काही जणांना अर्धशिशीचा त्रास असतो. अर्धशिशी म्हणजे मायग्रेन. मायग्रेन ही अतिशय तीव्र डोकेदुखी असते. डोके आतून धडधडल्यासारखे वाटणे, मळमळल्यासारखे होणे, डोके आपटावेसे वाटणे, डोके गोठल्यासारखे वाटणे अशी काही लक्षणे अर्धशिशी म्हणजे मायग्रेनमध्ये दिसतात. मायग्रेनमुळे अशक्तपणा, अपुरी झोप, पित्त असे त्रास होतात. काहींचे तर महिन्याचे निम्म्याहून अधिक दिवस मायग्रेनच्या दुखण्यात जातात. जागतिक स्तरावर १५ टक्के लोक मायग्रेनने ग्रस्त आहेत. अतिसंवेदनशील व्यक्तींना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. कारण, मायग्रेन हा मेंदूशी निगडित आहे. अतिसंवेदनशील व्यक्तींना वरचेवर डोकेदुखी आणि अर्धशिशी जाणवू लागते. या मायग्रेनवरती उपचार काय आहेत, तसेच हा आजार का होतो, यामुळे शरीरावर काय परिणाम होतात आणि मायग्रेन आजार कशाप्रकारे कमी होऊ शकतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिसंवेदनशील किंवा वातावरणातील लहान लहान बदलांनाही प्रतिसाद देणाऱ्या व्यक्ती, नैसर्गिक बदलांचा शरीरावर पटकन परिणाम होणाऱ्या व्यक्तींना मायग्रेनचा त्रास होतो. मायग्रेनच्या वेदना मेंदूचे संरक्षण करणार्‍या मेनिन्जेसमधील संवेदी न्यूरॉन्समधील असामान्य प्रवाह निर्माण झाल्यामुळे उद्भवतात, असे मानले जाते.व्यक्ती संवेदनशील झाल्यावर हे न्यूरॉन्स मेंदूला सूचना ( सिग्नल) पाठवतात, ज्यामुळे डोकेदुखी, फोटोफोबिया आणि मायग्रेनची इतर लक्षणे उद्भवतात. हे न्यूरॉन्स रक्तवाहिन्यांच्या जवळदेखील असतात, त्यामुळेच डोकेदुखी तुमच्या हृदयाच्या ठोक्यासोबत हाताजवळच्या नाडीत असल्यासारखे वाटू शकते.अमेरिकेतील मिसूरी स्टेट युनिव्हर्सिटीमधील संशोधक पॉल डरहम यांच्या मते, ”मायग्रेन हा एक आजार आहे, ज्याचा प्रामुख्याने मेंदूवर परिणाम होतो, परंतु, संपूर्ण शरीरावरही त्याचा परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती, पचनक्रिया आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली यांच्यावर मायग्रेनचा परिणाम होतो.”

अर्धशिशी कशामुळे होते?

अर्धशिशी म्हणजे मायग्रेन. मायग्रेन होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. प्रत्येक व्यक्तीची कारणे भिन्न असू शकतात. पण, त्यातील सामान्य कारणे बघूया. अतितेजस्वी दिवे आणि मोठा आवाज. परफ्यूम, धूर किंवा विशिष्ट तीव्र वास. झोपेचा अभाव, खराब दर्जाची झोप किंवा जेट लॅग. भूक किंवा निर्जलीकरण. खूप जास्त कॅफीन, अल्कोहोल, विशेषतः लाल वाइनचे सेवन. संप्रेरकांमधील चढउतार, जसे की, मासिक पाळीपूर्वी किंवा दरम्यान, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्ती. खाद्यपदार्थ आणि आहार, विशेषत: अति-प्रक्रिया केलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेले साखर असलेले आहार. अतिताण यामुळे मायग्रेन होऊ शकतो. संशोधक डरहम म्हणाले की, ”तणाव हे मुख्य कारण ठरू शकते. हे घटक हायपरएक्सिटेबल मज्जासंस्थेला प्रोत्साहन देतात, जे मायग्रेनला कारण ठरू शकतात. आधुनिक समाजात ताण आणि तणाव हा एक प्रमुख घटक आहे.”

