दत्ता जाधव
जागतिक तापमानवाढीसह विविध कारणांमुळे जगात यंदा साखर उत्पादन कमी झाले आहे. एकूण जागतिक उत्पादन आणि एकूण जागतिक वापर पाहता. यंदा साखरेची हातातोंडाशी गाठ पडणार आहे. त्याविषयी..
यंदा जगात साखर उत्पादन किती?
जागतिक तापमानवाढीच्या परिणामी भारत, थायलंड आणि चीनच्या साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. अमेरिकेच्या कृषी खात्यानेही २०२२-२३ मध्ये जागतिक साखर उत्पादन १७७० लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशनिहाय विचार करता ब्राझीलमध्ये ३८० लाख टन, भारतात ३३० लाख टन, युरोपियन युनियनमध्ये १५० लाख टन, थायलंडमध्ये ११० लाख टन, चीनमध्ये ९० लाख टन, अमेरिकेत ८० लाख टन, रशियात ७० लाख टन, पाकिस्तानमध्ये ६० लाख टन, मेक्सिकोत ५० लाख टन आणि ऑस्ट्रेलियात ४० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
साखरेचा एकूण जागतिक वापर किती?
साखरेचा जागतिक वापर १७६० लाख टनांवर जाण्याचा अंदाज असून सर्वाधिक साखरेचा वापर भारत, युरोपियन युनियन, चीन, अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया, रशिया, पाकिस्तान, मेक्सिको आणि इजिप्तमध्ये होतो. भारतात दरवर्षी सुमारे २९० लाख टन, युरोपियन युनियनमध्ये १७० लाख टन, चीनमध्ये १५० लाख टन, अमेरिका ११० लाख टन, ब्राझीलमध्ये ९५ लाख टन, इंडोनेशियात ७८ लाख टन, रशियात ६५ लाख टन, पाकिस्तान ६१ लाख टन, मेक्सिकोत ४३ लाख टन साखरेचा वापर केला जातो.
साखरेचा दरडोई वापर कमी होतोय का?
आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या अहवालानुसार जगात दरडोई साखरेचा वापर घटत आहे. २०१६ मध्ये तो २३ किलो होता. २०२१ मध्ये तो २१.४ किलोंवर आला आहे. साखरेच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरसारख्या आजारांचा धोका वाढतो. भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशात मधुमेही रुग्णांची संख्या वाढत आहे. जगभरात स्थूलपणा वाढत आहे. साखरेच्या सेवनामुळे स्थूलपणा वाढत असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे कुकीज, बिस्किटे, सोडा, कँडी, चॉकलेट, केक, मिठाई, साखरयुक्त चहा, कॉफी, थंडपेयांचे सेवन कमी करण्यावर भर दिला जात आहे. अधिक प्रमाणात साखर असलेल्या पदार्थाकडे लोक पाठ फिरवताना दिसत आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणून जगभरातच साखरेचा दरडोई वापर कमी होताना दिसत आहे.
एल-निनोमुळे साखर उत्पादन कमी होणार?
यंदाचे वर्ष एल-निनोचे वर्ष आहे. जगातील विविध हवामानविषयक संस्थांनी त्याबाबत अंदाज वर्तविला आहे. एल-निनोचा परिणाम म्हणून भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेसह आग्नेय आशियातील देशांना दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज यापूर्वीच जागतिक हवामान संस्थेने वर्तविला आहे. जागतिक साखर उत्पादनात आशिया अत्यंत महत्त्वाचा असून या उत्पादनात ६० टक्के वाटा आशियाचा आहे. त्यात भारत, थायलंड, चीन या देशांतील साखर उत्पादनाचा समावेश आहे. देशात सध्या होत असलेले मोसमी पावसाचे असमान वितरण पाहता ऊस लागवड कमी होऊन, साखर उत्पादनावरही परिणाम होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा आणि पुढील वर्षीही जागतिक साखर बाजारात साखरेची काहीशी टंचाई असणार आहे. जागतिक साखर बाजारातील उलाढाल ब्राझीलच्या साखरेवरच अवलंबून असणार आहे.
पुढील वर्षी साखरेचे उत्पादन कसे राहील?
अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार २०२३-२४ या वर्षांत एकूण जागतिक साखर उत्पादन १८७० लाख टनांच्या घरात असेल, ज्यात ब्राझीलचा वाटा ४२० लाख टन, भारताचा ३६० लाख टन, युरोपियन युनियनचा १५० लाख टन, थायलंडचा ११० लाख टन, चीनचा १०० लाख टन, अमेरिकेचा ८० लाख टन, पाकिस्तानचा ७० लाख टनांच्या घरात असणार आहे. तर जागतिक वापर १८०० लाख टनांच्या घरात असणार आहे. सर्वाधिक साखरेचा वापर भारतात होणार असून, तो ३१० लाख टन, युरोपियन युनियनमध्ये १७० लाख टन, चीनमध्ये १५० लाख टन, अमेरिकेत ११० लाख टन, ब्राझील ९५ लाख टन आणि इंडोनेशियात ८० लाख टन असेल असा अंदाज आहे.
साखर बाजारात भारताची भूमिका?
जागतिक साखर बाजारात २०२२-२३मध्ये एकूण ६६० लाख टनांची खरेदी-विक्री झाली. त्यात ब्राझीलचा वाटा २८० लाख टन, थायलंडचा वाटा ११० लाख टन आणि भारताचा वाटा ६५ लाख टन इतका आहे. २०२१-२२ मध्ये जागतिक बाजारात एकूण ६४० लाख टनांची खरेदी-विक्री झाली, त्यात भारताचा वाटा ११० लाख टन इतका होता. अमेरिकेच्या कृषी खात्याच्या अंदाजानुसार, पुढील वर्षी म्हणजे २०२३-२४ मध्ये जागतिक बाजारात सुमारे ७२० लाख टन साखरेची खरेदी-विक्री होईल. त्यात भारताचा वाटा ७० लाख टनांचा असेल. इंडोनेशिया, चीन, अमेरिका, बांग्लादेश आणि युरोपियन युनियन जगातील सर्वात मोठे साखरेचे आयातदार देश आहेत. चालू वर्षांच्या अखेरीस भारताकडे शिल्लक साखर ६५ लाख टन, तर पुढील वर्षांच्या अखेरीस भारताकडे ५५ लाख टनांचा शिल्लक साठा राहील, असा अंदाजही अमेरिकेच्या कृषी खात्याने वर्तविला आहे.