्रांबरोबर ६ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास एका रिसॉर्टजवळील समुद्रकिनाऱ्यावर फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीचवर चालत असताना ती मित्रांबरोबर गप्पा मारत होती. त्यानंतर अचानक ती बेपत्ता झाली. डोमिनिकन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुदीक्षा ज्यावेळी बेपत्ता झाली, तेव्हा स्थानिक वेळेनुसार पहाटेचे ४ वाजले होते. स्पॅनिश भाषेतील एका निवेदनात पोलिसांनी असे म्हटलेय की, समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या रिसॉर्टच्या कॅमेऱ्यात सुदीक्षा तरुणांच्या एका गटाबरोबर दिसून आली.
सुदीक्षाच्या बेपत्ता होण्यामागे पोलिसांना कोणता संशय?
विशेष म्हणजे तपासकर्त्यांनी सुदीक्षाबरोबर गैरप्रकार झाल्याची शक्यता नाकारली नाही. लाउडाउन काउंटी शेरीफ ऑफिसचे प्रवक्ते थॉमस ज्युलिया म्हणाले, “सुदीक्षाबरोबर गैरप्रकार झाला की नाही हे आम्हाला माहीत नाही. कदाचित ती चुकून बेपत्ता झाली असावी.” शेरीफच्या कार्यालयाने पुष्टी केली की, सुदीक्षाबरोबर पीट्सबर्ग विद्यापीठातील चार विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी होते. जे समुद्रकिनाऱ्यावरील एका रिसॉर्टमध्ये थांबले होते. दरम्यान, सुदीक्षाचे बेपत्ता होणे हे त्याच रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या इतर पर्यटकांच्या तक्रारींशी जुळते. ज्यांनी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, रिसॉर्टमध्ये महिलांबरोबर गैरप्रकार होतात, अशा तक्रारी काहींनी केल्या होत्या. मात्र, तसे कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीत.
सुदीक्षाचे वडील सुब्बारायुडू काय म्हणाले?
सुदीक्षाचे वडील सुब्बारायुडू कोनांकी यांनी सीएनएनला सांगितले, “माझी मुलगी सुदीक्षा खूपच महत्त्वाकांक्षी आहे. तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं होतं. लहानपणापासूनच सुदीक्षाचे डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे. बुधवारी तिनं माझ्याकडे सहलीला जाण्यासाठी हट्ट धरला होता. सुदीक्षाबरोबर तिच्या मैत्रिणी असल्यामुळे मी मनावर दगड ठेवून तिला त्यांच्याबरोबर जाण्याची परवानगी दिली.” ते म्हणाले, “सुदीक्षा आणि तिचे मित्र-मैत्रिणी समुद्रकिनारी असलेल्या एका रिसॉर्टमध्ये पार्टी करणार होते. ६ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास ते सर्व जण बीचवर फिरण्यासाठी गेले. तेव्हा सुदीक्षा अचानक बेपत्ता झाली, ती कुठेही आढळून आली नाही.”
हेही वाचा : Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाचे सैनिक पाईपलाईनमध्ये?
“डोमिनिकन रिपब्लिकमधील अनेक अधिकाऱ्यांनी सुदीक्षाचा समुद्राच्या पाण्यात, जवळच्या खाडीत आणि झाडाझुडपांत शोध घेतला. मात्र, ती अजूनही सापडत नाहीये. मला वाटतं की, कुणीतरी तिचं अपहरण केलं असावं. हे मानवी तस्करीचं प्रकरण असू शकतं. त्यामुळे पोलिसांनी या गोष्टीचाही तपास करावा. देवा, माझ्या मुलीला सुरक्षित ठेव”, अशी प्रार्थना सुदीक्षाचे वडील सुब्बारायुडू करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी सुदीक्षाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती कुठेही आढळून आल्यास त्वरित लाउडाउन काउंटी शेरीफ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुदीक्षाच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथके
शनिवारी डोमिनिकन सिव्हिल डिफेन्सने सोशल मीडियावर सांगितले की, पुंता कानाच्या रिसॉर्ट क्षेत्र असलेल्या बावारोच्या किनारी भागात अनेक पथकांकडून सुदीक्षाचा शोध घेतला जात आहे. त्यामध्ये स्थानिक अग्निशमन दलाचे जवान, प्रशासकीय अधिकारी, डोमिनिकन राष्ट्रीय पोलिस व डोमिनिकन नौदल यांचा समावेश आहे. सुदीक्षाच्या शोधासाठी डोमिनिकन सशस्त्र दलांचे ड्रोन आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने डोमिनिकन रिपब्लिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये पर्यटकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. “सशस्त्र दरोडा, खून व लैंगिक अत्याचारासह हिंसक गुन्हे हे संपूर्ण डोमिनिकन रिपब्लिकमध्ये चिंतेचा विषय आहेत,” असे विभागाने जून २०२४ च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.