हेही वाचा : मासिक पाळीच्या वेळी गोड पदार्थ खाताय ? तज्ज्ञांच्या मते…

अर्धशिशीच्या वेदना कमी कशा कराल ?

मायग्रेनची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा वरच्यावर होणाऱ्या डोकेदुखीला अर्धशिशी होण्यापासून रोखण्याचे काही मार्ग आहेत.
भरपूर पाणी पिणे. कपाळावर आईसपॅक ठेवणे. झोपण्याच्या खोलीत अंधार ठेवावा. अनेक रुग्ण कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) मधून मायग्रेनपासून आराम मिळवण्यास शिकतात. या रोगावर उपचार होण्याची शक्यता नाही. परंतु, ते तुम्हाला वेदना सहन करण्यासाठी आणि मायग्रेनची लक्षणे जाणून घेण्यासाठी मदत करू शकते.

हेही वाचा : विश्लेषण : तीन दशके श्रीनगरमध्ये मोहरमची मिरवणूक का निघाली नाही ? काय आहे इतिहास

अर्धशिशीवर उपचार कसे कराल ?

अर्धशिशीवरील उपचार वैद्यकीय सल्ल्यानेच करावे. इथे काही सामान्य औषधोपचार दिले आहेत.
Calcitonin gene-related peptide (CGRP) monoclonal antibodies : ही नवीन मायग्रेन औषधे ‘सीजीआरपी’ नावाच्या प्रोटीनची क्रिया अवरोधित करतात. सीजीआरपी मायग्रेनच्या लक्षणांच्या विकासामध्ये, मेंनिंजेसमधील न्यूरॉन्सला संवेदनशील बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
Triptans: औषधांचा एक वर्ग जो शरीरातील विशिष्ट प्रकारच्या सेरोटोनिन रिसेप्टर्सला (receptors) संकुचित करतो आणि वेदना कमी करण्यास मदत करतो. पॅरासिटॅमॉल किंवा ऍस्पिरिन सारखी वेदनाशामक औषधे डोकेदुखी कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात, परंतु मायग्रेनची डोकेदुखी या औषधांनी कमी होत नाही.

अर्धशिशीवरील विकसित उपचार पद्धती

मायग्रेनवरती नवीन नवीन उपचारपद्धतींचा शोध लागत आहे. औषधोपचारांसह मशीन्सद्वारे उपचार करण्यात येत आहेत. रुग्णाचा अभ्यास करून या उपचारपद्धती ठरवण्यात येत आहेत.
न्यूरोमोड्युलेशन उपकरणे (Neuromodulation devices): ई-टीएनएस (बाह्य ट्रायजेमिनल नर्व्ह स्टिम्युलेशन) ही एक उपचारपद्धती आहे, जी चेहऱ्याच्या नसांवर कमी विद्युतशक्तीचे प्रयोग करते. परंतु, ही पद्धती अजून विकसित झालेली नाही.
ऑक्सिटोसिन (Oxytocin): ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे होणाऱ्या अर्धशिशीच्या दुखण्यावर काम करते. ही पद्धती विशेषतः स्त्रियांमध्ये वापरली जाते.

अर्धशिशी कमी करण्याकरिता आहार

काही खाद्यपदार्थ किंवा आहार अर्धशिशी कमी करू शकतात. पॉल डरहम यांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, द्राक्षाच्या बियांचा अर्क, कोकाओ किंवा चिकन-मटणाचा रस्सा काही लोकांमध्ये मायग्रेनची वारंवारिता कमी करण्यास मदत करतात. औषधांऐवजी अन्न हा पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे. सध्या अशा पदार्थांवरती संशोधन सुरू आहे, जे मायग्रेनवरती उपयुक्त ठरू शकतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suffering from migraines what is migraine how to reduce headache vvk
Show comments